सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग असलेल्या ‘मेरा गांव मेरी धरोहर” या अभिनव उपक्रमाची उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार सुरुवात


केंद्रीय संस्कृती मंत्रालयातर्फे राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग अभियानाअंतर्गत सुरु करण्यात येणारा अखिल भारतीय पातळीवरील उपक्रम

Posted On: 26 JUL 2023 4:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जुलै 2023

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा भाग असलेल्या ‘मेरा गांव मेरी धरोहर” या अभिनव उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. केंद्रीय संस्कृती मंत्रालयातर्फे राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग अभियानाअंतर्गत सुरु करण्यात येणारा हा अखिल भारतीय पातळीवरील उपक्रम आहे. उद्या कुतुबमिनार परिसरात आयोजित भव्य प्रोजेक्शन मॅपिंग कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अमित शाह या आभासी मंचाची अधिकृतरीत्या सुरुवात करतील. https://mgmd.gov.in हा आभासी मंच जनतेला भारताच्या गावांशी जोडण्यास मदत करेल.

केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राच्या (आयजीएनसीए) संयुक्त सहयोगाने राष्ट्रीय सांस्कृतिक मॅपिंग अभियानाअंतर्गत ‘माझे गाव, माझा वारसा’ (एमजीएमडी) या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. भारतातील 29 राज्ये तसेच 7 केंद्रशासित प्रदेश यांच्या क्षेत्रातील 6.5 लाख गावांचे व्यापक आभासी मंचावर सांस्कृतिक दृष्टीने मॅपिंग करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एमजीएमडीच्या माध्यमातून लोकांना भारताच्या वैविध्यपूर्ण तसेच चैतन्याने सळसळत्या सांस्कृतिक वारशामध्ये स्वतःला हरवून बसण्याची संधी मिळणार आहे.भारताची संस्कृती आणि परंपरा यांच्या प्रशंसेला प्रोत्साहन देणे तसेच ग्रामीण समुदायांचा आर्थिक विकास,सामाजिक एकोपा आणि कलाविषयक विकास यांसाठी मार्ग तयार करणे ही या प्रकल्पाच्या मागची मध्यवर्ती संकल्पना आहे.

उद्या नवी दिल्लीतील कुतुबमिनार येथे या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या शुभारंभाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्यांना भारताच्या वेगवेगळ्या खेड्यांची झलक आणि माहिती एका आभासी सहली द्वारे देण्यात येईल. येथील प्रदर्शन आणि विविध दुकाने सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत खुले राहतील, यातून विविध खेड्यांमधल्या सांस्कृतिक चमत्कारांची आकर्षक झलक दाखवली जाईल.  संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार्‍या या शुभारंभाच्या समारंभामध्ये कुतुब मिनारवर प्रोजेक्शन मॅपिंग शो देखील दाखवला जाईल, ज्यात भारतातील काही निवडक गावांच्या विविध संकल्पना यात अधोरेखित केल्या जातील.  याप्रसंगी पंचायती राज, ग्रामीण विकास मंत्रालय, पशुसंवर्धन मंत्रालयाचे मंत्री आणि इतर सन्माननीय पाहुणे देखील उपस्थित राहतील.

यावेळी मेरा गांव मेरी धरोहर (एमजीएमडी) पुरस्कृत चित्रपटाच्या माध्यमातून एक आकर्षक आणि प्रेरणादायी कथा सादर केली जाईल, ज्यामुळे आमच्या सांस्कृतिक मुळांशी असलेले नाते आणखी घट्ट होईल.  या कार्यक्रमात विविध गावांतील लोक आणि अमित शाह यांच्यातील "संवाद" देखील होणार आहे, ज्याद्वारे  भारतातील खेड्यांच्या हृदयाशी आणि आत्म्याशी संवाद साधण्याची एक आगळीवेगळी लोकांना मिळेल.  या संवादाचे सूत्रसंचालन आरजे शरत रेडिओ करणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाची सांगता प्रसिद्ध गायक जावेद अली आणि अन्वेशा यांच्या संगीत मैफिलीने होईल.

 

* * *

R.Aghor/Sanjana/Gajendra/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1942840) अभ्यागत कक्ष : 158