विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जगातील पसंतीचे, किफायतशीर आरोग्यसेवा केंद्र म्हणून भारत वेगाने उदयास येत आहे


प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, प्रत्यक्ष (फीजिकल) आरोग्यसेवा आणि एकात्मिक आरोग्यसेवा या क्षेत्रांमध्ये भारताने गेल्या नऊ वर्षांत आघाडी घेतली आहे, भारताची वैद्यकीय पर्यटन स्थळ म्हणूनही ओळख आहे: डॉ जितेंद्र सिंह

इंडियन अकॅडमी ऑफ  ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी हेड अँड नेक सर्जरीच्या वार्षिक परिषदेचे डॉ जितेंद्र सिंह यांनी केले उद्घाटन

Posted On: 05 AUG 2023 4:57PM by PIB Mumbai


 

जगातील पसंतीचे किफायतशीर आरोग्यसेवा केंद्र म्हणून भारत वेगाने उदयास येत आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि एकात्मिक आरोग्यसेवा या क्षेत्रात भारताने याआधीच आघाडी घेतल्याचे ते पुढे म्हणाले.

जम्मू येथे श्री माता वैष्णोदेवी नारायण सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलाच्या सभागृहात इंडियन अकॅडमी ऑफ ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी हेड अँड नेक सर्जरीच्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. कान, नाक, घसा तसेच डोके आणि मान यांच्याशी निगडित शस्त्रक्रिया शास्त्र म्हणजे ऑटोरहिनोलॅरिन्गोलॉजी.

आयुष्मान भारत ही जगातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा योजना असल्याचे ते म्हणाले. आणि आयुष्मान भारत योजनेच्या संकल्पनेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते असे प्रतिपादन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले. आयुष्मान भारत योजनेमुळे भारताने आरोग्याच्या क्षेत्रीय आणि विभागीय दृष्टिकोनातून बाहेर पडत सर्वसमावेशक गरजेवर आधारित आरोग्य सेवा देण्यापर्यंत मजल मारली आहे , असे त्यांनी सांगितले.

गेल्या 9 वर्षांत भारत एक किफायतशीर वैद्यकीय सेवेसाठी एक पसंतीचे स्थळ बनला आहे आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक आरोग्य सेवा सुधारणा आणि सक्षम तरतुदी केल्यामुळे हे शक्य झाले आहे, असे त्यांनी पुढे नमूद केले. पूर्वी भारत प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेसाठी ओळखला जात नव्हता परंतु आज भारताची लसीकरण केंद्र म्हणून ओळख निर्माण झाली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

विशेषत: शहरी-ग्रामीण भागात आरोग्य सेवांमध्ये असलेली तफावत दूर करणे ही काळाची गरज असून त्यासाठी आरोग्य सेवांसाठी पीपीपी (सार्वजनिक-खाजगी भागीदारी) मॉडेलला अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी  सरकारने 'डॉक्टर्स इन व्हील्स' यासारखे चांगले उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमुळे प्रत्येक माणसापर्यंत आरोग्यसेवा पोहोचत असल्याचे ते म्हणाले.

आरोग्यसेवेला या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, याचा अंदाज पुढे दिलेल्या आकडेवारीवरून लावता येईल- आधी केवळ 145 वैद्यकीय महाविद्यालये होती. आता या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 260 झाली असून 16 एम्स, शेकडो डायलिसिस केंद्रे आहेत.  स्टार्ट-अप व्यवस्था, अंतराळ तंत्रज्ञान (अलीकडे झालेले चांद्रयान-3 चे प्रक्षेपण), क्वांटम तंत्रज्ञान या क्षेत्रात भारताने अलीकडेच मोठी आगेकूच केली आहे असे डॉ. जितेंद्र सिंह पुढे म्हणाले.

***

R.Aghor/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1946111) Visitor Counter : 133