राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मद्रास विद्यापीठाच्या 165 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 06 AUG 2023 12:51PM by PIB Mumbai

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (6 ऑगस्ट, 2023) चेन्नई येथील मद्रास विद्यापीठाच्या 165 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून संबोधित केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, 1857 मध्ये स्थापन झालेल्या मद्रास विद्यापीठाला भारतातील सर्वात जुन्या आणि  आधुनिक विद्यापीठांपैकी एक  होण्याचा मान मिळालेला आहे. या विद्यापीठाने ज्ञानाच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

मद्रास विद्यापीठाच्या समृद्ध इतिहासाचा आणि गौरवशाली वारशाचा संदर्भ देत राष्ट्रपती म्हणाल्या की, या संस्थेचे माजी विद्यार्थी जागतिक उत्कृष्टतेचे केंद्र बनून विद्यापीठाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. ते तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतात. राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, संस्थेच्या प्रगतीसाठी विद्यापीठाने माजी विद्यार्थ्यांच्या  संपर्कात राहून त्यांचे सहकार्य घ्यावे.

मद्रास विद्यापीठाने संशोधन आणि शैक्षणिक संस्कृतीला प्रोत्साहन दिले आहे असेही त्यांनी नमूद केले. मद्रास विद्यापीठाने अत्याधुनिक संशोधनात अधिक गुंतवणूक करावी, आंतर-विषय अभ्यासांना प्रोत्साहन द्यावे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्यांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन यावेळी राष्ट्रपतींनी केले. देशाला आणि जगाला भेडसावत असलेल्या समस्यांवर शिक्षणाधारित उपाय शोधण्यात मद्रास विद्यापीठ आघाडीवर असले पाहिजे,असे त्या म्हणाल्या.

सध्याच्या तीव्र स्पर्धेच्या वातावरणात, आपल्या युवकांना शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ठता सिद्ध करण्याचे असलेले दडपण, चांगल्या संस्थांमध्ये प्रवेश न मिळण्याची भीती, प्रतिष्ठेची नोकरी न मिळण्याची चिंता तसेच पालक आणि समाजाच्या अपेक्षांचा भार यामुळे तीव्र मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे, या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढ आणि कल्याणासाठी त्यांना प्रोत्साहन देणारे वातावरण तयार व्हावे याकरता आपण एक समाज म्हणून एकत्र येणे महत्त्वाचे आहे असे राष्ट्रपती  म्हणाल्या. विद्यार्थ्यांनी कोणत्याही चिंतेने कधीही विचलित होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जात रहावे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, शैक्षणिक संस्थांनी परस्पर  संवादाला चालना देणारे वातावरण निर्माण केले पाहिजे, जिथे कोणतीही भीती  न बाळगता विद्यार्थ्यांना आपल्या समस्या, मनातली भीती, चिंता आणि संघर्षांवर खुलेपणाने संवाद साधता आला पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र येऊन असे पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत जिथे आपल्या तरुणांना प्रेम, सन्मान आणि आत्मविश्वास प्राप्त होईल ज्यामुळे ते येणाऱ्या आव्हानांचा सामना धैर्याने करण्यास सक्षम होतील.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा -

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946198) Visitor Counter : 113