वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारताची लक्षणीय आर्थिक प्रगती आणि बाजारातील वाढती क्षमता, स्टार्ट अप कंपन्यांची भरभराट आणि जागतिक स्टार्ट अप व्यवस्थेत चमकदार कामगिरी करण्यास पोषक: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
नवोन्मेष आणि स्टार्ट अप व्यवस्थेला प्रोत्साहन देणे ही सर्व देशांची सामूहिक जबाबदारी : पीयूष गोयल
Posted On:
04 JUL 2023 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2023
भारताची लक्षणीय प्रगती आणि बाजारातील वाढती क्षमता यामुळे देशातील स्टार्ट अप व्यवस्था समृद्ध होण्यास आणि जागतिक स्टार्ट अप व्यवस्थेत आपले भक्कम स्थान निर्माण करण्यास वाव मिळाला आहे, असे मत, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न तसेच सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केले. हरियाणात गुरुग्राम इथे झालेल्या, ‘स्टार्ट अप 20 शिखर’ या कार्यक्रमात ते बोलत होते. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी, जगातील सर्व भागात शाश्वत स्टार्ट अप व्यवस्थाना प्रोत्साहन देणे, त्यांना आवश्यक ते पाठबळ देणे, त्यांच्यात सर्वसमावेशकता आणणे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.
हा एखाद्या देशाचा विषय नाही, तर नवोन्मेष आणि स्टार्ट अप व्यवस्थेला प्रोत्साहन देणे, ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे गोयल पुढे म्हणाले. जी-20 बैठकांमधे स्टार्टअप्स वर सुरू झालेल्या चर्चांचे महत्त्व अधोरेखित करतांना त्यांनी संगितले की, अशा चर्चामध्ये, कल्पनांची देवाणघेवाण, सर्वोत्तम पद्धतींचे आणि निधी उभारण्याऱ्या यंत्रणांचे आदानप्रदान तसेच, संशोधन आणि विकासात सहकार्याला प्रोत्साहन, यावर भर द्यायला हवा.
स्टार्ट अप 20 प्रतिबद्धता गटाच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. तसेच विविध अनुभव आणि ज्ञान क्षेत्रात त्यांची प्रतिबद्धता आणि योगदान, सर्व देशांमधील तफावत दूर करून त्यांच्यात सहकार्य वृद्धिंगत करण्यास उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी सांगितले. या गटातील स्थानिक आणि परदेशी, दोन्ही प्रतिनिधी त्यांच्यासोबत, अमूल्य आठवणी, शिकवण घेऊन जातील आणि त्यांच्यात निर्माण झालेले बंध, त्यांच्या स्वतःच्या स्टार्ट अप प्रवासाला योग्य दिशा देतील, तसेच, त्या त्या संबंधित देशांचा विकास आणि उद्यमशील समुदायांच्या वाढीत महत्वाचे योगदान देतील, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
स्टार्ट अप च्या माध्यमातून इतर देशांच्या संपर्कात राहण्यास भारत उत्सुक असल्याचे सांगत, आपले अनुभव सामाईक करत, एकत्रित काम करण्यासाठी तसेच त्यातून रोजगार निर्मितीक्षम पिढी निर्माण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.
स्टार्ट अप व्यवस्थेत भारत तुलनेने नवा असला तरीही, अल्पावधीतच, आम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्ट अप व्यवस्था असलेला देश ठरलो आहोत असेही ते पुढे म्हणाले.
गुरुग्राम ही हरियाणाचे वित्तीय शक्ती केंद्र म्हणून ओळखले जाते, असे त्यांनी अधोरेखित केले. फॉर्च्यून 500 च्या यादीमध्ये समाविष्ट 100 पेक्षा अधिक कंपन्या, आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि असंख्य स्टार्टअप्ससह हे शहर, भारताच्या स्टार्टअप व्यवस्थेचे चित्र आणि परीघ दर्शवणारे आहे, असे गोयल म्हणाले.
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937312)
Visitor Counter : 134