पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वारंगळ येथे 6,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध पायाभूत सेवा सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी


5500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 176 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी

काझीपेठ येथे 500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे उत्पादन केंद्राच्या उभारणीच्या प्रकल्पाची पायाभरणी

भद्रकाली मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली

तेलगू लोकांच्या क्षमतांमुळे देशाच्या क्षमतेत नेहमीच वृद्धी झाली आहे.

आजचा नवीन तरुण भारत उर्जेने भरलेला आहे.

कालबाह्य पायाभूत सुविधांच्या सहाय्याने भारताचा जलद गतीने विकास होणे अशक्य आहे.

तेलंगणा आसपासच्या आर्थिक केंद्रांना एकत्र जोडून आर्थिक घडामोडींचे संकुल बनत आहे.

कारखानदारी क्षेत्र, युवकांसाठी रोजगाराच्या अमाप संधी देणारा स्रोत बनत आहे.

Posted On: 08 JUL 2023 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणा मध्ये वारंगळ येथे 6,100 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध महत्वपूर्ण पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. या विकासकामांमध्ये 5500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 176 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि काझीपेठ येथे 500 कोटी  रुपयांहून जास्त खर्चाने उभारण्यात येणाऱ्या  रेल्वे उत्पादन केंद्राच्या उभारणीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी भद्रकाली मंदिरात दर्शन घेऊन पूजा केली.

तेलंगणा हे तुलनेने नवीन राज्य असले आणि या राज्याची स्थापना होऊन केवळ नऊ वर्षे झाली असली तरी भारताच्या इतिहासातील तेलंगणाचे आणि येथील जनतेचे योगदान उल्लेखनीय आहे, असे पंतप्रधानांनी यावेळी झालेल्या एका कार्यक्रमात सांगितले. तेलगू  लोकांच्या क्षमतांमुळे देशाच्या क्षमतेत नेहमीच वृद्धी झाली आहे. भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येण्यात तेलंगणाचे योगदान महत्वाचे आहे असे सांगून भारताकडे जग गुंतवणुकीचे विश्वासार्ह स्थान म्हणून बघत असल्याने संधींमध्ये अमाप वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारताकडून खूप अपेक्षा आहेत, असे ते म्हणाले.

आजचा नवीन तरुण भारत उर्जेने भरलेला आहे असे सांगून 21व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात आलेल्या या सुवर्णकाळाचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले. या जलद गतीने होणाऱ्या विकासात भारताचा कोणताही भाग दुर्लक्षित राहता कामा नये, यावर त्यांनी भर दिला. गेल्या नऊ वर्षात तेलंगणा मध्ये पायाभूत सुविधा आणि संपर्क यंत्रणा मजबूत केल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या 6,000 कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांसाठी त्यांनी तेलंगणातील जनतेचे अभिनंदन केले.

नवीन उद्दिष्टये गाठण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याची आवश्यकता आहे, कालबाह्य पायाभूत सुविधांच्या सहाय्याने भारताचा जलद गतीने विकास होणे अशक्य आहे, असे त्यांनी सांगितले. दुबळी संपर्क यंत्रणा आणि खर्चिक कार्यान्वयन (लॉजिस्टिक्स) यामुळे व्यापार वृद्धी मध्ये अडथळे येतात, असे सांगून केंद्र सरकारने  विकासाचा वेग आणि प्रमाणात अनेक पटींनी वाढ केल्याचे ते म्हणाले.  महामार्ग, द्रुतगती महामार्ग, आर्थिक कॉरिडॉर आणि औद्योगिक कॉरिडॉर यांचे जाळे तसेच दुपदरी आणि चौपदरी महामार्गांचे सहापदरी महामार्गांमध्ये केले जाणारे रूपांतर यांचे त्यांनी उदाहरण दिले. तेलंगणाच्या महामार्गाचे जाळे 2500 किमीवरून 5000 किमीपर्यंत दुप्पट वाढल्याचे तसेच  2500 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे बांधकाम विविध पातळ्यांवर सुरु आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.  भारतमाला प्रकल्पाचा एक भाग म्हणून बांधकामाधीन असलेले डझनभर कॉरिडॉर तेलंगणातून जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.  तसेच हैदराबाद - इंदूर आर्थिक कॉरिडॉर, चेन्नई - सुरत आर्थिक  कॉरिडॉर, हैदराबाद - पणजी आर्थिक  कॉरिडॉर आणि हैदराबाद - विशाखापट्टणम आंतर कॉरिडॉरचे  उदाहरण दिले. एका अर्थी तेलंगणा आसपासच्या आर्थिक केंद्रांना एकत्र जोडून आर्थिक घडामोडींचे संकुल बनत आहे.  

आज पायाभरणी झालेल्या नागपूर- विजयवाडा मार्गिकेच्या मंचेरियल- वारंगळ कॉरिडॉरविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा कॉरिडॉर तेलंगणाला   महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशशी आधुनिक स्वरूपातील कनेक्टिव्हिटी प्रदान करेल तसेच  यामुळे मंचेरियल आणि वारंगळ यामधील अंतर कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या कमी होईल. हा प्रदेश म्हणजे अनेक आदिवासी समुदायांचे घर असून ते कित्येक काळासाठी दुर्लक्षित राहिले आहे. हा कॉरिडॉर राज्याला बहुविध संपर्कयंत्रणा प्रदान करेल आणि करीमनगर- वारंगळ  रकल्पाचे चार मार्गिकांमध्ये रुपांतर करण्याच्या प्रकल्पामुळे  हैदराबाद-वारंगळ औद्योगिक मार्गिका, काकतीया मेगा टेक्स्टाईल पार्क आणि वारंगळ येथे एक एसईझेड यांच्या सोबतच्या कनेक्टिविटीमध्ये सुधारणा होईल, असे ते म्हणाले.

तेलंगणातील वारसा केंद्रे आणि श्रद्धास्थानांचा प्रवास आता अधिक सोयीस्कर होत असल्याने तेलंगणातील वाढत्या संपर्क व्यवस्थेचा थेट लाभ राज्यातील उद्योग आणि पर्यटनाला होत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. कृषी उद्योग आणि करीमनगरच्या ग्रॅनाइट उद्योगाचाही त्यांनी उल्लेख केला आणि शासनाच्या या प्रयत्नांमुळे त्यांना थेट मदत होत असल्याचे सांगितले. “शेतकरी असो की मजूर, विद्यार्थी असो की व्यावसायिक, सर्वांनाच फायदा होत आहे. तरुणांना त्यांच्या घराजवळ नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही मिळत आहेत”, असेही ते म्हणाले.

मेक इन इंडिया मोहिम आणि देशातील तरुणांसाठी उत्पादन क्षेत्र कसे मोठ्या प्रमाणात रोजगाराचे साधन बनत आहे यावर प्रकाश टाकत, देशातील उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादन सलग्न (पीएलआय) योजनेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. “जे अधिक उत्पादन घेत आहेत त्यांना सरकारकडून विशेष सहाय्य मिळत आहे” असे ते म्हणाले. या योजनेंतर्गत तेलंगणामध्ये राबवण्यात येत असलेल्या 50 हून अधिक मोठ्या प्रकल्पांची माहितीही पंतप्रधानांनी यावेळी दिली. या वर्षी संरक्षण निर्यातीत भारताने नवा विक्रम निर्माण केल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. 9 वर्षांपूर्वी भारताची संरक्षण निर्यात सुमारे 1000 कोटी रुपयांची होती, ती आज 16,000 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यांनी हैदराबाद येथील भारत डायनॅमिक्स लिमिटेडचा उल्लेख केला आणि सांगितले की ती देखील याचा लाभ घेत आहे.

भारतीय रेल्वेने उत्पादन क्षेत्रात नवे विक्रम आणि नवे टप्पे गाठले आहेत याचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.  त्यांनी ‘मेड इन इंडिया’ वंदे भारत गाड्यांबद्दलचा मुद्दा अधोरेखित केला आणि सांगितले की भारतीय रेल्वेने गेल्या काही वर्षांत हजारो आधुनिक डबे आणि लोकोमोटिव्ह तयार केले आहेत. काझीपेठच्या रेल्वे उत्पादन विभागाची आज पायाभरणी करण्यात आली आहे, त्याचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, हे भारतीय रेल्वेचे पुनरुज्जीवन आहे आणि काझीपेट, मेक इन इंडियाच्या नवीन उर्जेचा भाग बनेल. यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि प्रत्येक कुटुंबाला या ना त्या मार्गाने फायदा होईल, असे पंतप्रधान म्हणाले.  “हे सबका साथ, सबका विकास” आहे असे सांगत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला. विकासाच्या या मंत्राचा अवलंब करत तेलंगणाला पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलिसाई सुंदरराजन, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी आणि खासदार  संजय बांदी आदी यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांनी, 5,550 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 176 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. नागपूर - विजयवाडा कॉरिडॉरचा 108 किमी लांबीचा मंचेरियल – वारंगळ विभाग या प्रकल्पांमध्ये समाविष्ट आहे. या विभागामुळे मंचेरियल आणि वारंगळमधील अंतर सुमारे 34 किमीने कमी होईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि NH-44 आणि NH-65 वरील रहदारी कमी होईल.  NH-563 वरील 68 किमी लांबीच्या करीमनगर-वारंगळ विभागात सध्या असलेले दुपदरी रस्ते चारपदरी  करण्यासाठीच्या कामाचीही त्यांनी पायाभरणी केली.  हैदराबाद-वारंगळ औद्योगिक कॉरिडॉर, काकतिया मेगा वस्त्रोद्योग पार्क आणि वारंगळ येथील एसईझेड बरोबरची संपर्क व्यवस्था सुधारण्यास हे मदत करेल.

पंतप्रधानांनी काझीपेठ येथे रेल्वे उत्पादन विभागाची पायाभरणी केली.  500 कोटींहून अधिक खर्च करून विकसित होणार्‍या, आधुनिक उत्पादन विभागामुळे उत्पादन क्षमता वाढवणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान मानके आणि डब्यांचे रोबोटिक रंगकाम, अत्याधुनिक यंत्र, आधुनिक सामग्री साठवणूक तसेच हाताळणीसह विविध सुविधांनी हे सुसज्ज असेल. स्थानिक रोजगार निर्मिती आणि जवळपासच्या भागात सहायक विभागांच्या विकासास हे मदत करेल.

 

 

 

 

 

 

 

* * *

Jaydevi PS/Bhakti/Vinayak/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938151) Visitor Counter : 111