विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
भारताने जगातील अद्ययावत पोलाद रस्ता तंत्रज्ञान विकसित केल्याचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन. विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद - सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI), नवी दिल्ली, एक क्रांतिकारी पोलाद स्लॅग पासून रस्ता तंत्रज्ञान विकसित करण्यात अग्रेसर आहे जे पोलाद प्रकल्पातील टाकाऊ पोलाद स्लॅगचा रस्ते बांधणीत मोठ्या प्रमाणात वापर सुलभ करते
पोलाद स्लॅगपासून तयार केलेले रस्ते भारतीय भूभागासाठी सर्वात योग्य, 30% स्वस्त आणि तिप्पट जास्त टिकतात: डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
17 JUL 2023 10:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2023
भारताने जगातील अद्ययावत पोलाद रस्ता तंत्रज्ञान विकसित केले आहे असे प्रतिपादन केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज केले. त्यांनी माहिती दिली की 1952 मध्ये स्थापना झालेली नवी दिल्लीची विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)- सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI) ही पोलाद प्रकल्पातील टाकाऊ पोलाद स्लॅग, भुग्याचा रस्ते बांधणीत मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुलभ करणाऱ्या क्रांतिकारी पोलाद भुग्यापासून रस्ता तंत्रज्ञान विकसित करण्यात अग्रेसर ठरली आहे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (सीआरआरआय), केंद्रीय पोलाद मंत्रालय, नीती आयोग, आणि हजीरा येथील आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील (AM/NS) यांच्या संयुक्त उद्यम प्रकल्पाचा भाग म्हणून जून 2022 मध्ये, प्रक्रिया केलेल्या पोलाद भुग्यापासून (औद्योगिक कचरा) रस्ता निर्मिती करण्यात गुजरातमधील सूरत हे देशातील पहिले शहर बनले आहे असे मंत्र्यांनी सांगितले.
पोलाद संयंत्रात पोलाद बनविण्याच्या प्रक्रियेदरम्यान धातूपासून वितळलेल्या अशुद्ध गाळापासून हा भुगा बनलेला असतो.
डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, रस्ते तयार करण्यासाठी पोलाद स्लॅग तंत्रज्ञान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “वेस्ट टू वेल्थ” मंत्राशी सुसंगत आहे. “हा नाविन्यपूर्ण तांत्रिक उपक्रम टाकाऊ पोलाद स्लॅग आणि अशाश्वत खाणकाम आणि नैसर्गिक समुच्चय उत्खननामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या समस्येला देखील संबोधित करतो. सीआरआरआय ने रस्ते बांधणीत टाकाऊ पदार्थांचा शाश्वत वापर करण्यासाठी अनेक प्रमुख तंत्रज्ञान विकसित केले आहे,” ते म्हणाले.
सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) भारत-चीन सीमेवरील अरुणाचल प्रदेशात दीर्घकाळ टिकणारा अवजड वाहतुकीचा रस्ता तयार करण्यासाठी पोलाद स्लॅग चा वापर केला. भारतातील सर्वात मोठी रस्ते बांधणी संस्था, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NH-66 (मुंबई-गोवा) वर पोलाद स्लॅग पासून रस्ता तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली.
आज नवी दिल्लीतील सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पोलाद स्लॅग पासून तयार केलेल्या रस्त्याची किंमत पारंपरिक फरसबंदीपेक्षा 30% स्वस्त आहेच पण ते अधिक टिकाऊ आणि हवामानातील बदलांना प्रतिरोधक देखील आहेत.
“तीन ते चार वर्षे टिकणाऱ्या बिटुमेन रस्त्यांच्या तुलनेत पोलाद स्लॅग पासून तयार केलेले रस्ते दहा वर्षे टिकतात असे आढळून आले आहे, त्यामुळे देखभालीचा खर्च झपाट्याने कमी होतो.
भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा पोलाद उत्पादक देश आहे. प्रति टन पोलाद उत्पादनासाठी सुमारे 200 किलो पोलाद स्लॅग घनकचरा म्हणून तयार होते. देशात पोलाद स्लॅगची निर्मिती दरवर्षी सुमारे 19 दशलक्ष टन आहे आणि 2030 पर्यंत 60 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणावरील पोलाद स्लॅग हा पोलाद सयंत्र आणि आजूबाजूला मोठमोठ्या ढिगाऱ्याच्या स्वरूपात साचते आणि हवा, पाणी आणि जमीन प्रदूषणाचा स्त्रोत ठरली आहे. प्रक्रिया केलेले पोलाद स्लॅग रस्ता बांधकामासाठी नैसर्गिक समुच्चयांचा पर्यावरणपूरक किफायतशीर पर्याय प्रदान करते.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940327)
Visitor Counter : 158