शिक्षण मंत्रालय

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी 50 शालेय शिक्षक विशेष अतिथी म्हणून राहणार उपस्थित

Posted On: 13 AUG 2023 6:11PM by PIB Mumbai

 

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 77व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षकांना मान्यवर विशेष अतिथीम्हणून आमंत्रित केले आहे.

युवा मनांना आकार देण्यासाठी आणि त्यांची जोपासना करण्यासाठी आपापल्या क्षेत्रांमध्ये असामान्य समर्पण आणि वचनबद्धतेचे दर्शन घडवणाऱ्या 50 शालेय शिक्षकांच्या विशेष निवड केलेल्या एका गटाला शालेय शिक्षण विभागाने आमंत्रित केले आहे. हे शिक्षक देशभरातील केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ(सीबीएसई) आणि केंद्रीय विद्यालय संगठन शाळांमधील शिक्षक आहेत. 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान होणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमात हे विशेष अतिथी सहभागी होणार आहेत आणि देशाचा वारसा आणि प्रगतीचा अनुभव घडवणाऱ्या विविध उपक्रमांचा त्यांच्या या दोन दिवसीय भेटीच्या वेळापत्रकात समावेश आहे.

ऑगस्ट 14, 2023: इंडिया गेट, युद्ध स्मारक आणि प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट. ज्यांनी देशाच्या सार्वभौमत्वाचे  रक्षण केले त्या शूर जवानांना ते कर्तव्य पथावर आदरांजली वाहतील. या वीरांचे धैर्य आणि बलिदान या स्थानाला भेट देणाऱ्यांच्या मनामध्ये कायमचे कोरले जाईल. नवी दिल्लीत तीन मूर्ती मार्गावरील प्रधानमंत्री संग्रहालयाला भेट देण्यामुळे त्यांची आपल्या देशाच्या भविष्याला आकार देणाऱ्या दूरदर्शी नेत्यांच्या दृष्टीकोनाशी ओळख होईल. त्यानंतर शालेय शिक्षक आणि केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांच्याशी संवाद सत्राचे आयोजन करण्यात येईल. 

15 ऑगस्ट 2023: ऐतिहासिक लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभाग, जिथे देशप्रेमाची भावना जागवणाऱ्या राष्ट्रगीताच्या सुरांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.  

स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने या सन्मानाच्या माध्यमातून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, आपल्या असामान्य वचनबद्धतेने देशाच्या भविष्याची जोपासना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करत आहे. युवा पिढीमध्ये  ज्ञान, मूल्ये आणि कौशल्य रुजवणारी त्यांची भूमिका अनमोल आहे आणि या गौरवाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी देशाच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.

***

R.Aghor/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948390) Visitor Counter : 144