नौवहन मंत्रालय
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सर्बानंद सोनोवाल यांनी सज्जतेचा घेतला आढावा
चक्रीवादळाच्या स्थितीकडे बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे बारकाईने लक्ष; कोणत्याही आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांसह सज्जता : सोनोवाल
Posted On:
14 JUN 2023 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2023
बंदरे,जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी बिपरजॉय चक्रीवादळापासून होणारे नुकसान कमी करण्याच्या दृष्टीने सज्जतेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकार तसेच गुजरात सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. “अत्यंत तीव्र चक्रीवादळ” या वर्गवारीत मोडणारे बिपरजॉय चक्रीवादळ उद्या गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.
याप्रसंगी बोलताना सोनोवाल म्हणाले, “आपण सर्व प्रकारच्या प्रसंगांसाठी तयार असले पाहिजे.कारण अलीकडच्या काळातल्या भारतावरच्या सर्वात गंभीर नैसर्गिक आपत्तीपैकी ही एक ठरण्याची शक्यता आहे. आम्ही नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत आणि लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व पावले उचलत आहोत. सागरी किनारी भागात राहणार्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. तसेच चक्रीवादळानंतर बाधित झालेल्या लोकांसाठी निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. या विश्रामगृहांमध्ये महिला आणि बालकांसह गरजूंसाठी सर्व प्रकारची आपत्कालीन काळजी, वैद्यकीय सेवा तसेच त्यांच्या भोजन, आहारविषयक काळजी घेण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. वादळ प्रभावित भागात मोठ्या जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. आम्ही एकूण सर्व परिस्थतीवर अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहोत,कारण लोकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि मालमत्तेचे नुकसान कमी व्हावे, यासाठी तत्परतेने सर्व प्रकारच्या उपाय योजना करण्यासाठी चमू सज्ज आहेत.”
कांडला बंदर प्राधिकरणाने गांधीधाम येथे आधुनिक दळणवळण साधनांनी सुसज्ज असे तीन नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. हे कक्ष 11 जूनपासून चोवीस तास कार्यरत आहेत. जनजागृती मोहीम देखील सुरू आहे. सर्व संघटना, प्राधिकरणांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. बंदर परिसरात आणि आसपासच्या इतर सखल भागात राहणाऱ्या सुमारे 3,000 लोकांना आधीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तसेच गोपाळपुरी वसाहत येथे 5000 ते 6000 लोकांच्या राहण्याची क्षमता असलेले निवारे उभारण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी, अन्नाची पाकिटे, वैद्यकीय मदत आदी सर्व आवश्यक वस्तू या आश्रयगृहामध्ये उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्यांची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बंदर रुग्णालयातील डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मालमत्तेचे कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी, जहाजांची आवक तसेच सर्व नांगरलेली जहाजे आधीच कच्छमधून बाहेर काढण्यात आली आहेत.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाची वाटचाल, ते कसे पुढे सरकते याकडे सिग्नल स्टेशन, कांडला आणि वाडीनार येथून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपस्थित राहण्यासाठी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका कांडला येथे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारी बंदरांच्या सुरक्षेचीही सोनोवाल यांनी यावेळी चौकशी केली. सर्व मच्छीमार आणि प्रभावित भागात राहणाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात असल्याची खात्री केली. चक्रीवादळ संपेपर्यंत जीवित आणि मालमत्तेच्या संपूर्ण संरक्षणासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधावा आणि सतत संपर्क- संवाद साधावा अशी विनंती मंत्र्यांनी केली.
केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय चक्रीवादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याकरिता सर्व आवश्यक उपाययोजना करत आहे.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932425)
Visitor Counter : 130