गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांच्या हस्ते ओडिशातील विविध विकास कामांचे लोकार्पण; कामाख्यानगर-दुबुरी विभागाचे 761 कोटी रूपये खर्चून रुंदीकरण करून चार मार्गिकांचे काम तसेच भुवनेश्वरमध्ये मोतर ते लाडूगाव मार्गे बाणेर रस्त्याच्या 34 कोटी रूपये खर्चाच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाची पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्याचा आणि काश्मीरला कायमचे भारताशी जोडण्याचा घेतला ऐतिहासिक निर्णय
“काश्मीर आज केवळ मुख्य प्रवाहात सामील झाला नाही तर काश्मीरमध्ये शांततेसह विकासाचा मार्गही झाला मोकळा”
देशाचा विकास आणि आर्थिक प्रगती महामार्गांशी जोडलेली आहे, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान मोदी यांचे देशातील महामार्गांच्या विकासासाठी मोठे काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला महत्त्व देण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही कमतरता नाही
“एकेकाळी हा संपूर्ण प्रदेश नक्षलवादाने त्रस्त होता, परंतु गेल्या 9 वर्षांत मोदी सरकारने राज्य सरकारांसह नक्षलवादावर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून त्याचे परिणाम दिसून येत आहेत” – केंद्रीय गृहमंत्री
नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारचा केंद्र सरकारला नेहमीच पाठिंबा, मोदी सरकार नक्षलवादाच्या विरोधात जोरदार लढा देण्यासाठी कटिबद्ध
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2023 4:08PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी आज कामाख्यानगर-दुबुरी विभागाचे रुंदीकरण करून चार मार्गिका समर्पित केल्या. या कामासाठी 761 कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच शाह यांनी भुवनेश्वर येथे मोतर ते बाणेर मार्गे लाडूगाव या रस्त्याच्या रुंदीकरण आणि मजबुतीकरणाची पायाभरणी केली. या कामासाठी 34 कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक आणि केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, 5 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 रद्द करण्याचा आणि काश्मीरला कायमचे भारताशी जोडण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. ते म्हणाले की, आज काश्मीर केवळ मुख्य प्रवाहात सामील झाला नाही तर तेथे शांततेसह विकासाचा मार्गही प्रशस्त झाला आहे.

कामाख्यानगर- डुबुरी चौपदरी मार्ग आज राष्ट्राला समर्पित करण्यात येत आहे. 51 किलोमीटर लांबीच्या या पल्ल्यासाठी 761 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गाद्वारे ओडिशातील खनिज समृद्ध अंगुल आणि ढेंकनाल जिल्ह्यांना उर्वरित राज्य आणि देशाशी जोडण्यासाठी हा महामार्ग महत्त्वाचा ठरेल, असे अमित शाह म्हणाले. देशाचा विकास आणि अर्थव्यवस्थेची वृद्धी महामार्गांशी जोडलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षात देशातील महामार्गांच्या विकासासाठी खूप काम केले आहे, असे सांगत, आज कालाहंडीतील मोतेर ते बाणेर मार्गे लाडूगाव या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणही सुरू झाले आहे, अशी माहिती शाह यांनी दिली. या 15 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम 34 कोटी रुपये खर्चून केले जाणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 9 वर्षात देशात पायाभूत सुविधांच्या विकासाला खूप महत्त्व देण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे. ते म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, असे पंतप्रधान मोदींचे मत आहे, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने जलद टॅगद्वारे जलद टोलवसुली, भूसंपादन प्रक्रियेतील कार्यक्षमता, विवादांचे जलद निराकरण, माहिती तंत्रज्ञानावर भर आणि निधीच्या पर्यायी पद्धती शोधून आणि शास्त्रोक्त दृष्टीकोन स्वीकारून महामार्गाच्या बांधकामाचा वेग वाढवला आहे. महामार्गांच्या निर्मितीमुळे देशातील आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.

मोदी सरकारने ओडिशासाठी अनेक विकास प्रकल्प सुरू केले आहेत ज्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, असे गृहमंत्र्यांनी सांगितलेएकेकाळी हा संपूर्ण प्रदेश नक्षलग्रस्त होता, परंतु गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारने राज्य सरकारसोबत मिळून नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि त्याचे परिणामही दिसून येत आहेत असे त्यांनी सांगितले. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी नक्षलवादावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला नेहमीच पाठिंबा दिला आहे, असेही गृहमंत्री म्हणाले.
***
R.Aghor/S.Bedekar/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1946053)
आगंतुक पटल : 187