युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
ग्रेटर नोइडा येथे भारताच्या यजमान पदात प्रथमच आयोजित होत असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठ वर्ग भारोत्तोलन अजिंक्यपद क्रीडास्पर्धांचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते आज झाले उद्घाटन
Posted On:
27 JUL 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2023
भारतात प्रथमच होत असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठ वर्ग भारोत्तोलन अजिंक्यपद क्रीडास्पर्धा 2023 चे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्या हस्ते आज 27 जुलै 2023 रोजी उद्घाटन झाले. या स्पर्धा ग्रेटर नोइडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठात आयोजित करण्यात आल्या आहेत.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 30 पेक्षा जास्त भारतीय भारोत्तोलक सहभागी होणार असून त्यापैकी अनेक खेलो इंडिया स्पर्धकांनी गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 61 पदकांची कमाई करून भारतातर्फे सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

या स्पर्धेविषयी बोलताना केंद्रीय मंत्री ठाकूर म्हणाले, “भारताच्या यजमानपदात या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन होत आहे आणि त्यात आशिया खंडातल्या 15 हून अधिक देशांतील 200 क्रीडापटू आणि 50 हून अधिक तांत्रिक कर्मचारी तसेच प्रशिक्षक सहभागी होत आहेत याचा मला खूप आनंद झाला आहे. अशा स्पर्धा भविष्यात क्रीडाक्षेत्रात यश मिळवण्यासाठीचा पाया आहेत. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व खेळाडूंना मी सुयश चिंततो.”

भारतीय भारोत्तोलक महासंघाची प्रशंसा करत केंद्रीय मंत्री म्हणाले, “इतक्या कमी कालावधीत एवढ्या मोठ्या अजिंक्यपद स्पर्धांचे आयोजन करणे सोपे नाही हे मी जाणतो. पण इच्छा असली की मार्ग सापडतोच आणि अध्यक्ष सहदेव यादव यांच्या नेतृत्वाखालील भारोत्तोलक महासंघाने ते सिध्द करून दाखवले आहे.”

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी यावेळी युवा खेळाडूंना अधिकाधिक सामर्थ्यासह स्पर्धेत उतरण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कर्णम मल्लेश्वरी, मीराबाई चानू यांसारख्या विविध आदर्श भारतीय भारोत्तोलाकांच्या यशस्वी कामगिरीविषयी देखील त्यांनी सांगितले. गेल्या काही काळात विविध खेलो इंडिया स्पर्धांमध्ये तसेच इतर स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकणाऱ्या मार्टिना देवी, हर्षदा गरुड आणि धनुष लोगनाथन यांसारख्या खेळाडूंच्या नव्या पिढीचे देखील त्यांनी अभिनंदन केले.
यावर्षीच्या आशियाई युवा आणि कनिष्ठ वर्ग भारोत्तोलन अजिंक्यपद क्रीडास्पर्धा 28 जुलै रोजी सुरु होणार असून 5 ऑगस्ट 2023 रोजी या स्पर्धांचा समारोप होणार आहे.
* * *
S.Kakade/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1943470)