आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

येत्या 20 आणि 21 जुलै रोजी नवी दिल्ली येथे जी 20 जागतिक खाद्य नियामक शिखर परिषदेचे आयोजन, अशा प्रकारची भारतात होणारी पहिलीच शिखर परिषद


केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी जी 20 जागतिक खाद्य नियामक शिखर परिषद 2023 चा लोगो आणि ब्रोशर यांचे केले अनावरण

ही जागतिक खाद्य नियामक शिखर परिषद अन्न सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण पैलूवर लक्ष केंद्रित करेल: डॉ. मनसुख मांडविया

Posted On: 17 JUL 2023 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जुलै 2023

 

जी 20 परिषदेचा एक भाग म्हणून जागतिक खाद्य  नियामक शिखर परिषद-2023 प्रथमच दिल्लीत आयोजित केली जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) पुढाकाराने येत्या 20 आणि 21 जुलै 2023 रोजी माणेकशॉ सभागृह, नवी दिल्ली येथे ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया, यांनी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, प्रा. एस पी सिंह बघेल यांच्या उपस्थितीत  या शिखर परिषदेच्या लोगोचे अनावरण केले. अशा प्रकारची शिखर परिषद प्रथमच, इटलीच्या रोम शहराबाहेर होत आहे. ही जागतिक खाद्य  नियामक शिखर परिषद अन्न सुरक्षेसंबंधीच्या  महत्त्वपूर्ण पैलूवर लक्ष केंद्रित करेल, ज्यावर अन्न सुरक्षे इतकेच लक्ष देणे आवश्यक असल्याचे मांडविया म्हणाले. ही शिखर परिषद 40 हून अधिक देशांतील अन्न नियामकांना सहकार्य करण्यासाठी आणि एकत्र काम करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करेल असंही ते  यावेळी म्हणाले. या शिखर परिषदेत 30 आंतरराष्ट्रीय संस्था आणि 25 आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था/विद्यापीठांचे प्रतिनिधी देखील सहभागी होणार आहेत.

यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की, एकत्रित  प्रयत्नांद्वारे, या शिखर परिषदेच्या माध्यमातून जागतिक अन्न सुरक्षा मानके निश्चिती,नियामक आराखड्यातल्या सुधारणा आणि जगभरातील ग्राहकांसाठी सुरक्षित आणि उच्च-गुणवत्तेच्या भोजनाची शाश्वती शक्य होईल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा.एस पी सिंह बघेल यांनी या परिषदेचे  महत्व विषद करताना सांगितले  की “ही शिखर परिषद भारताच्या जी 20 (G20) अध्यक्षपदाच्या एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेशी सुसंगत आहे. सर्वे भवन्तु सुखिनः अशी भारताची परंपरा नेहमीच राहिली आहे आणि ही शिखर परिषद त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.”

या शिखर परिषदेमध्ये विविध देश,आंतरराष्ट्रीय संस्था आणि राष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध भागधारकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे.

ही शिखर परिषद अनेक महत्त्वाच्या उपक्रमांच्या शुभारंभाची साक्षीदार ठरेल, ज्या उपक्रमांच्या माध्यमातून अन्न सुरक्षे संबंधी माहिती पोहोचवण्यात  आणि सामायिक करण्यात  क्रांती घडवेल.

 

* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940299) Visitor Counter : 114