युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या वाय-20 शिखर परिषदेची, आयआयटी -बीएचयू मधील सुपर कम्प्युटिंग सेंटर आणि प्रिसिजन इंजिनिअरिंग केंद्राला भेट देऊन सुरुवात
Posted On:
17 AUG 2023 8:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2023
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाअंतर्गत,युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने आयोजित केलेल्या वाय-20 शिखर परिषदेची आज, उत्तरप्रदेशातील वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठातील, सुपर कम्प्युटिंग सेंटर अँड प्रिसिजन इंजिनिअरिंग केंद्राला भेट देऊन सुरुवात करण्यात आली.
वाय-20 च्या प्रतिनिधींना यावेळी अधिक अॅप्लिकेशन डोमेन्सचे रूपांतर करण्याचे उद्दिष्ट आणि या तंत्रज्ञानाद्वारे महत्वाचे मिशन्स कसे साध्य करता येतात याची झलक बघायला मिळाली. आयआयटी बीएचयूच्या प्राध्यापकांनी सुपर कम्प्युटिंग केंद्राने देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संशोधन आणि विकास क्षेत्रात कसे प्रगती केली आहे हे ही यावेळी दाखवले.
या भेटीनंतर, आयआयटी- बीएचयूतर्फे रुद्राक्ष आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संमेलन केंद्र (RICCC)इथे झालेल्या सत्रात, सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाची सुरुवात, सातत्याने नवनवीन उन्नती करत असणाऱ्या, आयआयटी बीएचयू च्या प्रगतीची वाटचाल आणि भारताला मजबूत करण्यात तंत्रशिक्षणाद्वारे बीएचयूच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल माहिती देऊन करण्यात आली. त्यानंतरच्या सत्रात, आयआयटी बीएचयू मध्ये सुरू असलेली संशोधने,नोकरीच्या संधी, नवोन्मेष, इनक्युबेशन आणि स्टार्ट अप केंद्रे यावर भर देण्यात आला. त्यानंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात, गरबा, ओडिशी नृत्य, भरत नाट्यम, कथ्थक आणि भंगडा असे विविध नृत्यप्रकार सादर करण्यात आले.
संध्याकाळी, सर्व प्रतिनिधी आणि सहभागी मान्यवरांनी, सारनाथ ला भेट दिली आणि वाराणसीच्या संस्कृतीची ओळख करुन घेतली.सारनाथच्या सहलीमुळे प्रतिनिधींना जगातील प्रमुख बौद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या सांस्कृतिक स्थळाचे तेज अनुभवण्यास मदत झाली. सारनाथ इथे प्रतिनिधींनी बौद्ध सांस्कृतिक संपदा असलेल्या पुरातत्व संग्रहालयालाही भेट दिली सारनाथमधील मृगदवा इथल्या मृग उद्यानात भगवान बुद्धांच्या पहिल्या प्रवचनाच्या स्थळी असलेल्या अमूल्य वस्तू या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.
वाय- 20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवसाचा समारोप गौतम बुद्धांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करणाऱ्या साऊंड अँड लाईट शो ने झाला. वाय 20 शिखर परिषदेच्या उद्या होणाऱ्या औपचारिक उद्घाटन सत्राला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर, राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949993)
Visitor Counter : 102