विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
आयुष्मान भारत ही आतापर्यंतची जगातील सर्वोत्तम आरोग्य विमा योजना आहे, योजनेच्या संकल्पनेचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते; जुन्या आजारासाठी विमा संरक्षण मिळविण्याचा यात पर्याय- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
आयुष्मान भारत अंमलबजावणीच्या प्रारंभिक टप्प्यात असून सरकार योजनेत योग्य वेळी योग्य ते बदल करण्यास तयार : डॉ. जितेंद्र सिंह
Posted On:
30 JUN 2023 5:32PM by PIB Mumbai
आयुष्मान भारत ही आतापर्यंतची जगातील सर्वोत्कृष्ट आरोग्य विमा योजना असून तिची संकल्पना मांडण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. ही कदाचित जगातील एकमेव आरोग्य विमा योजना आहे जी जुन्या आजारासाठीही विमा संरक्षण मिळविण्याचा पर्याय उपलब्ध करून देते , उदाहरणार्थ, आज एखाद्या व्यक्तीला कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यास तो त्यानंतर जाऊन उपचारासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी स्वत:चा विमा काढू शकतो.
आज नवी दिल्लीत डॉक्टर्स डे च्या पूर्वसंध्येला इकॉनॉमिक टाईम्स डॉक्टर्स डे संमेलनाला डॉ जितेंद्र सिंह यांनी संबोधित केले. आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणी द्वारे भारत आरोग्य सेवा वितरणाच्या प्रादेशिक आणि विभागीय दृष्टिकोनाकडून व्यापक गरज-आधारित आरोग्य सेवेकडे वळला आहे असे ते म्हणाले. ही एक अनोखी योजना आहे, ज्यात जुन्या आजारांसाठीही नोंदणी करता येते असे ते म्हणाले.
आर्थिक निकषांच्या पलीकडे आरोग्य योजना सार्वत्रिकपणे कार्यान्वित करणारा जम्मू आणि काश्मीर हा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आयुष्मान भारत योजना पात्र लाभार्थ्यांना सर्वात उत्कृष्ट रुग्णालयांमध्ये पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करते, अशी माहिती मंत्र्यांनी दिली. योजनेच्या अंमलबजावणीत काही अनियमितता असल्याच्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, आम्ही अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत आणि योग्य वेळी योजनेत आवश्यक ते बदल करण्याची सरकारची तयारी आहे. भारतासारख्या विविधता असलेल्या विशाल देशात सुसूत्रता आणणे, हे एक मोठे आव्हान आहे आणि हळूहळू पण निश्चितपणे ही आरोग्य विमा योजना जगासमोर एक आदर्श ठरेल, असे प्रतिपादन डॉ.सिंग यांनी यावेळी केले.
मार्च 2020 मध्ये कोविड-19 ने ज्यावेळी आपल्यासमोर मोठे आव्हान उभे केले, त्यावेळी भारताने टेलिमेडिसिनच्या वापरासाठीची मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित केली आणि एप्रिल 2020 मध्ये आयुषसाठीही आम्ही तीच सुरू ठेवली, अशी माहितीही डॉ जितेंद्र सिंग यांनी यावेळी दिली. सरकारचे नियोजन पूर्ण असल्यामुळे भारतात या मार्गदर्शक तत्त्वांचे त्वरीत पालन होऊ शकले, असे डॉ.सिंग यांनी यावेळी अधोरेखित केले. ‘सर्वांसाठी डिजिटल आरोग्य’ सुनिश्चित करण्यासाठी ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही पहिली अट आहे ,जी साध्य करण्यासाठी आपण एकत्र येऊन काम केले पाहिजे, असेही डॉ.सिंग यांनी यावेळी सांगितले.
***
R.Aghor/S.Kane/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1936475)
Visitor Counter : 146