पंतप्रधान कार्यालय

गुजरातमधील गांधीनगर येथील सेमीकॉन इंडिया परिषद 2023 मधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर.

Posted On: 28 JUL 2023 2:30PM by PIB Mumbai

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अश्विनी वैष्णवजी, राजीव चंद्रशेखरजी, औद्योगिक क्षेत्रातील माझे सोबती माझे मित्र भाई संजय मेहरोत्राजी, यंग लीयू जी, अजित मनोचाजी, अनिल अग्रवालजी, अनिरुद्ध देवगनजी, मार्क पेपरमास्टर जी, प्रभु राजाजी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो.

या परिषदेत मला अनेक दीर्घ परिचित चेहरे दिसत आहेत. काही लोक असेही आहेत ज्यांना मी आज प्रथमच भेटत आहे. ज्याप्रमाणे वेळोवळी सॉफ्टवेअर अपडेट करणे आवश्यक असते, तसाच हा कार्यक्रम आहे. सेमीकॉन इंडिया च्या माध्यमातून उद्योगांबरोबरच तज्ञ आणि धोरणकर्त्यांबरोबरचे माझे संबंध नेहमी अपडेट होत राहतात. आणि मला वाटते की आपल्या संबंधांचे तादात्मीकरण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. सेमीकॉन इंडिया मध्ये देश विदेशातल्या अनेक कंपन्या आल्या आहेत, आपले स्टार्टप्स देखील आले आहेत. मी आपणा सर्वांचे सेमीकॉन इंडिया मध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. मी आत्ताच हे प्रदर्शन पाहिले. या क्षेत्रात किती प्रगती झाली आहे, कशाप्रकारे नव्या ऊर्जेसह नवे लोक, नव्या कंपन्या, नवी उत्पादने. मला खूपच थोडा वेळ मिळाला, पण माझा अनुभव खूपच भारावून टाकणार होता. मी सगळ्यांना आग्रह करू इच्छितो, गुजरातच्या युवा पिढीला विशेष आवाहन करतो की, हे प्रदर्शन आणखीन काही दिवस चालणार आहे, तेव्हा अवश्य या, जगामध्ये या नव्या तंत्रज्ञानाने काय ताकद निर्माण केली आहे ते चांगल्या प्रकारे समजून उमजून घ्या.

मित्रांनो,

आपण सर्वांनी मागच्या वर्षी सेमीकॉन इंडियाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये भाग घेतला होता. तेव्हा ही चर्चा होती की, भारतात सेमिकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक का केली पाहिजे? लोक प्रश्न विचारत होते 'गुंतवणूक का ?' आता आपण एका वर्षानंतर भेटत आहोत, तर हा प्रश्न बदलला आहे. आता 'गुंतवणूक का नाही?' असा प्रश्न विचारला जात आहे. आणि हा केवळ प्रश्न बदलला नाही, तर विचारांच्या वाऱ्याची दिशा देखील बदलली आहे. आणि दिशा बदलण्याचे हे काम तुम्ही सर्वांनी केले आहे, तुमच्या सर्वांच्या प्रयत्नांमुळे ही दिशा बदलली आहे. म्हणूनच मी इथे उपस्थित असलेल्या सर्व कंपन्यांनी हा विश्वास दाखवल्याबद्दल, हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन करतो. तुम्ही भारताच्या आकांक्षेबरोबर आपल्या भविष्याला जोडले आहे. तुम्ही भारताच्या सामर्थ्याशी आपल्या स्वप्नांना जोडले आहे. आणि, भारत कधीही कोणाला निराश करत नाही. एकविसाव्या शतकातील भारतामध्ये तुमच्यासाठी अनेक संधी आहेत. भारताची लोकशाही, भारताची लोकसंख्या आणि भारताकडून मिळणारा लाभांश तुमचा व्यापार दुप्पट तिप्पट वाढवणार आहे.

मित्रांनो,

तुमच्या उद्योगात मोअरच्या नियमाची बरेचदा चर्चा होते. मला या नियमाची तपशीलवार माहिती नाही. मात्र, घातांकीय विकास या नियमाचा गाभा आहे इतके मी जाणतो. आमच्याकडे एक म्हण आहे - दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती करणे. आणि हे काहीसे तसेच आहे. हीच घातांकीय वाढ आज आपण भारताच्या डिजिटल क्षेत्रात, इलेक्ट्रॉनिक उत्पादनात पाहत आहोत. काही वर्षांपूर्वी भारत या क्षेत्रात एक उदयोन्मुख खेळाडू होता. आज जागतिक इलेक्ट्रॉनिक उत्पादनात आपला वाटा अनेक पटीत वाढला आहे. 2014 मध्ये भारताचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन 30 बिलियन डॉलर पेक्षा देखील कमी होते. आज यात वाढ होऊन त्याने शंभर बिलियन डॉलरचा आकडा देखील पार केला आहे. केवळ दोन वर्षाच्या कालावधीतच भारतातून होत असलेली इलेक्ट्रॉनिक निर्यात दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. जो देश कधीकाळी मोबाईल फोनचा आयातदार होता, आता तो जगातील सर्वोत्तम मोबाईल फोन बनवत आहे आणि त्यांची निर्यात करत आहे.

आणि मित्रांनो,

काही क्षेत्रांमध्ये तर आपली वाढ मोअरच्या नियमापेक्षाही जास्त झाली आहे. 2014 पूर्वी भारतामध्ये केवळ दोन मोबाईल उत्पादक केंद्र होती. आज यांच्या संख्येत वाढ होऊन ती 200 पेक्षा जास्त झाली आहे. ब्रॉडबँड संपर्क सुविधेबाबत चर्चा करायची झाली तर, 2014 मध्ये भारतात या सेवेचे सहा कोटी वापरकर्ते होते. आज यांची संख्या वाढवून 800 मिलियन म्हणजेच 80 कोटी वापरकर्त्यांपेक्षा जास्त झाली आहे. 2014 मध्ये भारतात 250 मिलियन म्हणजेच 25 कोटी इंटरनेट जोडण्या होत्या. आज त्यांची संख्या वाढून 850 मिलियन म्हणजेच 85 कोटीहून अधिक झाली आहे, 85 कोटी. हे आकडे केवळ भारताची सफलता दर्शवत नाहीत तर हा प्रत्येक अंक तुमच्या उद्योगासाठी वाढत असलेल्या व्यापाराचा दर्शक आहे. सेमीकॉन उद्योग ज्या जगात, ज्या घातांकीय वाढीचे उद्दिष्ट ठेवून पुढे चालत आहे त्याच्या प्राप्तीमध्ये भारताची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

मित्रांनो,

आज जग चौथी औद्योगिक क्रांती - इंडस्ट्री 4.0 चा साक्षीदार बनत आहे. जेव्हा जेव्हा जगाने अशा प्रकारच्या औद्योगिक क्रांतीमधून संक्रमण केले आहे, तेव्हा तेव्हा त्याचा आधार कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातील लोकांची आकांक्षा हाच होता. पूर्वीची औद्योगिक क्रांती आणि अमेरिकेचे स्वप्न यामध्ये हेच नाते होते. आज चौथी औद्योगिक क्रांती आणि भारताची आकांक्षा यामध्ये हेच नाते मला दिसून येत आहे. आज भारतीय आकांक्षा भारताच्या विकासाला चालना देत आहे. आज भारत जगातील असा देश आहे जिथे हलाखीची गरिबी जलद गतीने समाप्त होत आहे. भारतातील लोक तंत्रज्ञान स्नेही देखील आहे आणि तंत्रज्ञान आत्मसात करण्यातही तितकेच जलद आहेत.

आज भारतात स्वस्त डेटा, गावागावात पोहोचत असलेल्या दर्जेदार डिजिटल पायाभूत सुविधा आणि निर्बाध विद्युत पुरवठा डिजिटल उत्पादनांचा खप अनेक पटीत वाढवत आहेत. आरोग्यापासून कृषी आणि लॉजिस्टिक पर्यंत, स्मार्ट तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित एका मोठ्या दृष्टिकोनावर भारत काम करत आहे. आपल्या इथे लोकसंख्येचा असा मोठा भाग आहे ज्यांनी भलेही कधी स्वयंपाक घरातील मूलभूत उपकरणे वापरली नसतील पण ते आता थेट इंटर कनेक्टेड स्मार्ट उपकरणांचा वापर करणार आहे. भारतामध्ये युवकांची मोठी संख्या आहे . शक्य आहे की त्यांनी कधी साधी बाईक देखील चालवली नसेल. आता मात्र ते स्मार्ट इलेक्ट्रिक वाहनांचा उपयोग करणार आहेत. 

भारतात वाढत चाललेला नव-मध्यमवर्ग, भारताच्या आकांक्षांचे उर्जाकेंद्र झालेला आहे. शक्यतांनी भरलेल्या भारतातील या प्रमाणविषयक बाजारपेठेसाठी आपल्याला चिप तयार करणारी परिसंस्था उभारायची आहे. आणि जो यामध्ये मुसंडी मारून पुढे जाईल त्याला प्रथम प्रयत्न केल्याबद्दलचा फायदा मिळणे निश्चित आहे याबद्दल मला विश्वास वाटतो.

मित्रांनो,

तुम्ही सर्वजण जागतिक महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाच्या दुष्परिणामांतून सावरत आहात. सेमीकंडक्टर ही काही फक्त आमची गरज नाही याची भारताला जाणीव आहे. जगाला देखील आज एका विश्वसनीय, विश्वासार्ह चिप पुरवठा साखळीची गरज आहे. आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाशिवाय दुसरा अधिक चांगला विश्वासार्ह भागीदार कोण असू शकतो? जगाचा भारतावरील विश्वास सतत वाढत आहे याबद्दल मला आनंद वाटतो. आणि हा विश्वास का आहे? आज घडीला भारतावर गुंतवणूकदारांचा विश्वास आहे कारण येथे स्थिर, जबाबदार आणि सुधारणा-केंद्रित सरकार आहे. भारतावर उद्योग जगताचा विश्वास आहे कारण आज भारतात प्रत्येक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा जलदगतीने विकास होत आहे. जगातील तंत्रज्ञान क्षेत्राचा भारतावर विश्वास आहे कारण भारतात तंत्रज्ञानाचा विस्तार अत्यंत वेगाने होतो आहे. आणि आज भारतावर जगातील सेमीकंडक्टर उद्योगाचा विश्वास आहे कारण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात प्रतिभावंतांचा साठा आहे, कुशल अभियंते आणि रचनाकार यांची शक्ती आहे. जी कोणी व्यक्ती जगातील सर्वात चैतन्यपूर्ण आणि एकात्मिक बाजारपेठेचा भाग होऊ इच्छिते तिचा भारतावर विश्वास आहे. जेव्हा आम्ही तुम्हांला ‘मेक इन इंडिया’ असे सांगतो तेव्हा त्यामध्ये ही गोष्ट देखील येते की, या, मेक फॉर इंडिया, मेक फॉर दी वर्ल्ड.

मित्रांनो,

भारताला स्वतःच्या जागतिक जबाबदारीची अत्यंत उत्तम जाणीव आहे. म्हणूनच सहकारी देशांसह एकत्र येऊन आम्ही एका व्यापक आराखड्याबाबत काम करत आहोत. आणि म्हणूनच आम्ही भारतात एक चैतन्यमयी सेमीकंडक्टर परिसंस्था निर्माण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत आहोत. नुकतीच आम्ही राष्ट्रीय क्वांटम अभियानाला मंजुरी दिली आहे. लवकरच संसदेत राष्ट्रीय संशोधन संस्थाविषयक विधेयक देखील सादर करण्यात येणार आहे. सेमीकंडक्टर परिसंस्था उभारण्यासाठी आम्ही आमच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमात देखील काही बदल घडवून आणत आहोत. सेमीकंडक्टर अभ्यासक्रमाच्या समावेशासाठी भारतातील 300 प्रसिद्ध अभियांत्रिकी महाविद्यालयांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. आमचा चिप्स ते स्टार्ट अप कार्यक्रम अभियंत्यांची मदत करेल. येत्या 5 वर्षांमध्ये देशात 1 लाखाहून अधिक डिझाईन अभियंते तयार होणार आहेत.भारतात वेगाने वाढत असलेली स्टार्ट अप परिसंस्था देखील सेमीकंडक्टर क्षेत्राला बळकटी देईल. सेमीकॉन इंडिया मध्ये सहभागी झालेल्या सर्वांसाठी या गोष्टी त्यांचा विश्वास दृढ करणाऱ्या, त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या आहेत.

मित्रांनो, तुम्ही सर्वजण कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स यांच्यामधील फरक उत्तम प्रकारे जाणता. कंडक्टर्समधून उर्जा प्रवाहित होऊ शकते, इन्सुलेटर्समधून तसे होऊ शकत नाही. सेमीकंडक्टर उद्योगासाठी एक चांगला उर्जा संवाहक होता यावे म्हणून भारत प्रत्येक आवश्यक बाबीची व्यवस्था करत चालला

आहे. या क्षेत्रासाठी विजेची गरज आहे. गेला एका दशकात आपली सौर उर्जा स्थापित क्षमता 20 पटीहून अधिक झाली आहे. हे दशक संपेपर्यंत देशात 500 गिगावॉट इतकी नवीकरणीय उर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट्य आम्ही निश्चित केले आहे. सौर पी.व्ही. मॉड्यूल्स, हरित हायड्रोजन तसेच इलेक्ट्रोलायझर यांच्या उत्पादनासाठी आपण अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. भारतात होत असलेल्या धोरणात्मक सुधारणांचा देखील सेमीकंडक्टर परिसंस्थेच्या उभारणीवर सकारात्मक प्रभाव पडेल. आम्ही नव्या उत्पादन उद्योगांसाठी विविध प्रकारच्या करमाफीची देखील घोषणा केली आहे. भारत आज, कॉर्पोरेट कराचे दर सर्वात कमी असणाऱ्या जगातील काही देशांपैकी एक आहे. आम्ही कर प्रक्रियेला चेहेराविरहित आणि सुरळीत रूप दिले आहे. व्यापार करण्यातील सुलभतेच्या मार्गात अडथळे ठरणारे अनेक जुने कायदे आणि आणि नियम आम्ही रद्द केले आहेत. सेमीकंडक्टर उद्योगासाठी सरकारने विशेष मदत देखील जाहीर केली आहे. हे निर्णय आणि ही धोरणे भारत सेमीकंडक्टर उद्योगासाठी पायघड्या घालत आहे याचेच निदर्शक आहेत. जसजसा भारत सुधारणांच्या मार्गावर आगेकूच करेल तसतसे तुम्हा सर्वांसाठी आणखीन नव्या संधी निर्माण होत जातील. सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी भारत एक उत्तम संवाहक होतो आहे.

मित्रांनो,

आपल्या या प्रयत्नांसोबतच भारत जागतिक पुरवठा साखळीच्या गरजांबाबत देखील सजग आहे. कच्चा माल, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री यांच्या संदर्भात तुमच्या अपेक्षा काय आहेत ते आम्हाला माहित आहे. म्हणूनच तुम्हा सर्वांसोबत एकत्रितपणे काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ज्या ज्या क्षेत्रात आम्ही खासगी उद्योगांसोबत एकत्र येईन काम केले आहे ती सर्वच क्षेत्रे नव्या उंचीवर पोहोचली आहेत. अवकाश क्षेत्र असो किंवा जिओस्पेशियल क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी आम्हाला अत्यंत उत्तम यश मिळाले आहे. तुमच्या लक्षात असेल गेल्या वर्षीच्या सेमीकॉन दरम्यान सरकारने सेमीकंडक्टर क्षेत्रात कार्यरत उद्योगांकडून शिफारसी मागवल्या होत्या. या शिफारसी विचारात घेऊन सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. सेमीकॉन इंडिया कार्यक्रमाअंतर्गत आम्ही जी मदत देत होतो त्यात आता वाढ करण्यात आली आहे. भारतात सेमीकंडक्टर निर्मिती सुविधा स्थापन करणाऱ्या तंत्रज्ञान कंपनीला आता पन्नास टक्के आर्थिक मदत दिली जाणार आहे. देशातील सेमीकंडक्टर क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्ही सतत धोरणात्मक सुधारणा करत आहोत.

मित्रांनो,

जी-20 समूहाचा अध्यक्ष या नात्याने देखील भारताने जी संकल्पना मांडली आहे ती आहे - एक प्रथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. भारताला सेमीकंडक्टर निर्मितीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या पाठीमागे देखील आमची हीच भावना आहे. भारताचे कौशल्य, भारताची क्षमता आणि भारताचे कर्तुत्व यांचा संपूर्ण जगाला लाभ व्हावा अशीच आमची इच्छा आहे. आम्ही एका अधिक उत्तम जगाच्या उभारणीसाठी, जागतिक हितासाठी भारताचे सामर्थ्य वाढवू इच्छितो आहोत. यासाठी तुम्हां सर्वांचा सहभाग, तुमच्या सूचना, विचार या सगळ्याचे आम्ही खूप खूप स्वागत करतो. भारत सरकार प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत उभे आहे. या सेमीकॉन परिषदेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मला वाटते की हीच संधी आहे,जसे मी लाल किल्ल्यावरुन देखील म्हणालो होतो की हीच योग्य वेळ आहे, देशासाठी देखील आणि जगासाठी देखील. खूप-खूप शुभेच्छा! धन्यवाद!  

***

MI/S. Mukhedkar/Sanjana/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943902) Visitor Counter : 101