रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी औषधनिर्मिती क्षेत्रातील एमएसएमई कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेतली,औषधनिर्मिती क्षेत्रातील एमएसएमई कंपन्यांच्या स्वयं नियमन करण्याच्या गरजेवर दिला भर
“औषधनिर्मिती क्षेत्रातील एमएसएमई कंपन्यांनी औषधांच्या गुणवत्तेबाबत दक्ष राहणे तसेच स्वयंनियमनाच्या माध्यमातून उत्तमोत्तम निर्मिती प्रक्रिया राबवण्याच्या दिशेने जलदगतीने वाटचाल करणे महत्त्वाचे आहे”
औषधनिर्मिती क्षेत्रातील एमएसएमई कंपन्यांनी शेड्युल एम राबवणे लवकरच अनिवार्य करण्यात येईल
बनावट औषधांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी – केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय
Posted On:
11 JUL 2023 3:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 जुलै 2023
“औषधनिर्मिती क्षेत्रातील एमएसएमई कंपन्यांनी औषधांच्या गुणवत्तेबाबत दक्ष राहणे तसेच स्वयंनियमनाच्या माध्यमातून उत्तमोत्तम निर्मिती प्रक्रिया राबवण्याच्या दिशेने जलदगतीने वाटचाल करणे महत्त्वाचे आहे” असे केंद्रीय रसायने आणि खत तसेच आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या एमएसएमई क्षेत्रातील औषधनिर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या भेटीदरम्यान ते बोलत होते.
औषधनिर्मिती क्षेत्रातील एमएसएमई कंपन्यांच्या स्वयंनियमन करण्याच्या गरजेवर अधिक भर देत त्यांनी भारताला मिळालेला ‘जगाचे औषधनिर्मिती केंद्र’ हा दर्जा कायम राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले. “जागतिक औषधनिर्मिती क्षेत्रात आपल्या देशाला असलेले स्थान आपल्या उत्पादनांच्या उत्तम दर्जाच्या माध्यमातून मिळाले आहे. त्यामुळे आपण मूल्ये आणि दर्जा यांच्या संदर्भात हे स्थान अधिक मजबूत करु याची सुनिश्चिती करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि म्हणूनच, या बाबतीत स्वयंनियमनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते,” केंद्रीय मंत्री म्हणाले.
मुलभूत उद्योगांची खात्रीलायकता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला, त्यानुसार, औषधनिर्मिती क्षेत्रातील एमएसएमई कंपन्यांनी शेड्युल एम राबवणे टप्प्याटप्प्याने अनिवार्य करण्यात येणार आहे. “या निर्णयामुळे गुणवत्तेची हमी मिळण्यात मदत होईल आणि नियमांचे ओझे देखील कमी होईल,”केंद्रीय मंत्री डॉ.मांडवीय म्हणाले.
बनावट औषधांचे उत्पादन करणाऱ्या सर्व औषधनिर्मिती कंपन्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी भारतीय औषध महानियंत्रकांना (डीसीजीआय) दिले आहेत. “भारतात उत्पादित औषधांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.गुणवत्ताविषयक नियमांची पूर्तता न करणाऱ्या तसेच बनावट औषधे तयार करणाऱ्या औषध निर्मात्यांच्या बाबतीत सरकारने कोणत्याही प्रकारची सहनशीलता न बाळगण्याचे सरकारचे धोरण अधोरेखित करत केंद्रीय मंत्री म्हणाले की औषधे तयार करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली असून दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
डॉ.मांडवीय पुढे म्हणाले की, औषधी उत्पादनांची सर्वोच्च गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी नियामकीय अधिकाऱ्यांनी औषधनिर्मिती कारखान्यांची जोखीम-आधारित तपासणी तसेच लेखापरीक्षण करण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत तपासणी करण्यात आलेल्या 137 उद्योगांपैकी 105 उद्योगांविरुद्ध कारवाई सुरु करण्यात आली आहे.31 कारखान्यांमधील औषध उत्पादन थांबवण्यात आले असून 50 कंपन्यांविरुद्ध उत्पादन/विभाग परवाना रद्द करणे तसेच निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्याशिवाय, 73 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसा तर 21 कंपन्यांना इशारा पत्रे जारी करण्यात आली आहेत.
केंद्रीय औषध विभाग सचिव एस.अपर्णा, डीसीजीआय डॉ. राजीव रघुवंशी तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.आयडीएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.विरांची शाह तसेच इतर पदाधिकारी देखील या बैठकीत सहभागी झाले होते.
Jaydevi PS/S.Chitnis/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938686)
Visitor Counter : 153