मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ 21 ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान नॉर्वे भेटीवर
मत्स्य पालन आणि जलचर संवर्धन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यातले द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रतिनिधी मंडळाचा दौरा
Posted On:
20 AUG 2023 5:32PM by PIB Mumbai
केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला आणि याच खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ, 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2023 दरम्यान नॉर्वे या देशाला भेट देणार आहे. संयुक्त सचिव (सागरी मत्स्यपालन) आणि मत्स्य पालन विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी, यांचा सुद्धा या प्रतिनिधीमंडळात समावेश आहे.
भारत आणि नॉर्वे या दोन देशांमध्ये मार्च 2010 मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार, मत्स्य पालन आणि जलचर संवर्धन आणि पालन या क्षेत्रात या दोन देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे हा या भेटी मागील उद्देश आहे. नॉर्वेचे मत्स्यपालन आणि महासागर धोरण मंत्री ब्यॉर्नर सेलनेस स्कायरन, व्यापार-उद्योग आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्या स्टेट सेक्रेटरी क्रिस्टीना सिगुर्सडोटीर हॅन्सन आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, भारताचे प्रतिनिधी मंडळ, मत्स्यपालन विकास, साधनसंपत्ती व्यवस्थापन, संशोधन, नवोन्मेष आणि व्यापार या संदर्भातील विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करतील.
नॉर्वेच्या ट्रॉन्डहेम इथे 22 ते 24 ऑगस्ट 2023 या कालावधीत होणार्या, अॅक्वा नॉर 2023, या द्वैवार्षिक मत्स्यशेती आणि व्यापार प्रदर्शनाला, हे प्रतिनिधी मंडळ उपस्थित राहील. जलचर संवर्धन आणि मत्स्यशेती क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जगातील सर्वात मोठ्या व्यापार प्रदर्शनांपैकी हे एक प्रदर्शन आहे. या प्रदर्शनात, शाश्वत आणि लाभदायक मत्स्यशेतीच्या क्षेत्रातल्या नवीन घडामोडी आणि अशी मत्स्यशेती तसेच जलचर संवर्धन कसे करायचे याच्या विविध पद्धती पहायला मिळतील. मत्स्य आरोग्य, मत्स्य खाद्य, मत्स्य बीज, मत्स्य शेतीसाठीची साधने, प्रक्रिया आणि पणन, अशा मत्स्य पालन आणि मत्स्य शेती तसेच जलचर संवर्धनाच्या वेगवेगळ्या पैलूंचे जाणकार आणि माहितगार असलेल्या नॉर्वे मधील विविध व्यावसायिकांशी, भारताचे प्रतिनिधी मंडळ, या निमित्ताने संवाद साधेल.
नॉर्वेमधील, मासेमारी नौका, मासेमारी केंद्र, जलचरांचे कृत्रिम प्रजनन केंद्र, जलाशय बंदीस्त करुन तयार केलेले मत्स्यपालन क्षेत्र आणि सागरी खाद्यान्न प्रक्रिया केंद्र अशा मत्स्य-जलचर पालनासंबंधित काही अत्याधुनिक सुविधा पाहण्याची संधी, भारताच्या प्रतिनिधी मंडळाला मिळेल, या ठिकाणीसुद्धा ते भेट देतील. भारताचे प्रतिनिधी मंडळ यानिमित्ताने, या क्षेत्रातील नॉर्वेचे अनुभव जाणून घेईल आणि या क्षेत्रांमध्ये सहयोग तसेच गुंतवणुकीच्या शक्यता चाचपून बघेल.
नॉर्वेमधील भारतीय समाजाशी देखील, भारताचे प्रतिनिधी मंडळ संवाद साधेल, तसेच मत्स्यपालन क्षेत्रात भारत सरकार राबवत असलेल्या उपक्रमांची आणि मिळालेल्या यशाची त्यांना माहिती देईल, सोबतच त्यांच्या सूचना आणि अभिप्राय जाणून घेईल.
या भेटीमुळे, मत्स्यपालन क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यातील परस्पर सामंजस्य आणि द्विपक्षीय सहकार्य वाढीला लागेल आणि परस्पर भागीदारीच्या माध्यमातून भविष्यातील भरीव विकासाचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा आहे.
***
N.Chitale/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1950648)
Visitor Counter : 199