पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात दौरा ( 13-15 जुलै , 2023)

Posted On: 12 JUL 2023 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जुलै 2023

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 13-15 जुलै 2023 दरम्यान फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीच्या  (यूएई  ) अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान ,13-14 जुलै 2023 दरम्यान पॅरिसला भेट देतील. पंतप्रधान 14 जुलै 2023 रोजी बॅस्टिल डे संचलनाला  सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत , या संचलनात  तिन्ही सेवांमधील भारतीय सशस्त्र दलांचे एक पथक  सहभागी होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याशी औपचारिक चर्चा करणार आहेत.  राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी पंतप्रधानांच्या सन्मानार्थ  मेजवानीचे  तसेच खाजगी स्नेहभोजनाचे  आयोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सचे पंतप्रधान तसेच सिनेट आणि फ्रान्सच्या नॅशनल असेंब्लीच्या अध्यक्षांचीही भेट घेणार आहेत.फ्रान्समधील भारतीय समुदाय , भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख फ्रेंच व्यक्तींशी  ते स्वतंत्रपणे संवाद साधतील.

या वर्षी भारत-फ्रान्स धोरणात्मक सहकार्याला 25 वर्षे पूर्ण होत आहेत  आणि पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे  धोरणात्मक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहकार्यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भविष्यासाठी सहकार्याचा  मार्ग प्रशस्त करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

त्यानंतर 15 जुलै रोजी पंतप्रधान अबुधाबीला भेट देतील. पंतप्रधान संयुक्त अरब अमिरातीचे  अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक  शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी चर्चा करणार आहेत.  भारत-संयुक्त अरब अमिराती दरम्यानचे सर्वसमावेशक धोरणात्मक सहकार्य सातत्याने दृढ  होत आहे आणि ऊर्जा, शिक्षण, आरोग्यसेवा, अन्न सुरक्षा, फिनटेक, संरक्षण आणि संस्कृती यांसारख्या  विविध क्षेत्रात पुढे वाटचाल करण्यासाठी  मार्ग निश्चित करण्याच्या दृष्टीने  पंतप्रधानांचा हा दौरा  एक संधी असणार आहे. विशेषत: यूएनएफसीसीच्या  कॉप-28 च्या संयुक्त अरब अमिरातीच्या  अध्यक्षते  संदर्भात आणि  संयुक्त अरब अमिराती  विशेष आमंत्रित देश असलेल्या भारताच्या जी -20 अध्यक्षपदाच्या संदर्भात  जागतिक समस्यांवरील सहकार्यावर चर्चा करण्याची ही संधी असेल .

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 


(Release ID: 1938948) Visitor Counter : 176