भारतीय निवडणूक आयोग
भारत आणि पनामा यांनी केला निवडणूकविषयक सहकार्यावर सामंजस्य करार
भारतीय निवडणूक आयोग जगभरातील निवडणूक संस्थांशी संलग्न होण्यासाठी आणि जगभरातील लोकशाही प्रक्रिया मजबूत करण्यासाठी वचनबद्ध आहे: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक सहकार्याची व्याप्ती वाढवली; ब्राझील-चिली-मेक्सिकोनंतर पनामा या चौथ्या लॅटिन अमेरिकन राष्ट्राशी भारत करारबद्ध
Posted On:
07 JUL 2023 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जुलै 2023
निवडणूक व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्याला संस्थात्मक रचनेची जोड देता यावी यासाठी भारताचा निवडणूक आयोग आणि पनामा देशातील निवडणूक न्यायाधिकरण यांनी आज सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय शिष्टमंडळाने, पनामाच्या निवडणूक न्यायाधिकरणाचे पीठासीन दंडाधिकारी अल्फ्रेडो जंका वेंडेहाके यांच्याशी संवाद साधला. दोन देशातील निवडणूक व्यवस्थापन संस्थामधील सहकार्य आणि ज्ञानाचे आदानप्रदान अधिक वाढवण्याविषयी ही चर्चा होती. पनामा न्यायाधिकरणाचे प्रथम उपाध्यक्ष दंडाधिकारी एडुआर्डो वाल्देस एस्कोफरी आणि द्वितीय उपाध्यक्ष लुईस ए. गुएरा मोरालेस हे देखील उपस्थित होते.
हा सामंजस्य करार जगभरातील निवडणूक संस्थांशी संलग्न होण्यासाठी आणि जगभरातील लोकशाही प्रक्रियांना बळकट करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो, असे राजीव कुमार यावेळी म्हणाले. "जगभरातील सर्वोत्कृष्ट निवडणूक पद्धतींमधून शिकताना भारतीय निवडणूक आयोग मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका आयोजित करण्यासाठी त्याच्याकडे असलेली कौशल्ये आणि ज्ञान इतर देशांतील आपल्या समकक्षांशी सामायिक करण्यासाठी वचनबद्ध आहे." असे ते म्हणाले.
निवडणुकीत तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमांच्या वापराविषयी दोन आयोगांमध्ये असलेल्या सहकार्याविषयी अल्फ्रेडो यांनी चर्चा केली.
भारताचा निवडणूक आयोग आंतरराष्ट्रीय सहकार्य कार्यक्रमाद्वारे परदेशी निवडणूक व्यवस्थापन संस्थांशी संबंध आणि सहकार्य वाढवत आहे. गेल्या काही वर्षांत मेक्सिको, ब्राझील आणि चिलीसोबत सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केल्यावर, आयोगाने लॅटिन अमेरिकेत निवडणूक व्यवस्थापन संस्थेशी केलेला हा चौथा सामंजस्य करार आहे. जगभरातील निवडणूक व्यवस्थापन संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्थांशी भारताने एकूण 31 सामंजस्य करार केले आहेत.
* * *
S.Kakade/P.Jambhekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937987)
Visitor Counter : 133