राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता येथे ब्रम्हकुमारींनी आयोजित केलेल्या 'माझे बंगाल, व्यसनमुक्त बंगाल' मोहिमेचा केला शुभारंभ
Posted On:
17 AUG 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 ऑगस्ट 2023
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (17 ऑगस्ट, 2023) कोलकाता मधील राजभवन येथे ब्रह्मकुमारींनी, 'नशा मुक्त भारत अभियाना’ अंतर्गत आयोजित केलेल्या 'माय बंगाल, एडीक्शन फ्री बंगाल', अर्थात ‘माझे बंगाल, व्यसन मुक्त बंगाल’ मोहिमेची सुरुवात केली.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, अमली पदार्थांचे सेवन हा समाज आणि देशासाठी चिंतेचा विषय आहे. व्यसनाधीनतेमुळे तरुणांना आपल्या जीवनात योग्य दिशा निवडता येत नाही, ही बाब अत्यंत चिंतेची असून याप्रकरणी सर्वच आघाड्यांवर काम करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. आध्यात्मिक प्रबोधन, औषधोपचार, सामाजिक एकता आणि राजकीय इच्छाशक्तीच्या मदतीने या परिस्थितीत सुधारणा घडवता येईल, असे त्यांनी सांगितले. ब्रह्मकुमारींसारख्या संस्थांनी अशा समस्यांवर चर्चा करून ते सोडवण्यासाठी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली.
राष्ट्रपती म्हणाल्या की, कोणत्याही प्रकारचे व्यसन हे मानसिक तणाव आणि पियर प्रेशर, अर्थात संगतीच्या दबावामुळे वाढते. कुठलेही व्यसन हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. व्यसनामुळे इतरही अनेक व्याधी निर्माण होतात. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींनाही खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तरुणांनी आपला मित्र/मैत्रीण व्यसनाधीन झाल्याचे त्याच्या/तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आणून द्यायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांनी आपले जीवन उद्ध्वस्त करू नये, ते कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली असतील तर त्यांनी आपले मित्र, कुटुंबीय अथवा एखाद्या सामाजिक संस्थेशी याबाबत बोलायला हवे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते व्यसनाधीनतेवर मात करू शकत नाहीत, ही समस्या हाताळण्याजोगी असल्याचे त्या म्हणाल्या. अमली पदार्थांचा वापर आणि व्यसनाधीनता याचा समाजकंटक गैरफायदा घेतात, अमली पदार्थांवर खर्च होणारा पैसाही गुन्हेगारी कारवायांसाठी वापरला जातो असे त्या म्हणाल्या. व्यसनाधीन व्यक्ती स्वतःच्या भल्यासाठी आणि समाज आणि देशाच्या हितासाठी या वाईट सवयीचा त्याग करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
युवा वर्ग ही आपली सर्वात मोठी संपत्ती असून, जो वेळ आणि शक्ती त्यांनी आपल्या भविष्याचा पाया मजबूत करण्यासाठी खर्च करायला हवा, तो व्यसनाधीनतेमुळे वाया जात असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. शैक्षणिक संस्थांनी आपले विद्यार्थी चुकीच्या दिशेने जात आहेत का, यावर लक्ष ठेवावे, आणि अशी गोष्ट निदर्शनास आली, तर त्वरित कारवाई करावी, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1949871)
Visitor Counter : 160