गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अर्बन 20 (U20) महापौर शिखर परिषदेचा घोषणापत्र सुपूर्द करून समारोप


या घोषणापत्राला मिळाले आतापर्यंतचे सर्वाधिक अनुमोदन

Posted On: 10 JUL 2023 3:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 जुलै 2023

गुजरातमधील अहमदाबाद आणि गांधीनगर या शहरांमध्ये 7-8 जुलै 2023 रोजी आयोजित केलेल्या अर्बन 20 (U20) महापौर शिखर परिषदेची सांगता घोषणापत्र सुपूर्द करून झाली. या घोषणापत्राला जगभरातील 105 शहरांनी  अधिकृतपणे मान्यता दिली असून U20 घोषणापत्राला मिळालेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक अनुमोदन आहे, तर पूर्वीच्या कोणत्याही घोषणापत्राला मिळालेल्या अनुमोदनाच्या दुपटीहून ते अधिक आहे.

U20 शहरांनी एकत्रितपणे निश्चित केलेल्या सहा प्राधान्यक्रमांसाठी कृती आराखडा म्हणून या  घोषणापत्राचा मसुदा  तयार करण्यात आला आहे. या प्राधान्यक्रमांमध्ये पर्यावरण सुसंगत वागणुकीला प्रोत्साहन देणे, हवामान वित्तपुरवठ्याला गती देणे, स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेला गती देणे, पाण्याची सुरक्षा सुनिश्चित करणे, डिजिटल शहरी भविष्याला प्रेरणा देणे आणि शहरी नियोजन आणि सुशासनाच्या आराखड्याला नव्याने आकार देणे यांचा समावेश आहे. हे घोषणापत्र जी 20 च्या वसुधैव कुटुंबकम किंवा एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेशी सुसंगत आहे.

शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि हवामान लवचिकता या संदर्भातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शहरे मध्यवर्ती भूमिका बजावतील असे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रीहरदीप सिंग पुरी यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना सांगितले. शहरी मतदारसंघांचे सामर्थ्य आणि जागतिक विकासातील आव्हानांवर मात करण्यासाठी शहरे परिवर्तनाचे दूत म्हणून कसे कार्य करू शकतात यावर पुरी यांनी मत व्यक्त केले. या घोषणापत्रात नमूद केलेल्या सहा प्राधान्यक्रमांचे स्थान भविष्यात आपल्या सामूहिक अस्तित्वाच्या केंद्रस्थानी असेल , असे ते म्हणाले. शाश्वत भविष्यासाठी शहरांनी खालील नऊ क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे, असे ते म्हणाले.

  1. स्थानिक शासनाचे सामर्थ्य वृद्धिंगत करणे
  2. पारंपरिक सीमारेषांच्या पलीकडे जाऊन केलेले नियोजन
  3. आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी शहरांवर भर
  4. नवोन्मेषच्या संस्कृतीला चालना
  5. डेटा आणि तंत्रज्ञान यांच्या सामर्थ्याचा वापर
  6. नियमनाकडून सुविधेकडे वाटचाल
  7. फलित काय आहे यावर नव्हे तर परिणामांवर लक्ष केंद्रित करा
  8. नागरी  धोरणांच्या केंद्रस्थानी नागरिक असावेत
  9. स्थानिक संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा लाभ घेणे

जी-20 शेर्पा, अमिताभ कांत यांनी हस्तांतरण  सत्रात, शाश्वत आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी  शहरांच्या भूमिकेवर भर दिला.  विशेषत: जेव्हा जगाचा एक तृतीयांश भाग मंदीचा सामना करत आहे आणि भू-राजकीय समस्यांसोबतच हवामान बदलाच्या संकटाचाही परिणाम होत आहे अशा वेळी होत असलेल्या  शिखर परिषदेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. अर्बन-20 अंतर्गत केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करत  विशेषत: भविष्यातील शहरांसाठी पुरेशा पायाभूत सुविधा आणि अनेक नागरी समस्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने  शहरांच्या उत्तम   नियोजनावर शेर्पा अमिताभ कांत यांनी  भर दिला. यावेळी त्यांनी, माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या भारताच्या जी 20 अध्यक्षपदासाठीच्या "सर्वसमावेशक, निर्णायक आणि कृती-केंद्रित"  या दृष्टीकोनासह अर्बन-20 च्या रचनेविषयी  सांगितले.

यावेळी अर्बन-20 संयोजक, सी 40 शहरे आणि युसीएलजी द्वारे निवेदन  हस्तांतरित करण्यात आले.  उपस्थित प्रतिनिधींच्या टाळ्यांच्या कडकडाटात अहमदाबादच्या माननीय महापौरांनी  हरदीप सिंह  पुरी आणि   अमिताभ कांत यांना निवेदन सुपूर्द केले.

भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था  (एनआययुए ), अर्बन-20 तंत्र  सचिवालय यांच्या पाठिंब्याने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या  परिषदेत  जी 20 देशांतील शहरांच्या नेत्यांना एकत्र आणून शाश्वततेच्या दिशेने केलेल्या कृतींवर विचारविनिमय करण्यात आला. परिषदेचा एक भाग म्हणून अनेक विषयांवर प्रकाशझोत टाकणारी सत्रे सत्रे आणि संकल्पनात्मक  सत्रांचे आयोजन करण्यात आले होते, तसेच शहराचे  महापौर आणि प्रतिनिधींच्या प्रमुखांसोबत हवामान वित्तपुरवठा सारख्या समर्पक नागरी समस्यांवर बंद दाराआड सत्रे देखील आयोजित करण्यात आली होती.

विद्यमान  अर्बन-20  बैठक सत्राने  50हून अधिक लेख, 6 विस्तृत पार्श्वभूमी असलेले शोधनिबंध, सहा प्राधान्य क्षेत्रावरील सहा श्वेतपत्रिका  आणि   सहा अर्बन-20 वार्तापत्रं  तयार करून प्रसिद्ध करत एक विक्रमही  केला आहे. या परिषदेमध्ये  अनेक तांत्रिक कागदपत्रे आणि दस्तऐवजांचे प्रकाशन देखील करण्यात आले , यात अर्बन-20 मधील लिंगभाव  मुख्य प्रवाहावर संक्षिप्त धोरण आणि  2070 पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी  मार्गदर्शक आराखडा प्रदान करणाऱ्या  अहमदाबाद  प्रतिरोधक  शहर हवामान कृती योजना या धोरणाचा समावेश आहे.

हे अर्बन-20 बैठकांचे हे सत्र  अत्यंत  यशस्वी झाले असून  अनेक पैलूंमध्ये मागील सर्व बैठक सत्रांना याने मागे टाकले आहे, यावर  सहभागी शहराचे महापौर आणि प्रतिनिधी, मान्यवर आणि माहिती भागीदार या सर्वांनी एकमताने सहमती दर्शवली.

 

S.Patil/B.Sontakke/S.Chavan/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938435) Visitor Counter : 165