गृह मंत्रालय
गृह मंत्रालयाने 5,000 कोटी रुपयांच्या एकूण खर्चासह "राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी योजना" केली सुरु
Posted On:
05 JUL 2023 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2023
केंद्रीय गृह मंत्रालयाने, राज्यांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत सज्जता आणि क्षमता बांधणी निधी अंतर्गत निर्धारित वितरणाद्वारे “राज्यांमध्ये अग्निशमन सेवांच्या विस्तार आणि आधुनिकीकरण’यासाठी एकूण 5,000 कोटी रुपये खर्चाची योजना” सुरू केली आहे. एकूण खर्चापैकी 500 कोटी रुपये राज्यांना त्यांच्या कायदेशीर आणि पायाभूत सुविधा-आधारित सुधारणांच्या आधारे प्रोत्साहन देण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. यासंदर्भातील पत्र सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना आणि अग्निशमन सेवांच्या प्रमुखांना पाठवण्यात आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी 13 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांच्या बैठकीत या योजनेची घोषणा केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, गृह मंत्रालय,भारतामध्ये आपत्ती जोखीम कमी करणारी यंत्रणा मजबूत करत भारताला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी आणि आपत्ती दरम्यान ‘शून्य जीवितहानी’ आणि मालमत्तेचे कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवत आहे.
एनडीआरएफ च्या सज्जता आणि क्षमता-बांधणी घटकाद्वारे राज्य स्तरावर अग्निशमन सेवेच्या बळकटीकरणासाठी उपक्रम सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेंतर्गत प्रकल्प/प्रस्तावांसाठी निधी मिळविण्यासाठी, संबंधित राज्य सरकारांना त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून अशा प्रकल्पांच्या/प्रस्तावांच्या एकूण खर्चाच्या 25% (ईशान्य आणि हिमालयीन (NEH) राज्ये 10% योगदान देतील, ती वगळता) योगदान द्यावे लागेल.
योजनेची अधिक माहिती भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या https://ndmindia.mha.gov.in या वेबसाइटवरून डाउनलोड करता येईल.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937628)
Visitor Counter : 178