पंतप्रधान कार्यालय
अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
भारताच्या प्रत्येक नागरिकाने सरकारवर सातत्याने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे
“विरोधकांनी केलेल्या राजकारणामुळे अतिशय महत्त्वाच्या विधेयकांवर आवश्यक असलेली चर्चा होऊ शकली नाही”
“21 व्या शतकातील हा कालखंड देशातील पुढील हजार वर्षांवर परिणाम करणारा असेल आपण सर्वांनी एकाच उद्दिष्टावर लक्ष केंद्रित केले पाहिजे”
“आम्ही भारताच्या युवा वर्गाला घोटाळे मुक्त सरकार दिले आहे”
“आज गरिबांच्या हृदयामध्ये आपली स्वप्ने साकार करण्याचा विश्वास निर्माण झाला आहे”
“विरोधक अविश्वासाने भरलेले असल्याने त्यांना जनतेचा विश्वास दिसत नाही”
“2028 मध्ये जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल त्यावेळी देश आघाडीच्या तीन देशांमध्ये असेल”
“विरोधकांना त्यांच्या आघाडीचे नाव बदलण्यात रस आहे पण त्यांच्या कार्यसंस्कृतीत ते बदल करू शकत नाहीत”
“स्वातंत्र सैनिक आणि देशाच्या संस्थापकांनी नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला”
“महिलांच्या विरोधातील गुन्हे खपवून घेतले जाणार नाहीत आणि केंद्र आणि राज्य सरकार दोषींना शासन होईल हे सुनिश्चित करेल”
“ मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि ते प्रगतीच्या मार्गावर आगेकूच करेल”
“ मी मणिपूरच्या जनतेला ही ग्वाही देतो, मणिपूरच्या माता आणि कन्यांच्या पाठीशी संपूर्ण देश आहे आणि हे सभागृह त्यांच्या पाठिशी आहे”
“मणिपूरला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी सरकार कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही”
“आमच्या सरकारने ईशान्येच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे”
“सबका साथ सबका विश्वास ही आमच्यासाठी केवळ एक घोषणा नसून विश्वास आणि वचनबद्धतेचे प्रतीक आहे”
“संसद हे एका पक्षाचे व्यासपीठ नाही. संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे येथील प्रत्येक सेकंदाचा देशासाठी वापर होतो”
“आजचा भारत दबावासमोर झुकत नाही. आजचा भारत वाकत नाही, थकत नाही आणि थांबत नाही”
Posted On:
10 AUG 2023 10:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.
यावेळी त्यांनी असा देखील विश्वास व्यक्त केला की रालोआ आणि भाजपा सर्व विक्रम मोडीत काढेल आणि जनतेच्या आशीर्वादाने 2024 मध्ये विजयी होईल.
या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून विरोधक पुरेशा गांभीर्याने सहभागी झाले असते तर जास्त चांगले झाले असते, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या काही दिवसात अतिशय महत्त्वाची विधेयके संमत झाली आणि त्यावर विरोधी पक्षांनी चर्चा करायला हवी होती, मात्र त्यांनी या महत्त्वाच्या विधेयकांपेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व दिले, अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली. “ मच्छीमार, डेटाविषयक, गरीब, वंचित आणि आदिवासी यांच्याशी संबंधित अऩेक विधेयके होती, पण विरोधकांना त्यात रस नव्हता. लोकांच्या अपेक्षांचा हा विश्वासघात होता. त्यांनी हे सिद्ध केले आहे की पक्ष हा देशापेक्षा मोठा असतो”, ते म्हणाले. देश विरोधी पक्षांकडे पाहात असतो आणि त्यांनी नेहमीच जनतेला निराश केले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
देशाच्या जीवनात एक असा काळ येतो ज्यावेळी तो देश सर्व प्रकारच्या शृंखला तोडून मुक्त होतो आणि नवी ऊर्जा आणि निर्धाराने पुढे वाटचाल करू लागतो, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “ 21व्या शतकाचा हा कालखंड आपल्या सर्वांच्या आकांक्षांची पूर्तता करणारा काळ आहे. या काळात जे काही आकाराला येईल त्याचा प्रभाव पुढील हजारो वर्षे देशावर पडेल. म्हणूनच आपल्यावर प्रचंड मोठी जबाबदारी आहे आणि आपण फक्त देशाचा विकास या एकाच उद्देशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि देशवासियांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संपूर्ण समर्पण केले पाहिजे” असे त्यांनी ठामपणे सांगितले. आपल्या जनतेची आणि आपल्या युवा वर्गाची क्षमता आपल्याला उद्दिष्टपूर्तीकडे घेऊन जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2014 मध्ये आणि त्यानंतर, आमचे काम पाहून देशाने पूर्ण बहुमताचे सरकार निवडले कारण त्यांना माहित होते की त्यांची स्वप्ने साकार करण्याची क्षमता कुणामध्ये आहे असे ते म्हणाले. “आम्ही भारतातील युवकांना घोटाळेमुक्त सरकार दिले आहे. आम्ही त्यांना खुल्या आकाशात भरारी घेण्याचे धैर्य आणि संधी दिली . आम्ही जगामध्ये क्रमवारीतील भारताचे स्थान सुधारले आणि त्यांना नवीन उंचीवर नेले ” या माहितीवर त्यांनी भर दिला. “विरोधकांनी अविश्वास प्रस्तावाच्या नावाखाली जनतेचा विश्वास मोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे” असे त्यांनी नमूद केले. स्टार्टअप परिसंस्थेतील वाढ, विक्रमी परदेशी गुंतवणूक आणि निर्यातीचे नवे विक्रम यांचा मोदी यांनी उल्लेख केला आणि सांगितले की, “आज गरीबांच्या मनात स्वप्ने पूर्ण होतील हा विश्वास निर्माण झाला आहे.” 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आल्याचे नीती अहवालात नमूद करण्यात आल्याचा त्यांनी उल्लेख केला.
पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यपत्रिकेचा उल्लेख केला ज्यामध्ये असे म्हटले आहे की भारताने पराकोटीच्या गरीबीचे जवळपास निर्मूलन केले आहे. आयएमएफचा दाखला देत पंतप्रधान म्हणाले की, भारतातली थेट लाभ हस्तांतरण योजना आणि इतर समाज कल्याण योजना हा एक 'लॉजिस्टिक चमत्कार' आहे. त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेचाही दाखला दिला ज्यामध्ये असे म्हटले आहे की जल जीवन मिशन देशातील 4 लाख लोकांचे जीव वाचवण्यात मदत करत आहे तर स्वच्छ भारत अभियान 3 लाख लोकांचे जीव वाचवण्यात मदत करत आहे. "हे देशातील गरीब लोक आहेत जे शहरी झोपडपट्ट्यांमध्ये राहतात", असे ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाबाबत युनिसेफने व्यक्त केलेले मत नमूद करताना पंतप्रधान म्हणाले की हे अभियान देशातील गरीब कुटुंबांना वार्षिक 50,000 रुपयांची बचत करण्यात मदत करत आहे.
वस्तुस्थिती नाकारण्याच्या विरोधकांच्या दृष्टिकोनावर टीका करताना पंतप्रधान म्हणाले की लोकांचा विश्वास त्यांना दिसत नाही कारण ते अविश्वासाने इतके बुडलेले आहेत. विरोधकांचे अपशब्द आणि छोट्या छोट्या चुका, दोष दाखवून देण्याचे वर्तन हे ‘काला टिका’ प्रमाणे काम करते असे ते म्हणाले.
विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य असलेल्या सर्व संस्था सातत्याने चमकत असून ते 'विरोधकांचे गुप्त वरदान' आहे असे ते म्हणाले. "ज्याचे ते वाईट चिंततात त्यांचे चांगलेच होते "असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी बँकिंग क्षेत्रातील घडामोडींप्रति विरोधकांच्या वृत्तीची आठवण करून दिली. ते म्हणाले की त्यांनी चुकीची माहिती पसरवण्याचा आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. मात्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा निव्वळ नफा दुप्पट वाढला असे पंतप्रधानांनी सांगितले. देशाला एनपीए संकटाकडे ढकलणाऱ्या फोन बँकिंग घोटाळ्याचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की देशाने यातून स्वतःला सावरले असून आता पुढे वाटचाल करत आहे. विरोधकांनी जोरदार टीका केलेल्या एचएएलचे उदाहरणही मोदी यांनी दिले. ते म्हणाले की एचएएल यशाची नवीन शिखरे गाठत असून आतापर्यंतची सर्वोच्च महसुलाची नोंद केली आहे. एलआयसीबद्दल विरोधकांनी केलेल्या अपप्रचाराचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की एलआयसी दिवसागणिक मजबूत होत आहे.
“विरोधकांचा राष्ट्राच्या क्षमतेवर आणि समर्पणावर विश्वास नाही” असे सांगत पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वीच्या आपल्या वक्तव्याची आठवण करून दिली ज्यात त्यांनी म्हटले होते की त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. एक जबाबदार विरोधी म्हणून, त्यांनी सरकारला हे लक्ष्य साध्य करण्यासाठीच्या त्यांच्या कृतियोजनेबाबत प्रश्न विचारायला हवा होता किंवा किमान सूचना द्यायला हव्या होत्या मात्र तसे झाले नाही असे पंतप्रधान म्हणाले. जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी काहीही करण्याची गरज नसल्याचा दावा करणाऱ्या विरोधकांच्या हलगर्जीपणावर त्यांनी टीका केली. पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांच्या या दृष्टिकोनातून धोरणे, हेतू, दूरदृष्टी, जागतिक अर्थशास्त्राची समज आणि भारताच्या क्षमता समजून घेण्याचा अभाव दिसून येतो.
1991 मध्ये भारत कसा गरीबीत लोटला गेला आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता ते पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मात्र 2014 नंतर भारताला जगातील अव्वल 5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळाले. ‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ या मंत्राद्वारे आणि योग्य नियोजन आणि कठोर परिश्रमाद्वारे हे साध्य झाल्याचे ते म्हणाले. ही गती कायम राहणार असून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असेही त्यांनी स्पष्ट केले. “2028 मध्ये, जेव्हा तुम्ही अविश्वास प्रस्ताव आणाल तेव्हा देश अव्वल 3 अर्थव्यवस्थांपैकी एक असेल” असे त्यांनी सभागृहाला सांगितले.
विरोधकांच्या संशयास्पद दृष्टिकोनाचा उल्लेख करत पंतप्रधानांनी स्वच्छ भारत, जन धन खाते, योग, आयुर्वेद, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या अभियानांवर त्यांचा विश्वास नसल्याचे सांगितले.
काँग्रेसच्या राजवटीत काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी आणि तत्कालीन सरकारने पाकिस्तानशी सहमती दर्शवत शांतता चर्चा एकाच वेळी सुरू ठेवण्याची दर्शवलेली तयारी यांचा उल्लेख केला. काश्मिरी लोकांऐवजी हुर्रियतशी त्यांचे संबंध होते असे ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकबद्दल सरकारवर विश्वास ठेवण्याऐवजी शत्रूंनी रचलेल्या कथेवर विरोधकांनी कसा विश्वास ठेवला याचाही त्यांनी उल्लेख केला.
"देशाबद्दल वाईट बोलणार्यांवर विरोधक चटकन विश्वास ठेवतात” असे पंतप्रधान म्हणाले. एका परदेशी एजन्सीच्या चुकीच्या माहितीच्या अहवालाचा त्यांनी उल्लेख केला ज्यामध्ये अन्नसुरक्षेचा सामना करत असलेले देश काही मापदंडांमध्ये भारताच्या पुढे असल्याचे म्हटले होते. विरोधक अशा चुकीच्या माहितीच्या वृत्तांचा आधार घेतात आणि देशाला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्याची प्रत्येक संधी साधतात असे ते म्हणाले. त्यांनी भारतात निर्मित कोरोना प्रतिबंधक लसीचे उदाहरण दिले आणि सांगितले की विरोधकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्याऐवजी परदेशी बनावटीच्या लसीकडे वळले. विरोधकांचा भारताच्या आणि येथील जनतेच्या क्षमतेवर विश्वास नाही आणि त्याचबरोबर लोकांच्या नजरेत विरोधकांप्रति विश्वास देखील आता फारसा उरला नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आघाडीमध्ये केवळ वरवरचे बदल करुन देशातील लोकांना मूर्ख बनवता येत नाही आणि केवळ साधा नावात केलेला बदल विरोधकांच्या आघाडीचे नशीब बदलू शकत नाही असे देखील पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. “त्यांनी टिकाव धरण्यासाठी एनडीए ची मदत घेतली आणि त्यात अहंकाराचे दोन ‘आय म्हणजे मी’ एकत्र केले, त्यापैकी पहिला आय आहे तो म्हणजे 26 पक्षांचा मीपणा, आणि दुसरा आय आहे तो म्हणजे एका कुटुंबाचा अहंकार . त्यांनी इंडिया या शब्दाची देखील I.N.D.I.A. अशी विभागणी केली,” ते म्हणाले.”विरोधक नावे बदलण्यावर विश्वास ठेवतात मात्र ते त्यांची कार्यसंस्कृती बदलू शकत नाहीत,” पंतप्रधान म्हणाले. तामिळनाडू सरकारमधील मंत्र्याने केलेल्या विभाजनकारी टीकेचा संदर्भ देऊन पंतप्रधानांनी त्या राज्यावर असलेल्या विश्वासाचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की तामिळनाडू हे असे राज्य आहे जेथे राष्ट्रप्रेमाचा ओघ सतत वाहतो आहे. विरोधकांना असलेल्या नावांच्या मोहाबाबत उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक सरकारी योजना आणि महत्त्वाचे घटक एकाच कुटुंबाच्या सदस्यांच्या नावे होते याकडे निर्देश केला. पंतप्रधानांनी आय.एन.डी.आय.ए. आघाडीला ‘घमंडीया आघाडी’ म्हणजेच अहंकारी आघाडी असे संबोधून त्या आघाडीच्या भागीदारांमध्ये असलेला विरोधाभास अधोरेखित केला.
स्वातंत्र्य सैनिक आणि या देशाचा पाया रचणाऱ्या थोर नेत्यांनी नेहमीच घराणेशाहीच्या राजकारणाचा विरोध केला यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला. घराणेशाहीच्या व्यवस्थेमुळे सामान्य नागरिकाचे नुकसान होते. घराणेशाहीच्या राजकारणाचा अनेक महत्त्वाच्या नेत्यांना फटका सोसावा लागला असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की या पद्धतीच्या राजकारणाला बळी पडलेल्या अनेक महान नेत्यांच्या तैलचित्रांना देखील नंतरच्या काळातील बिगर-काँग्रेसी सरकारांच्या काळात संसदभवनात जागा मिळाली. पंतप्रधानांनी यावेळी स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि पंतप्रधान संग्रहालयाचा उल्लेख केला. हे संग्रहालय सर्व पंतप्रधानांप्रती समर्पित आहे आणि पक्षीय राजकारणापासून दूर आहे.
भारतीय जनेतेने 30 वर्षांनंतर दोन वेळा संपूर्ण बहुमतातील सरकार निवडून दिले असले तरीही एक ‘गरीब का बेटा’ म्हणजे गरीब घरातील मुलगा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसला आहे हे पाहून विरोधक अस्वस्थ आहेत याचा पंतप्रधान मोदी यांनी पुनरुच्चार केला. भूतकाळात विरोधकांनी केलेला विमाने आणि जहाजांचा गैरवापर आता थांबवण्यात आला असून आता ही विमाने तसेच जहाजे लसीच्या साठ्याची वाहतूक करण्यासाठी आणि परदेशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी वापरली जात आहेत याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.
अनेक गोष्टी मोफत मिळवण्यासाठी केल्या जाणाऱ्या राजकारणाविरुद्ध सर्वांना सावध करत पंतप्रधानांनी अशा राजकारणाने काय अनर्थ ओढवतो हे दाखवण्यासाठी शेजारी देशांचे उदाहरण दिले. अविवेकी आश्वासनांच्या बळावर निवडणुका जिंकण्याच्या प्रवृत्तीबाबत चिंता व्यक्त करत ते म्हणाले की अनेक विकास प्रकल्प रखडले असल्याने लोकांवर प्रचंड ताण आहे.
विरोधकाना मणिपूरमधील परिस्थितीबाबत चर्चा करण्यास कधीही स्वारस्य नव्हते असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की केंद्रीय गृहमंत्र्यांनी अत्यंत संयमाने आणि राजकारणाशिवाय ही समस्या तपशीलवारपणे विषद केली. गृहमंत्र्यांनी दिलेले स्पष्टीकरण म्हणजे देशाला वाटणारी चिंता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न होता आणि या सदनाला मणिपूरवर असलेला विश्वास त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न होता. समस्येवर चर्चा करून मार्ग काढण्याचा तो एक प्रामाणिक प्रयत्न होता असे पंतप्रधान म्हणाले.
मणिपूर प्रश्नाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की मणिपूरमध्ये होत असलेली हिंसा अत्यंत दुःखदायक आहे. “महिलांविरुध्द होणारे गुन्हे स्वीकारार्ह नाहीत आणि यामध्ये दोषी असणाऱ्यांना शिक्षा होईल याची सुनिश्चिती करण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आवश्यक पावले उचलतील. आम्ही करत असलेल्या प्रयत्नांच्या आधारावर मी देशातल्या जनतेला ग्वाही देतो की येत्या काळात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल,” पंतप्रधान म्हणाले. संपूर्ण देश आणि संसद भवन त्यांच्या पाठीशी उभे आहेत असा शब्द पंतप्रधानांनी मणिपुरमधील जनता, माता आणि मणिपूरच्या सुकन्यांना दिला. मणिपूर राज्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर परत आणण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी देखील ग्वाही पंतप्रधानांनी यावेळी दिली.
संसदेत भारतमातेबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्यांच्या विरोधात पंतप्रधानांनी तीव्र निषेध नोंदवला. ते म्हणाले की असेच लोक देशाच्या विभाजनाला जबाबदार आहेत आणि अशाच लोकांनी वंदे मातरमला देखील विरोध केला होता. विरोधकांच्या अपयशाचे उदाहरण म्हणून त्यांनी कच्चथीवू मुद्द्याचा देखील उल्लेख केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारताशी संबंधित तीन घटनांचा उल्लेख केला. पहिली घटना म्हणजे, 5 मार्च 1966 रोजी मिझोरमच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी हवाई दलाचा वापर करण्यात आला. दुसरी घटना म्हणजे 1962 मधील चिनी आक्रमणाच्या वेळी ईशान्येकडील जनतेला स्वतःच लढण्याची वेळ आली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी दिलेला रेडीओ संदेश. ईशान्य प्रदेशाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राम मनोहर लोहिया यांनी केला होता याचा देखील मोदी यांनी उल्लेख केला. विद्यमान सरकारच्या काळात, सत्ताधारी मंत्र्यांनी ईशान्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये 400 वेळा वस्ती केली आहे आणि पंतप्रधानांनी स्वतः देखील या भागाला 50 वेळा भेट दिली आहे अशी माहिती त्यांनी दिली. “ईशान्य प्रदेशाशी माझे भावनिक बंध आहेत. पंतप्रधान होण्याआधी देखील मी या भागात प्रवास केलेला आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला की मणिपूरमधील परिस्थिती अशा प्रकारे मांडली जात आहे की संघर्ष अलीकडेच उद्भवला आहे, परंतु मणिपूरमधील सर्व समस्यांचे मूळ काँग्रेस आणि त्याचे राजकारण यातच आहे. “मणिपूर समृद्ध भारतीय संस्कृती आणि वारसा यांनी ओतप्रोत भरलेले आहे.मणिपूरच्या भूमीने अनेक वेळा बलिदान दिले आहे,” असे ते म्हणाले. काँग्रेस सरकारच्या काळात राज्यातील प्रत्येक संस्था कट्टरवादी संघटनांच्या इशाऱ्यावर चालत होती आणि सरकारी कार्यालयात महात्मा गांधींचा फोटो लावण्यास सक्त मनाई होती, त्या काळाची आठवण त्यांनी सांगितली. मोइरांग येथील आझाद हिंद सेनेच्या संग्रहालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यावर झालेल्या बॉम्बस्फोटाचाही त्यांनी उल्लेख केला. मणिपूरच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत गाण्यास मनाई होती आणि तेथे वाचनालयातील पुस्तके जाळण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती तेव्हाची आठवणही त्यांनी सांगितली. काँग्रेस राजवटीत या प्रदेशात झालेल्या अतिरेकी कारवायांची अनेक उदाहरणे पंतप्रधानांनी दिली तसेच त्या काळात मंदिरांचे दरवाजे संध्याकाळी 4 वाजताच दरवाजे बंद केले जायचे याची आठवण केली. इंफाळमधील इस्कॉन मंदिरावर झालेल्या बॉम्बस्फोटात जीवितहानी झाली होती आणि या कट्टरवाद्यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून अतिरेक्यांना संरक्षण निधी दिला जात असे यांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
आगामी काळात ईशान्येकडील राज्ये विकासाचे केंद्र बनणार आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. जागतिक व्यवस्थेतील घडामोडी दक्षिण-पूर्व आशिया आणि आसियान देशांमध्ये बदल घडवून आणतील आणि त्याचा ईशान्येकडील राज्यांवर काय परिणाम होईल याची जाणीव असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच आमच्या सरकारने ईशान्येकडील राज्यांच्या विकासाला प्रथम प्राधान्य दिले आहे.” असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी ईशान्येकडील राज्यांतील पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीबाबत बोलताना आधुनिक महामार्ग, रेल्वे आणि विमानतळ या सुविधा कशा प्रकारे ईशान्येकडील राज्यांची ओळख बनत आहेत याचा उल्लेख केला. “आगरतळा पहिल्यांदाच रेल्वे संपर्क सुविधेने जोडले गेले, मालगाडी प्रथमच मणिपूरला पोहोचली, वंदे भारत सारखी आधुनिक ट्रेन पहिल्यांदाच या प्रदेशात धावली, अरुणाचल प्रदेशात पहिले हरित क्षेत्र विमानतळ बांधले गेले, सिक्कीम हवाई प्रवासाशी जोडले गेले, प्रथमच ईशान्येत एम्स उघडण्यात आले, मणिपूरमध्ये राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात आले तर मिझोराममध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन उघडले जात आहे, प्रथमच मंत्रिपरिषदेत ईशान्येचा सहभाग वाढला आणि प्रथमच एका महिला संसद सदस्याने राज्यसभेत नागालँडचे प्रतिनिधित्व केले याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. प्रथमच ईशान्येकडील लोकांना मोठ्या संख्येने पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि लचित बोरफुकन सारख्या नायकाचा पराक्रम प्रजासत्ताक दिनी साजरा करण्यात आला तसेच राणी गाय्दिन्युल्यू यांच्या नावाचे संग्रहालय स्थापन करण्यात आले,” असेही त्यांनी सांगितले.
“आमच्यासाठी, सबका साथ सबका विश्वास ही घोषणा नाही तर ती श्रद्धा आणि वचनबद्धता आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. “मी देशाच्या जनतेला खात्री देतो की, मी शरीराचा प्रत्येक कण आणि वेळेचा प्रत्येक क्षण देशवासीयांची सेवा करण्याच्या कामी समर्पित करीन,असेही ते म्हणाले.
“संसद हे कोणत्याही पक्षाचे व्यासपीठ नाही. संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. त्यामुळे संसद सदस्यांनी यासंदर्भात गांभीर्य बाळगणे अत्यावश्यक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला. बहुसंख्य संसाधने संसदेत समर्पित केली जातात, त्यामुळे इथला प्रत्येक सेकंद देशासाठी वापरला गेला पाहिजे. गांभीर्याअभावी राजकारण करता येते पण देश चालवता येत नाही, असेही ते म्हणाले.
गेल्या 9 वर्षात सामान्य नागरिकांचा विश्वास नव्या उंचीवर पोहोचला आहे आणि प्रत्येक भारतीय आत्मविश्वासाने भरलेला आहे, असे त्यांनी सांगितले. “आजचा भारत कोणत्याही दबावाला बळी पडत नाही. आजचा भारत वाकत नाही, थकत नाही आणि थांबतही नाही,” असे पंतप्रधान म्हणाले. नागरिकांनी विश्वास आणि संकल्पासह पुढे जावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले. सर्वसामान्यांचा विश्वासच जगाला भारतावर विश्वास ठेवण्यास प्रेरित करतो, असे ते म्हणाले. भारतावरील जगाच्या वाढत्या विश्वासाचे श्रेय त्यांनी सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढलेल्या विश्वासाला दिले.
गेल्या काही वर्षांत विकसित भारतचा भक्कम पाया रचण्यात सरकारला यश आल्याचे पंतप्रधान म्हणाले. हा भक्कम पायाच भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्यास सहाय्यक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश एकजुट करुन वाईट परिस्थितीतून बाहेर आला आहे हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यामुळे राजकीय पक्षांनी मणिपूरच्या भूमीचा क्षुल्लक राजकारणासाठी गैरवापर करू नये असे आवाहन त्यांनी केले. “आपण येथील लोकांच्या वेदना आणि दुःखांबद्दल सहानुभूती बाळगली पाहिजे. तसेच पुन्हा शांती बहाल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. हाच पुढचा मार्ग आहे,” असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले.
JPS/NC/Shailesh P/Sushama/Sanjana/Shraddha/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1947615)
Visitor Counter : 284
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam