राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 प्रदान

Posted On: 24 JUL 2023 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज 24 जुलै 2023 रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रामध्ये आयोजित समारंभात, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आले. भूविज्ञान क्षेत्रात विविध आघाड्यांवर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आणि या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या गौरवार्थ खाण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार प्रदान केले जातात.

भूविज्ञान क्षेत्राची व्याप्ती अतिशय मोठी आहे. यामध्ये जमीन खचणे, भूकंप, पूर आणि त्सुनामी सारख्या नैसर्गिक आपत्तीच्या अभ्यासाचा देखील अंतर्भाव होतो. या विषयांना सार्वजनिक हिताचे भूविज्ञान म्हटले जाते कारण ते मोठ्या संख्येने लोकांच्या संरक्षणासाठी उपयुक्त आहे, असे राष्ट्रपती यावेळी संबोधित करताना म्हणाल्या.

खाणकाम हे आपल्या देशाच्या अर्थव्यस्थेचे प्राथमिक क्षेत्र आहे. खाणकाम विकासाचे आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान आहे. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने खाणकाम क्षेत्रात अनेक प्रगतीकारक बदल घडवून आणले. या बदलांमुळे या क्षेत्राची क्षमता आणि उत्पादकता वाढत आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

विज्ञान आणि विकासाचा मानवतेच्या हिताकडे जाणारा  मार्गच योग्य आहे. त्यामुळेच भूवैज्ञानिक समुदायाला मानव केंद्रित खनिकर्माच्या दिशेने मार्गक्रमण करत राहायला हवे, असे त्यांनी सांगितले. खनिजांच्या कार्यक्षम वापरात योगदान देऊन भारताची अर्थव्यवस्था मजबूत केल्याबद्दल राष्ट्रपतींनी भारतीय भूवैज्ञानिकांचे कौतुक केले.

आजकाल दुर्लभ पृथ्वी तत्व, प्लॅटिनम समूह तत्व आणि सेमिकंडक्टिंग तत्व यांसारख्या खनिजांवर विशेष लक्ष दिले जात आहे. पर्यावरण रक्षणाला प्राधान्य देण्याचे महत्व लक्षात घेऊन, काही पारंपरिक खनिजांचे खाणकाम आणि त्यांचे होणारे परिणाम यांचे नवीन दृष्टिकोनातून विश्लेषण केले जात आहे, असे त्या म्हणाल्या. आजच्या पुरस्कारांमध्ये शाश्वत खनिज विकासाच्या क्षेत्रातील योगदानाला महत्व दिल्याबद्दल त्यांनी खाण मंत्रालयाचे कौतुक केले. शाश्वत खनिज विकासासाठी आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण या तिन्ही बाबींवर समान लक्ष दिले जात आहे हे पाहून आनंद झाल्याचे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1942261) Visitor Counter : 145