गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

शहरी नियोजनाशी संबंधित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत टीओडी, स्थानिक क्षेत्र योजना तसेच वर्ष 2041 पर्यंत दिल्ली शहराच्या घडणीसाठीच्या महायोजनेवर आधारित तांत्रिक सत्रांचे आयोजन


सूरत आणि पुणे या शहरांमधील शहर नियोजन योजनेची अंमलबजावणी, झिरो व्हॅलीमधील पर्यावरणदृष्ट्या शाश्वत महायोजनेची अंमलबजावणी यांसारख्या प्रकल्पांचे होणार सादरीकरण

पुण्याच्या सीओईपी तर्फे महाबळेश्वर येथील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे नियोजन, आयआयटी खरगपूर या संस्थेतर्फे राबवण्यात येणारा नागरी पुनर्विकास आणि वारसा संवर्धनविषयक प्रकल्पांचे होणार प्रदर्शन

Posted On: 12 JUL 2023 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

नवी दिल्ली येथे होणार असलेल्या, शहरी नियोजनाशी संबंधित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी 700 हून अधिक व्यक्तींनी स्वारस्य दर्शवले आहे. राज्य नागरी विकास विभागांचे मुख्य सचिव, मुख्य शहर नियोजनकार, राज्य टीसीपी विभाग, नागरी विकास अधिकारी तसेच नागरी स्थानिक संस्था आणि प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांचा त्यात समावेश आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे 13 आणि 14 जुलै 2023 या दिवशी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात शहरी नियोजनावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.देशभरात अभिनव पद्धतीच्या नागरी नियोजन पद्धतींमध्ये विविध उत्कृष्ट प्रयत्न आणि उपक्रम दिसून येत असल्याने या परिषदेमुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नागरी नियोजनाच्या उत्तमोत्तम पद्धती राबवण्याबाबतचे त्यांचे अनुभव सामायिक करण्याची संधी या परिषदेमुळे मिळणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. शहरी नियोजन क्षेत्रात कार्यरत असणारे जीआयझेड आणि जेआयसीएसारखे इतर भागधारक देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.

या परिषदेत राज्य टीसीपी विभाग तसेच नागरी विकास विभागातील मुख्य शहर नियोजनकारांकडून 24 सादरीकरणे केली जातील. शहर नियोजनाच्या क्षेत्रातील प्रमुख शिक्षणतज्ञांतर्फे महत्त्वाच्या वक्त्यांच्या व्याख्यानांचा समावेश असलेल्या 4 तांत्रिक सत्रांचे संचलन केले जाईल.

हे वक्ते पुढील विविध संकल्पनांच्या विस्तृत श्रेणीतील विषयांवर त्यांचे  विचार मांडतील:

टीओडी अर्थात स्थलांतराधारित विकास, हस्तांतरणीय विकास हक्क, स्थानिक क्षेत्र योजना आणि शहर नियोजन योजना, परवडणारी घरे,पर्यावरणदृष्ट्याशाश्वत विकास (स्पाँज सिटीज), एनसीआर योजना – 2041 आणि वर्ष 2041 पर्यंत दिल्लीचा विकास घडवण्यासाठीची महायोजना-2041.

आर्थिक घडामोडींना चालना देऊन शहरी अर्थव्यवस्था बळकट करणारा शाश्वत योजनाबद्ध विकास साधण्यासाठी शहरी नियोजनविषयक साधनांना गती देण्याबाबत या परिषदेत चर्चा होईल.

सदर परिषदेच्या काळात एका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश प्रशासने आणि शहरी नियोजनाशी संबंधित शैक्षणिक संस्था विविध शहरांमध्ये त्यांच्यातर्फे हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची माहिती देतील. चेन्नई येथील स्थलांतराधारित विकास प्रकल्पाची अंमलबजावणी, इंदोर आणि चेन्नई येथील स्थानिक क्षेत्र योजनेची अंमलबजावणी, सुरत आणि पुणे या शहरांमधील शहर नियोजन योजनेची अंमलबजावणी, झिरो व्हॅलीमधील पर्यावरणदृष्ट्या शाश्वत महायोजनेची अंमलबजावणी इत्यादी प्रकल्पांचे सादरीकरण या परिषदेत केले जाणार आहे. त्याशिवाय, राज्य नागरी नियोजनविषयक शैक्षणिक संस्था पुढील काही प्रकल्पांचे प्रदर्शन करतील, उदा, सीईपीटी विद्यापीठातर्फे जयपूर आणि गुवाहाटी या शहरांमध्ये स्थानिक क्षेत्र योजना आणि शहर नियोजन योजना यांची सुरुवात, पुण्याच्या सीओईपी तर्फे महाबळेश्वर येथील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्राचे नियोजन, आयआयटी खरगपूर या संस्थेतर्फे राबवण्यात येणारा नागरी पुनर्विकास आणि वारसा संवर्धनविषयक प्रकल्प आणि विजयवाडा येथील नियोजन तसेच वास्तुकला विद्यालयातर्फे लवचिक आणि समावेशक समुदाय उभारणी.

या दोन दिवसीय कार्यशाळेतील चर्चेतून राज्य सरकारे तसेच केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना शहरी नियोजनविषयक अनुभव सामायिक करणे शक्य होईल आणि त्याचा परिणाम म्हणून शहरी भागातील नागरिकांच्या हितासाठी शहरी नियोजनविषयक सुधारणा लागू करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक आराखडा तयार करण्यासाठी त्यांना उपयुक्त माहिती मिळू शकेल.

 

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939033) Visitor Counter : 132


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu