संरक्षण मंत्रालय
भारत आणि टांझानिया यांच्यातील संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची दुसरी बैठक अरुषा येथे संपन्न
Posted On:
29 JUN 2023 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जून 2023
टांझानिया येथील अरुषा शहरात 28 आणि 29 जून या कालावधीत भारत आणि टांझानिया या देशांतील संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची (जेडीसीसी) दुसरी बैठक आयोजित करण्यात आली होती.संयुक्त सचिव अमिताभ प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या भारतीय शिष्टमंडळात केंद्रीय संरक्षण मंत्रालय तसेच सशस्त्र दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. टांझानिया येथील भारतीय उच्चायुक्त बिनय एस.प्रधान यांनी देखील बैठकीमध्ये भाग घेतला.
या बैठकीमध्ये, दोन्ही देशांनी हिंद महासागर परिसरातील सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून सहकार्यासाठी विस्तृत प्रमाणात उपलब्ध संधींवर चर्चा केली. मित्र देशांना संरक्षण विषयक साहित्याची निर्यात करण्याच्या बाबतीत भारतीय संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्राच्या वाढत्या कौशल्याबाबत भारतीय शिष्टमंडळाने उपस्थितांना अधिक माहिती दिली.सागरी सहकार्य क्षेत्रात विशिष्ट प्रशिक्षण आणि क्षमता निर्मिती, पायाभूत सुविधांची उभारणी आणि संरक्षण उपकरणे तसेच तंत्रज्ञान यांच्यातील सहकार्य अशा उपक्रमांच्या संदर्भात संरक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठी पंचवार्षिक आराखड्याला देखील दोन्ही देशांनी संमती दर्शवली.
संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधी देखील भारतीय शिष्टमंडळासोबत बैठकीला उपस्थित होते. या जेडीसीसी बैठकीच्या निमित्ताने, या प्रतिनिधींनी टांझानियाच्या संरक्षण दलातील भागधारकांसोबत व्यापक प्रमाणात बैठका घेतल्या.
भारताचे टांझानिया देशासोबत जवळचे, स्नेहपूर्ण आणि मैत्रीचे संबंध आहेत आणि सशक्त क्षमता निर्मिती तसेच विकासासाठी केलेल्या भागीदारीतून ते अधिक बळकट होत आहेत. जेडीसीसी बैठकीसाठी भारतीय शिष्टमंडळाने टांझानिया देशाला दिलेल्या भेटीतून भारताचे टांझानिया सोबत असलेले संरक्षण क्षेत्रातील संबंध आणखी बळकट होण्याची अपेक्षा आहे.
* * *
N.Chitale/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1936257)
Visitor Counter : 209