रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्र सरकारने रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर लावण्याच्या चिन्हांकित फलकांसाठी मागर्दर्शक तत्वे जारी केली
Posted On:
21 JUL 2023 6:44PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने द्रुतगती महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर चिन्हांकित फलक लावण्याच्या सुविधेबाबत मागर्दर्शक तत्वे जारी केली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिलेल्या या मार्गदर्शक तत्वांमध्ये वाहनांच्या चालकांना सुधारित दृश्यमानता आणि अंतःप्रेरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोत्तम पद्धती आणि जागतिक मानकांचा समावेश करुन रस्त्यांवरील सुरक्षितता वाढवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.
या मार्गदर्शक तत्वांची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :
- वाढीव दृश्यमानता आणि सुवाच्यता : प्रतिकूल परिस्थितीत देखील महत्त्वाची माहिती चालकांना नीट दिसेल आणि समजेल याची सुनिश्चिती करून घेत, योग्य उंची/अंतरावर फलक लावणे, मोठ्या अक्षरांचा वापर, चालकांना त्वरित आकलन होईल अशी चिन्हे आणि छोटी बोधवाक्ये यांच्या माध्यमातून रस्त्यांवरील चिन्हांकित फलकांची दृश्यमानता वाढवण्याला प्राधान्य देण्यात यावे.
- अंतःप्रेरणादायी संवादासाठी चित्रमय वर्णन: अत्यावश्यक संदेश अधिक परिणामकारकतेने समजण्यासाठी शब्दांसोबत चित्रमय दृश्यांचा वापर करून त्यातून मर्यादित प्रमाणात साक्षर असणाऱ्यांसह रस्त्यांचा वापर करणाऱ्या विविध गटांना समजू शकेल अशा प्रकारे संदेश दिला जावा.
- प्रादेशिक भाषा: इंग्रजी तसेच प्रादेशिक भाषेचा वापर करून रस्त्यांवरील फलकांचे संदेश लिहिलेले असावेत, जेणेकरुन रस्त्यांचा वापर करणाऱ्या विविध प्रकारच्या लोकांमध्ये अधिक उत्तम संदेश वहन, चिन्हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्यातून वाहतुकीच्या नियमांचे पालन यांची सुनिश्चिती होऊ शकेल.
- लेनची शिस्त पाळण्यावर भर: चालकांना स्पष्ट आणि प्रेरणात्मक मार्गदर्शन करून त्यांना विहित लेनचा वापर करायला प्रोत्साहन देऊन तसेच वाहतुकीची कोंडी कमी करून लेनची शिस्त अधिक उत्तम प्रकारे पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे.
- टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी: सुरुवातीच्या टप्प्यात, ही मार्गदर्शक तत्वे नव्याने उभारले जाणारे सर्व महामार्ग, द्रुतगती महामार्ग आणि ग्रीनफिल्ड मार्गिका यांसाठी लागू करण्यात येतील. त्याबरोबरच, जेथे 20,000 पेक्षा अधिक प्रवासी गाड्यांची वाहतूक केली जाते अशा अधिक प्रमाणात वाहतूक होणाऱ्या महामार्गांना देखील या तत्वांच्या अंमलबजावणीसाठी प्राधान्य देण्यात येईल.
ही मार्गदर्शक तत्वे देशभरातील रस्ते वाहतुकीच्या मणक्यांमध्ये सुधारणा करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेला अधोरेखित करणारी आहेत. सर्वोत्तम पद्धती आणि जागतिक मानकांचा स्वीकार करून देशातील रस्त्यांचा वापर करणाऱ्या सर्वांना सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाचा अनुभव मिळवून देणे आणि भविष्यात न अपघात मुक्त रस्त्यांचे ध्येय साध्य करणे हा मंत्रालयाचा उद्देश आहे.
https://morth.gov.in/sites/default/files/circulars_document/Guidelines%20for%20provision%20of%20signages%20on%20Expressway%20and%20NHs%2020%20Jul%202023.pdf
***
S.Kane/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941593)
Visitor Counter : 183