विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
चांद्रयान - 3 चे यशस्वी प्रक्षेपण अंतराळसंबंधी स्टार्टअप्स आणि अंतराळ उद्योजकांना प्रोत्साहन देईल - केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचे प्रतिपादन
Posted On:
15 JUL 2023 5:25PM by PIB Mumbai
चांद्रयान - 3 चे यशस्वी प्रक्षेपण, अंतराळ स्टार्टअप्स आणि अंतराळ उद्योजकांना प्रोत्साहन देईल, असे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान; पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे.
ते आज येथे जी - 20 युवा उद्योजक आघाडी परिषदेला मार्गदर्शन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली अंतराळ क्षेत्र खाजगी सहभागासाठी खुले केले. त्यानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतातील पहिले खाजगी उपकक्षीय (व्हीकेएस) रॉकेट विक्रम यशस्वीपणे प्रक्षेपित करून इतिहास रचला होता. अंतराळ उद्योजकतेच्या नव्या युगाची नांदी देण्यासाठी संयुक्तपणे आकर्षक स्टार्टअप उपक्रमांच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रातील शक्यतांचा शोध घेण्याचे आवाहन त्यांनी जी - 20 राष्ट्रांच्या तरुण वैज्ञानिक आणि तरुणांना केले.
भारताने आत्तापर्यंत 424 परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यापैकी 389 उपग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गेल्या नऊ वर्षातील कार्यकाळात प्रक्षेपित केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. इस्रोने पीएसएलव्ही आणि जीएसएलव्ही-एमकेIII प्रक्षेपक व्यावसायिक करारांतर्गत, जानेवारी 2018 पासून आजपर्यंत कोलंबिया, फिनलंड, इस्रायल, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड, सिंगापूर, स्पेन आणि स्वित्झर्लंड या देशांच्या उपग्रहांबरोबरच अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, जपान, रिपब्लिक ऑफ कोरिया या प्रमुख G - 20 देशांचे 200 पेक्षा जास्त परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहेत.
विशेषत: जी - 20 देशांमध्ये अंतराळ आणि इतर संबंधित क्षेत्रातील व्यवसायाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सार्वजनिक-खाजगी सहभागाचे आवाहन डॉ जितेंद्र सिंह यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिकेच्या दौऱ्यात, अमेरिका भारताला अवकाश संशोधनात समान भागीदार आणि सहयोगी मानते, हे स्पष्ट झाल्याचे डॉ जितेंद्र सिंह यांनी निदर्शनास आणून दिले. नासा आज भारताच्या अंतराळवीरांचा आग्रह धरत आहे. येथे भारताचे स्थान अधोरेखित होत असून हा सुद्धा भारताच्या महान अंतराळ यात्रेचा पुरावा आहे असे ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी काल फ्रान्स दौऱ्याची सांगता केली. आपल्या या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी महत्वाच्या क्षेत्रात सहकार्याबाबत चर्चा केली. अंतराळ, सुरक्षा, नागरी आण्विक तंत्रज्ञान, दहशतवादाविरोधातला लढा, सायबर सुरक्षा, हवामान बदल आणि पुरवठा साखळी या मुद्द्यांबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
परिषदेच्या संकल्पनेबाबत डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की जी - 20 चे अध्यक्षपद भारताकडे असताना आज भारताची आणि पंतप्रधानांची भूमिका आणि महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि येत्या 10-15 वर्षांत ती तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असू शकेल, असे ते म्हणाले.
भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांचे मजबूत जाळे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ असल्याबद्दल डॉ जितेंद्र सिंग यांनी अभिमान व्यक्त केला. वैज्ञानिक आणि तांत्रिक मनुष्यबळाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 1000 पेक्षा जास्त विद्यापीठे आहेत. जीडीपीच्या टक्केवारीचा विचार करता भारताचा जीईआरडी सुमारे 0.65 टक्के आहे असे ते म्हणाले.
भारतामधील विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात काम करणाऱ्या समुदायाला भारतीय शैक्षणिक तसेच संशोधन आणि विकास संस्थांशी जोडून संशोधन उपक्रम राबवण्याकरता भारत सरकारने नवीन फेलोशिप योजना सुरु केली आहे, ज्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील माहिती, ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाण-घेवाण व्हायला मदत होईल, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (DST) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय एकत्र येऊन वैश्विक भारतीय वैज्ञानिक (VAIBHAV) फेलोशिप कार्यक्रम राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या जागतिक अहवालाचा संदर्भ देत डॉ जितेंद्र सिंग म्हणाले की भारताने गेल्या 15 वर्षांत सुमारे 415 दशलक्ष लोकांना गरिबीपासून मुक्त केले आहे, आणि यासाठी संयुक्त राष्ट्रासारख्या संघटनेने भारताची प्रशंसा केली आहे. याचे मोठे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षांत सरकारने हाती घेतलेल्या विविध योजनांना असल्याचे ते म्हणाले.
प्रश्नोत्तराच्या सत्रात डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की भारताकडून जगाच्या अपेक्षा वाढू लागल्या आहेत आणि हे सर्व वेगाने घडते आहे. कोविड साथरोगाचे उदाहरण देताना ते म्हणाले की जगातील पहिली डीएनए लस तयार करून जगाला देणारा आणि लसीकरणासाठी कोविन (COWIN) व्यासपीठ उपलब्ध करून देणारा भारत हा जगातील पहिला देश होता.
भारताने केवळ हायड्रोजन मिशन सुरु केले नाही, तर सौर ऊर्जा संघटनेमधील महत्वाच्या देशांपैकी तो एक आहे, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतेच मंजूर केलेले राष्ट्रीय क्वांटम मिशन देखील विज्ञान क्षेत्रामधील भारताच्या लक्षवेधी प्रगतीचे निदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
शाश्वत जग: 2047 - विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका, ही परिषदेची संकल्पना स्पष्ट करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की एक जागतिक समुदाय म्हणून, कॉप (COP) 26 ची नेट झिरो उद्दिष्टे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांप्रति (SDG) आपले वैयक्तिक आणि सामुदायिक उत्तरदायित्व आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे याला चालना देणारे प्रमुख घटक ठरतील.
आपल्या भाषणाचा समारोप करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की या परिषदेची संकल्पना ‘हम’, म्हणजेच ‘आपण’ अशी आहे. खरोखरच आपण एक पृथ्वी, एक कुटुंब आहोत, आणि याच भावनेने, भारत आपल्या G-20 अध्यक्षतेखाली, ग्लोबल साउथ मधील इतर देशांबरोबर आपली माहिती, ज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी वचनबद्ध आहे. मानवता आणि हवामान बदलाबाबत जगाला असलेली चिंता आपण जाणतो, आणि म्हणूनच सर्व मतभेद दूर सारून मानवतेसाठी काम करायला आपण एकत्र यायला हवे. विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.
***
M.Pange/V.Ghode/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1939841)
Visitor Counter : 302