संरक्षण मंत्रालय
कारगिल विजयाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या स्मृती प्रित्यर्थ बॅटल ऑफ माईंड अर्थात मनाचे द्वंद्व या भारतीय सेना प्रश्नमंजुषा 2023 स्पर्धेचे उद्घाटन
Posted On:
16 AUG 2023 8:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2023
ज्ञानवर्धन आणि युवावर्गाच्या सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, भारतीय लष्कराने आज दिल्ली लष्करी छावणी क्षेत्रातील माणेकशॉ केंद्रामध्ये ‘बॅटल ऑफ माइंड्स’ - इंडियन आर्मी क्विझ 2023, अर्थात 'मनाचे द्वंद्व'-भारतीय सेना प्रश्नमंजुषा स्पर्धा 2023 चे, आकर्षक बोधचिन्हासह अनावरण केले. कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्षाच्या अर्थात रौप्य महोत्सवाची सुरुवात करणारी ही प्रश्नमंजुषा स्पर्धा, कारगिल युद्धातील भारतीय सशस्त्र दलांच्या विजयाचा उत्सव साजरा करत, हा विजय मिळवून देणाऱ्या वीरांच्या शौर्य आणि धैर्याला मनापासून आदरांजली अर्पण करते. नव्या बोधचिन्हाचे प्रतीक असलेला हा महत्त्वाचा उपक्रम, देशभरातील तरुण मनांचा बौद्धिक विकास आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी लष्कराची असलेली वचनबद्धता अधोरेखित करतो. हा कार्यक्रम, उत्सवाच्या रुपात भूतकाळ साजरा करणारा असून तरुणांमध्ये कुतूहल आणि शिकण्याची वृत्ती जागवणे, उद्याचे नेते घडवणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.

या कार्यक्रमाला लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एम व्ही सुचिंद्र कुमार उपस्थित होते. प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण,AWWA अर्थात वीर सैनिकपत्नी कल्याण संस्थेच्या अध्यक्ष अर्चना पांडे, यांच्या हस्ते झाले. परमवीर चक्र पुरस्कार विजेते सुभेदार मेजर (मानद कॅप्टन) योगेंद्र सिंह यादव (निवृत्त) आणि सुभेदार मेजर संजय कुमार यांच्या सह, भारतातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळांचे मुख्याध्यापक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी होण्याची संधी भारतातील सर्व जिल्ह्यांना खुली असून देशभरातील सुमारे 1.5 लाख शाळा यात सहभागी होऊ शकतात. सुमारे 15000 शाळा यासाठी नोंदणी करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे, या स्पर्धेत देशभरातील अंदाजे 1.5 कोटी विद्यार्थी सहभागी होण्याची अपेक्षा आहे. तीन विद्यार्थी आणि एक राखीव विद्यार्थी, अशा संघासह शाळांनी सहभागी व्हायचे आहे. सह-शैक्षणिक शाळांमधील म्हणजे मुले-मुली एकत्र शिकत असलेल्या शाळांमधील संघांमध्ये किमान एक विद्यार्थिनी असणे अनिवार्य आहे. सहभागींची वयोमर्यादा 10 ते 16 वर्षे (म्हणजे साधारणपणे सहावी ते दहावी इयत्ता) अशी आहे. ही स्पर्धा, ऑनलाइन आणि ऑफलाइन, अशा दोन्ही पद्धतीने घेतली जाईल. प्रादेशिक कमांड स्तरावर सुरू होऊन ही स्पर्धा नंतर इंटर-कमांड आणि शेवटी राष्ट्रीय स्तरावर होत संपेल.

पहिला टप्पा, ऑनलाइन एलिमिनेशन या बाद फेरीने सुरू होईल. या फेरीत विद्यार्थी, बौद्धिक पडताळणी करणाऱ्या प्रश्नांना सामोरे जात, आपली योग्यता दाखवतील. ऑनलाइन फेरीत यशस्वी ठरलेले स्पर्धक नंतर दुसऱ्या टप्प्यात प्रादेशिक कमांड-स्तरीय स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होत खेळतील. नंतर राष्ट्रीय स्तरावर ऑफलाइन पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष सहभागाने महाअंतिम फेरी होत स्पर्धा संपेल.
* * *
S.Kakade/A.Save/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1949710)
Visitor Counter : 250