राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपतींनी भोपाळमध्ये ‘उन्मेषा’ आणि ‘उत्कर्ष’ महोत्सवांचे केले उद्‌घाटन

Posted On: 03 AUG 2023 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट 2023

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 ऑगस्ट, 2023) मध्यप्रदेशातल्या भोपाळ येथे ‘उन्मेषा’ या आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सवाचे आणि ‘उत्कर्ष’ या लोक आणि आदिवासी कला महोत्सवाचे उद्‌घाटन केले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, साहित्य हे मानवाशी जोडले गेलेले आहे आणि ते मानवालाही परस्परांशी जोडते.  राष्ट्रपतींनी यावेळी स्पष्ट केले की, केवळ तेच साहित्य आणि कला अर्थपूर्ण आहेत ज्या 'मी' आणि 'माझं' याच्या पलीकडे जाऊन निर्माण झालेल्या आहेत किंवा सादर करण्यात आलेल्या आहेत. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्याचे इतर अन्य भाषांमध्ये भाषांतर केल्यास भारतीय साहित्य अधिक समृद्ध होईल, असेही त्या म्हणाल्या.

साहित्यानेच मानवतेचा दृष्टिकोन बहाल केला, जतन केला आणि पुढे नेला, असे राष्ट्रपती म्हणाल्या. साहित्य आणि कलेने संवेदनशीलता आणि करुणा जपली आहे, त्याचाच अर्थ मानवातली माणुसकी जपली आहे. मानवतेच्या रक्षणासाठी या सर्वात पवित्र मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल लेखक आणि कलाकार कौतुकास पात्र आहेत असेही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या ध्येयाला साहित्यानेच बळ दिले, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या अनेक लेखकांनी स्वातंत्र्य आणि नवजागरणाच्या कार्याला अभिव्यक्ती मिळवून दिली. भारतीय पुनर्जागरण आणि स्वातंत्र्यलढ्याच्या काळात लिहिलेल्या कादंबऱ्या, कथा, कविता आणि नाटके आजही तितकीच लोकप्रिय आहेत आणि त्यांचा आपल्या मनावर मोठा प्रभाव आहे असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

राष्ट्रपती म्हणाल्या की, अनेक आव्हानांना तोंड देत असलेल्या आजच्या जगात, आपण विविध संस्कृती आणि श्रद्धा असलेल्या लोकांमध्ये अधिक समज निर्माण करण्यासाठी प्रभावी मार्ग शोधले पाहिजेत. या कार्यात कथाकार आणि कवी  मध्यवर्ती भूमिका निभावू शकतात कारण साहित्यात आपले अनुभव जोडण्याची आणि मतभेदांच्या पलीकडे जाण्याची अद्वितीय क्षमता असते. त्या म्हणाल्या की, साहित्याच्या ताकदीचा उपयोग आपण आपले समान ध्येय निश्चित करण्यासाठी आणि आपला जागतिक समुदाय मजबूत करण्यासाठी केला पाहिजे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आदिवासी बंधू भगिनींची प्रगती गरजेची आहे. आदिवासी तरुण तरुणींनाही आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा आहे, त्यांना आपली संस्कृती, आचार, चालीरीती आणि नैसर्गिक वातावरण जपत विकासात भागीदार करण्यासाठी आपण सामूहिक प्रयत्न करायला हवेत.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

 

S.Patil/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1945580) Visitor Counter : 144