मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मत्स्य रोगांची माहिती तातडीने मिळावी आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर वैज्ञानिक सल्ला प्राप्त व्हावा याकरिता प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत मोबाईल ॲप विकसित

Posted On: 09 JUL 2023 4:24PM by PIB Mumbai

 

मत्स्यपालन हे सर्वात जलद वाढणारे अन्न उत्पादक क्षेत्र आहे आणि प्रथिनांची वाढती मागणी पूर्ण करण्यात त्याची मोठी भूमिका आहे. त्याचबरोबर हे क्षेत्र देशातील सुमारे 3 कोटी मच्छीमार आणि मत्स्यपालकांना उपजीविका आणि रोजगार प्रदान करते. या क्षेत्रात विकासाची अफाट क्षमता असून या क्षेत्रात नील क्रांती घडवून आणण्यासाठी भारत सरकारने 20,050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह एक प्रमुख योजना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY)) लागू केली आहे. मत्स्यपालन आणि मत्स्यसंपदा क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक असलेली देशातील ही प्रमुख योजना ठरली आहे.

मत्स्यपालनाच्या वाढीमध्ये रोग हा एक गंभीर अडथळा ठरत आहे आणि जलचर प्राण्यांच्या रोगांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा रोगांच्या नियंत्रणासाठी लवकर शोध घेणे महत्त्वाचे मानले जाते आणि देखरेख  ठेवण्याच्या सुरचित कार्यक्रमाद्वारेच ते साध्य करता येऊ शकते.

यादृष्टीने  "रिपोर्ट फिश डिसीज" ॲप विकसित करण्यात आले आहे. हे ॲप केंद्रीय  मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नुकतेच 28 जून 2023 रोजी सुरू केले आहे. या नाविन्यपूर्ण ॲपचा उपयोग करून, शेतकरी त्यांच्या शेतातील फिनफिश, कोळंबी आणि मोलस्कमधील रोगाची प्रकरणे क्षेत्रीय अधिकारी आणि मत्स्य आरोग्य तज्ञांना कळवू शकतील आणि रोग समस्या त्वरित सोडवण्यासाठी वैज्ञानिक सल्ला मिळवू शकतील. हे ॲप मत्स्यपालक, क्षेत्रस्तरीय अधिकारी आणि मत्स्य आरोग्य तज्ञांना जोडण्यासाठी एक मध्यवर्ती व्यासपीठ ठरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाची संकल्पना ही भारताला डिजिटली सशक्त समाज बनवणे आणि भारताला ज्ञान अर्थव्यवस्थेत रूपांतरित करणे आहे. मत्स्य रोगाच्या समस्या समजून घेण्यासाठी अशा प्रकारच्या ॲपचा विकास करणे हे संपूर्ण मत्स्यपालन समुदायांना त्यांच्या समस्या सामायिक करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन आपल्या पंतप्रधानांच्या "डिजिटल इंडिया" ची संकल्पना पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.  हा " मत्स्य रोग अहवाल" देशातील सर्वात दुर्गम ठिकाणी असलेल्या सर्व मत्स्यपालन समुदायांपर्यंत पोहोचेल, जेणेकरून जलचर प्राण्यांमधील प्रत्येक रोगाची नोंद केली जाईल, तपासणी केली जाईल आणि वेळेवर वैज्ञानिक सल्ला दिला जाऊ शकेल. त्याचबरोबर अशा रोग समस्येचा सामना करावा लागलेल्या शेतकर्‍यांच्या याआधी लक्षात आलेले रोग किंवा यापूर्वी लक्षात न आलेले रोग तज्ञांपर्यंत पोहोचतील आणि कमीतकमी कालावधीत त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. अशा प्रयत्नांमुळे रोगाच्या प्रादुर्भावामुळे होणारे आर्थिक नुकसान कमी होऊन मत्स्य उत्पादकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.

***

N.Chitale/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1938308) Visitor Counter : 174