संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाचा लद्दाखमधे जुलै (अभिवादन) लद्दाख आऊटरिच कार्यक्रम
Posted On:
06 JUL 2023 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2023
दुर्गम भागांचा विकास करण्याची राष्ट्रीय नेतृत्वाची ध्येयदृष्टी आहे. त्याच दिशेने पावले उचलत भारतीय नौदलाने लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाशी संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित बहुआयामी आऊटरिच (लोकसंपर्क) कार्यक्रम सुरू केला आहे. लद्दाखमधील तरुणांचा संरक्षण सेवांमध्ये सहभाग अधिकाधिक वाढवणे, राष्ट्र उभारणीची प्रक्रीया मजबूत करणे आणि या प्रदेशात सागरी सेवांबद्दल जागृती वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नौदल प्रमुख ॲडमिरल हरी कुमार, लेहमध्ये 06 आणि 07 जुलै 23 रोजी विविध लोकसंपर्क उपक्रमांचे यजमानपद भूषवणार आहेत. भारतीय नौदलाने याआधी गेल्या वर्षी ईशान्य भागात व्यापक स्वरुपात लोकसंपर्क उपक्रम राबवले होते.
(https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1881710)
भारतीय नौदलाच्या लद्दाखमध्ये होणाऱ्या लोकसंपर्क (आउटरीच) कार्यक्रमा अंतर्गत नौदल वाद्यवृंद पथकाचे सार्वजनिक सादरीकरण, भारतीय नौदल आणि लद्दाख केन्द्रशासित प्रदेश संघ यांच्यातील मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना, दुचाकी आणि चारचाकीच्या सफर मोहिमेला झेंडा दाखवणे तसेच विविध शाळांना भेट आदींचा समावेश असेल.
नौदल प्रमुख (सीएनएस) आपल्या लेह भेटीदरम्यान, लेह आणि लद्दाखचे माननीय नायब राज्यपाल (एलजी), ब्रिगेडियर (डॉ) बीडी मिश्रा, (निवृत्त) यांची भेट घेईल. भारतीय नौदलाच्या वतीने ते युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजलीही अर्पण करतील. सिंधू संस्कृती केंद्रात 06 जुलै 23 रोजी भारतीय नौदल वाद्यवृंद पथकाचा 'सरगम' हा विशेष कार्यक्रम होईल. नौदल प्रमुखांसह एनडब्लूडब्लूएच्या अध्यक्षा कला हरी कुमार, कार्यक्रमाचे प्रमुख यजमान असतील तर नायब राज्यपाल कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील.
स्पिटुक फुटबॉल स्टेडियमवर 07 जुलै 23 रोजी नौदल संघ आणि लद्दाख संघ यांच्यात मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना होणार आहे. सामन्याचे मुख्य यजमान म्हणून नौदल प्रमुख आणि प्रमुख पाहुणे नायब राज्यपाल असतील. अनुक्रमे दिल्ली आणि विशाखापट्टणमच्या आपल्या परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी सफर मोहिमेलाही नायब राज्यपाल झेंडा दाखवून रवाना करतील. नौदल प्रमुख आणि एनडब्लूडब्लूएच्या अध्यक्ष लॅमडन सीनियर सेक स्कूलच्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी देखील भेट घेतील आणि संवाद साधतील.
दुचाकी आणि चारचाकी मोहिमेत 107 नौदल कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात लद्दाख मधील कर्मचारी आणि 20 महिलांचाही समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात अनुक्रमे 15 आणि 22 जून 23 रोजी दिल्ली आणि विशाखापट्टणम येथून झाली. लद्दाख प्रदेशातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमधील 3000 हून अधिक विद्यार्थ्यांनीही यात मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
(https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1932552)
लेह येथून परतीच्या टप्प्यात, सहभागी कर्मचारी प्रत्येकी 5000 किमी पेक्षा जास्त अंतर कापून, विविध शाळांमधील विद्यार्थ्यी, मान्यवर आणि स्थानिक लोकांशी संवाद साधतील.
विविध नौदल केन्द्रातील लद्दाख निवासी सर्व नौदल कर्मचारी देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. तरुणांना मोठ्या संख्येने यात सहभागी होण्यासाठी, राष्ट्र उभारणीसाठी, भारतीय नौदलात सामील होण्यासाठी आणि अभिमानाने देशाची सेवा करण्यासाठी प्रोत्साहितही करत आहेत. त्यासाठी आपले समृद्ध अनुभव आणि यशोगाथा त्यांना सांगत आहेत.
Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937722)
Visitor Counter : 147