शिक्षण मंत्रालय

शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते तिसऱ्या सिंगापूर - भारत हॅकेथॉनच्या विजेत्यांचा सत्कार

Posted On: 16 JUL 2023 9:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2023

 

ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषच्या सामर्थ्यासह  भारत आणि सिंगापूर हे दोन्ही देश भविष्यासाठी सज्जता, परस्परांची  समृद्धी आणि जागतिक कल्याणाला चालना देण्यासाठी वचनबद्ध – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान

भारताचे शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि वित्त मंत्री लॉरेन्स वोंग यांच्या हस्ते आज गुजरातमधील गांधीनगर येथे तिसऱ्या सिंगापूर - भारत  हॅकेथॉनच्या  विजेत्यांचा सत्कार करण्यात आला.

गुजरातमधील आयआयटी गांधीनगर येथे जी 20 अध्यक्षतेअंतर्गत आयोजित हॅकेथॉनच्या अंतिम फेरीत भारत आणि सिंगापूरमधील सर्वोत्कृष्ट स्टार्टअप्स आणि विद्यार्थी एकत्र आले होते.  600 हून अधिक विद्यार्थी, स्टार्ट-अप, गुंतवणूकदार, धोरणकर्ते, कॉर्पोरेट्स आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रधान म्हणाले की, ज्ञान ही शक्ती आहे. ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या  सामर्थ्यासह भारत आणि सिंगापूर हे दोन्ही देश भविष्यासाठी उत्तम प्रकारे तयारी करण्यासाठी, परस्परांच्या समृद्धीसाठी आणि जागतिक कल्याणाला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहेत, असे प्रधान म्हणाले.

ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष या तीन स्तंभांवर आधुनिक काळातील विकास  अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था म्हणून सिंगापूरने गेल्या 30-40 वर्षांमध्ये ज्ञान आणि शिक्षणातील उत्कृष्टतेच्या माध्यमातून स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणले  आहे, असे ते म्हणाले.

सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि वित्त मंत्री लॉरेन्स वोंग म्हणाले की सिंगापूर-भारत हॅकेथॉन अद्वितीय आणि बहुमोल असून  दोन्ही देशांच्या नेत्यांचा त्याला  पाठिंबा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ती साकार झाली  आहे.

धर्मेंद्र प्रधान आणि लॉरेन्स वोंग यांनी 'शाळेपासून कौशल्यापर्यंत ' सर्व क्षेत्रांमध्ये सहभाग अधिक वृद्धिंगत करण्याबाबत अर्थपूर्ण चर्चा केली. शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाचे एकत्रीकरण, महत्वपूर्ण  कौशल्यासह  युवकांना सशक्त बनवणे, भविष्यात तग धरू शकेल असे मनुष्यबळ उभारणे , शैक्षणिक संस्था,शिक्षक आणि प्रशिक्षक यांची  क्षमता वृद्धी  , संशोधन आणि नवोन्मेष  सहकार्य यासारख्या भारताच्या प्राधान्यक्रमांवर चर्चा केली.

   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी एक लेखी संदेश पाठवला, “एनटीयू  सिंगापूर-भारत हॅकेथॉन 2023 बद्दल ऐकून मला आनंद झाला. भारताच्या  G20  अध्यक्षपदाच्या काळात या हॅकेथॉनचे आयोजन झाले आहे . 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' हा जी 20 अध्यक्षपदाचा मंत्र असून वसुधैव कुटुंबकम ही  प्राचीन भारतीय संकल्पना यातून प्रतीत होत  आहे, ज्याचा अर्थ आहे संपूर्ण जग एक कुटुंब आहे. सामायिक भविष्य घडवण्यासाठी एकत्र येणे हे या संकल्पनेचे सार आहे.  सिंगापूर-भारत हॅकेथॉन हा या उदात्त विचारांचे प्रतिनिधित्व करणारा एक उपक्रम आहे.”

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1940039) Visitor Counter : 123