इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थेत भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि भारत हे भवितव्यही आहे- राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
Posted On:
29 JUL 2023 4:21PM by PIB Mumbai
सेमीकॉन इंडिया परिषद 2023 च्या दुसऱ्या दिवसाच्या सत्राची सुरुवात केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली. विद्यापीठे, स्टार्टअप्स, प्रमुख सेमीकंडक्टर कंपन्या आणि भारतातील सरकारचे विविध भागीदार यांचा समावेश असलेल्या हितधारकांना त्यांनी संबोधित केले.
देशामध्ये सेमीकंडक्टर उद्योगाने या संकल्पनेची सुरुवात झाल्यानंतर दोन वर्षांपेक्षाही कमी कालावधीत केलेल्या प्रगतीची चंद्रशेखर यांनी आपल्या भाषणात माहिती दिली. पुढील दशकात सेमीकंडक्टर क्षेत्रात एक भक्कम जागतिक देश बनण्याचे भारताचे लक्ष्य आहे, असे त्यांनी सांगितले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या पुंजीच्या आधाराने पुढील 10 वर्षात जागतिक सेमीकंडक्टर परिसंस्थेमध्ये एक भक्कम, क्रियाशील, जागतिक पातळीवर स्पर्धात्मक देश अशी ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचे भवितव्य उज्ज्वल आहे आणि सेमीकंडक्टर परिसंस्थेत भारत हेच भवितव्य आहे,” चंद्रशेखर यांनी विश्वास व्यक्त केला.
सेमीकंडक्टरसह महत्त्वाच्या तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये जपान आणि अमेरिकेसह इतर देशांसोबत भारताने कशा प्रकारे मजबूत भागीदारी करण्यात यश मिळवले आहे ही बाब राज्यमंत्र्यांनी अधोरेखित केली. गेल्या 15 महिन्यात भारत आणि इतर देशांमध्ये यापूर्वी कधीही न पाहिलेले ऐतिहासिक टप्पे सर करणाऱ्या महत्त्वाच्या गाठीभेटी आणि करार झाले आहेत.
“आमच्या पंतप्रधानांनी अमेरिकेला एक महत्त्वाची भेट दिली जिथे त्यांनी अध्यक्ष बायडेन यांच्यासोबत महत्त्वाच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानावर भर देणारा एक ऐतिहासिक करार केला. सेमीकंडक्टरसह इतर क्षेत्रांचा समावेश असलेला एक करार जपान सोबत देखील करण्यात आला,” अशी माहिती त्यांनी दिली.
सेमींकडक्टर संशोधनात भारताच्या प्रगतीविषयी बोलताना राजीव चंद्रशेखर यांनी ‘इंडिया सेमीकंडक्टर रिसर्च सेंटर’ च्या निर्मितीची माहिती दिली. “या संस्थेची रचना करण्यासाठी एकत्र काम करणाऱ्या मेहनती भागीदारांचे जाळे उभारण्याचे उद्दिष्ट आहे. आमच्या संशोधनविषयक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आम्हाला अपेक्षित असलेली संशोधन परिसंस्था निर्माण करण्यासाठी हे संशोधन केंद्र अतिशय महत्त्वाचे आहे,” असे ते म्हणाले.
सेमीकॉन इंडिया परिषद 2023च्या दुसऱ्या दिवशी अत्याधुनिक कौशल्यविषयक अभ्यासक्रम तयार करण्यासाठी नव्या भागीदारी तयार करणे, सेमीकंडक्टर परिसंस्थेमध्ये प्रोत्साहन लाभांसाठी दोन पात्र भागीदारांची निवड करणे आणि यामध्ये स्टार्टअप्सना चालना देणाऱे कार्यक्रम सुरू करणे अशा तीन महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
एका वार्ताहर परिषदेदरम्यान, सीडॅकने जगातील आघाडीची सेमीकंडक्टर आयपी कंपनी ‘आर्म’ सोबत भारतातील स्टार्टअप्सना सक्षम करण्यासाठी एका भागीदारीची घोषणा केली.
***
N.Chitale/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1944028)
Visitor Counter : 150