विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

परदेशातील भारतीय समुदायाने भारताच्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे  - केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे आवाहन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सुरू केलेला वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) फेलोशिप कार्यक्रम या दिशेने आणखी एक पाऊल आहे: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

Posted On: 21 JUL 2023 4:01PM by PIB Mumbai

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह यांनी परदेशातील भारतीय समुदायाला भारताच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते आज गोव्यामध्ये संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या आठव्या मिशन नवोन्मेष मंत्री स्तरीय बैठक (MI-8) आणि चौदाव्या स्वच्छ ऊर्जा मंत्रीस्तरीय बैठकीला (CEM-14) संबोधित करताना बोलत होते. सुमारे तीस देशांचे प्रतिनिधी  या बैठकीला उपस्थित होते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सुरू केलेला वैश्विक भारतीय वैज्ञानिक (वैभव) फेलोशिप कार्यक्रम या दिशेने आणखी एक पाऊल असल्याचे ते यावेळी म्हणाले.

जागतिक आव्हानांचा उल्लेख करत डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, हवामानाबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी चालू दशकात नव-तंत्रज्ञानाचे मोठे नवोन्मेषी प्रयत्न दिसून येतील. 

केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले की आज जग पूर्वीपेक्षा अधिक एकमेकांशी जोडलेले आणि एकमेकांवर अवलंबून आहे, आणि अधिक लवचिकता निर्माण करण्यासाठी जगातील देशांमध्ये अधिक सहयोग आवश्यक आहे. ज्यायोगे जगातील अनेक देशांना परवडण्याजोग्या उपाययोजना विकसित करता येतील. 

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की, आमचे सध्याचे प्रयत्न हे स्वच्छ उर्जेला अधिक गतीने चालना देण्याच्या आणि जागतिक आणि खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्याच्या देशाच्या प्रयत्नांचा दाखला आहे. आपण सर्वांनी जागतिक स्तरावर, नवोन्मेषाला चालना देण्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प करूया, आणि आपल्या स्वच्छ आणि हरित ग्रहावर शाश्वत, जगण्यायोग्य भविष्य सुनिश्चित करण्यासाठी ऊर्जा क्षेत्रात आवश्यक बदल घडवून आणूया, असे ते म्हणाले.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, गोव्यामधील बैठकीनंतर उद्या जी20 ऊर्जा संक्रमण मंत्रीस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. जागतिक स्वच्छ ऊर्जा समुदायाचा जास्तीत जास्त सहभाग आणि सर्वोच्च स्तरावरील प्रतिबद्धता लाभावी, हे या  आयोजनाचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. 19 जुलै ते 22 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातील 40 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी गोव्यात एकत्र आले, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

***

S.Kane/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1941460)