विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

भारत 2025 पर्यंत 150 अब्ज डॉलर्स जैव-अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन

Posted On: 22 AUG 2023 8:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट 2023

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज सांगितले की, 2025 सालापर्यंत 150 अब्ज डॉलर्स जैव-अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत सज्ज आहे. ते म्हणाले की, 2022 मध्ये भारताची जैव अर्थव्यवस्था 100 अब्ज डॉलर्सहून अधिक राहिली.

जैवतंत्रज्ञान विभाग (डीबीटी) आणि युनायटेड स्टेट्स-नॅशनल सायन्स फाऊंडेशन (युएस-एनएसएफ) यांच्यात आज नवी दिल्ली येथे ‘अंमलबजावणी व्यवस्था’ करारावर स्वाक्षरी झाली. त्यावेळी ते  बोलत होते. डीबीटी आणि युएस-एनएसएफ यांच्यात 'धोरणात्मक भागीदारी' विकसित करण्याच्या संधींवर चर्चा करण्यासाठी जून 2023 मध्ये जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. राजेश एस. गोखले आणि नॅशनल सायन्स फाऊंडेशनचे संचालक डॉ. सेतुरामन पंचनाथन यांची बैठक झाली होती. त्या बैठकीचा यावेळी आढावा घेण्यात आला.

डॉ जितेंद्र सिंह  म्हणाले की, भारताचा  सातत्त्याने विकसित होत असलेला जैव-अर्थव्यवस्थेचा आलेख, भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेत महत्वाचे योगदान देणार आहे. ते म्हणाले, जागतिक जैवतंत्रज्ञान उद्योगात भारतीय बाजारपेठेचा वाटा 3 ते 5% इतका असून, जैवतंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगात 12 व्या आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले की जैवतंत्रज्ञान विभागाने जैवतंत्रज्ञान नवोन्मेष, संशोधन आणि जैव-औषध निर्माण, जैव-सेवा, कृषी जैव-तंत्रज्ञान, औद्योगिक जैव-तंत्रज्ञान आणि बायो-इन्फर्मेटिक्स यासारख्या विविध क्षेत्रांमधील उत्पादनासाठी, सार्वजनिक-खासगी भागीदारी, मेक-इन-इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या सरकारी उपक्रमांच्या मदतीने एक मजबूत पाया तयार केला आहे आणि त्याचे संवर्धन केले आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या आत्मनिर्भरता या संकल्पनेला अनुसरून, भारत सरकारने 'भविष्यासाठी सज्ज' तंत्रज्ञान व्यासपीठाच्या निर्मितीसाठी नेहमीच तंत्रज्ञानावर आधारित नवोन्मेषाला प्रोत्साहन दिले आहे. या अंमलबजावणी व्यवस्थेद्वारे भारत आणि अमेरिका  दरम्यान द्विपक्षीय सहकार्य वाढवल्याबद्दल त्यांनी डीबीटी आणि एनएसएफचे अभिनंदन केले.

ही ‘अंमलबजावणी व्यवस्था’, ‘जैव-तंत्रज्ञान नवोन्मेष आणि जैव-उत्पादन’ या क्षेत्रांमधील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी दोन्ही देशांमधील सहकार्याचा पाया घालेल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. ही व्यवस्था एकमेकांच्या सहयोगाने केलेल्या संशोधनाच्या सहाय्याने, ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषामध्ये भर घालेल, दोन्ही देशांच्या जैवतंत्रज्ञान उद्योगांना सक्षम करेल आणि जैव अर्थव्यवस्थेला चालना देईल, असे ते म्हणाले.

एनएसएफचे संचालक डॉ. सेतुरामन पंचनाथन म्हणाले, अमेरिका आणि भारत जैवतंत्रज्ञान नवोन्मेष आणि जैव-उत्पादनाद्वारे, हवामान बदल आणि उर्जा विषयक जागतिक उद्दिष्टे एकत्रितपणे पूर्ण करू शकतील.     

डीबीटी चे सचिव डॉ. राजेश एस. गोखले म्हणाले की, ही भागीदारी नवोन्मेषाच्या क्षेत्रातील आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी आणि तंत्रज्ञान विषयक संधींचा विकास करण्यासाठी महत्वाचे पाउल ठरेल.   

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1951207) Visitor Counter : 111