सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

एयर इंडियाच्या प्रसिद्ध कला संग्रहातील निवडक कलाकृतींचे दर्शन घडवणाऱ्या ‘महाराजाज ट्रेझर’ या प्रदर्शनाचे संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्र्यांनी मुंबईत एनजीएमए येथे केले उद्‌घाटन


“आपल्या परंपरांचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, विशेषतः देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आपण त्या जाणून घेतल्या पाहिजेत”

Posted On: 14 JUN 2023 4:01PM by PIB Mumbai

मुंबई, 14 जून 2023

एयर इंडियाच्या प्रसिद्ध कला संग्रहातील निवडक कलाकृतींचे दर्शन घडवणाऱ्या ‘महाराजाज ट्रेझर’ या केंद्रीय संस्कृती मंत्रालयाने आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे संस्कृती आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमत्री मीनाक्षी लेखी यांनी  मुंबईत नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (एनजीएमए) येथे मंगळवारी 13 जून 2023 रोजी संध्याकाळी उद्‌घाटन केले. हवाई प्रवासाचा अनुभव अधिकाधिक सुखद बनवण्यासाठी एयर इंडियाने केलेल्या विविध प्रकारच्या सुधारणा आणि कार्य प्रकाशात आणण्याचा या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाचा उद्देश असून त्यामध्ये व्ही एस गायतोंडे, जी आर संतोष, के एच आरा, बी. प्रभा, पिलू पोचखानवाला, एम एफ हुसेन आणि राघव कनेरिया यांच्यासारख्या नामवंत कलाकारांनी साकारलेली चित्रे आणि शिल्पकृती मांडण्यात आल्या आहेत. एनजीएमए येथे भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात विविध विषयांवर आधारित सुमारे 200 कलाकृती आहेत. 13 ऑगस्ट 2023 पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

यावेळी बोलताना मीनाक्षी लेखी म्हणाल्या की एयर इंडियाच्या 80 वर्षांच्या प्रवासाची गाथा विविध चित्रे आणि शिल्पकृतींच्या माध्यमातून कथन करणारे हे प्रदर्शन खऱ्या अर्थाने महाराजाचा संग्रह आहे. आश्रयाच्या शोधात असलेल्या कलाकारांना आश्रय दिल्याबद्दल  आम्ही एयर इंडियाचे अतिशय ऋणी आहोत, असे राज्यमंत्री म्हणाल्या. आपला चरितार्थ चालवण्यासाठी कलाकारांना नेहमीच आश्रयाची गरज असते. कलाकारांमध्ये त्यांच्या अंतरात्म्यात देवाचा एक अंश असतो कारण ते नेहमीच अधिकाधिक चांगली कलाकृती घडवण्यासाठी आणि आपल्या कौशल्यात अधिक सुधारणा करण्यासाठी झटत असतात, असे लेखी यांनी सांगितले. आपल्या परंपरा आपण जाणून घेतल्या पाहिजेत, आपल्याला त्यांचा अभिमान असला पाहिजे विशेषतः देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना हे अतिशय गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. आपण कोण आहोत याबद्दल आपल्याला अभिमान असला तरच आपण कला आणि शिल्पे यांना प्रोत्साहन देऊ शकू,  असे त्यांनी सांगितले.या प्रदर्शनाविषयी बोलताना राज्यमंत्री म्हणाल्या की भारताची 80 वर्षांची एक कथा जी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे, ती कथा अनेक वेळा अनेक ठिकाणी कथन केली गेली पाहिजे. 

कला, नक्षीकाम आणि संस्कृती यांनी समृद्ध असलेला आपला देश होता आणि यापुढेही असेल, असे लेखी यांनी सांगितले. आज आपल्या देशात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांमुळे आपण विकासाचा वारसा पाहू शकतो पण त्याचवेळी सरकार देशाच्या सांस्कृतिक वारशावर तितकाच भर देत आहे, असे त्या म्हणाल्या. सर्व प्रकारच्या कला आणि संस्कृती यांच्या सर्व प्रकारांना प्रोत्साहन देणे, संग्रहालयांची उभारणी आणि नव्या वारसा विद्यापीठांची उभारणी यांच्याशी संबंधित कृती योजना आणि त्यांचे वितरण यावर पंतप्रधानांचा खूप जास्त प्रमाणात भर असतो, असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

एनजीएमएच्या  मुंबईच्या संचालक, नाझनीन बानू म्हणाल्या, सरकारने  एअर इंडियामधील भागभांडवल निर्गुंतवणूक करण्‍याचा निर्णय घेतल्यामुळे, एअर इंडियाच्या कला आणि कलाकृतींचा संग्रह सांस्कृतिक मंत्रालयाकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   या कलावस्तूंना  आता  राष्ट्रीय कलादालन मिळत आहे.  या संग्रहातील वस्‍तू वैविध्‍यपूर्ण,  प्रभावी आहेत आणि  एअर इंडियाचा  अद्भूत कलावस्‍तू संग्रहाविषयीचा व्यापक दृष्‍टीकोण या संग्रहातून दिसून येतो. असा अमूल्य संग्रह असणे, हे व्यावसायिक विमान कंपनीच्या इतिहासात त्या विमानकंपनीचे  वेगळे  स्थान दर्शवते.

संस्कृती राज्यमंत्री  मीनाक्षी  लेखी यांनी या प्रसंगी 'महाराजाज्  ट्रेझर  - सिलेक्ट वर्क्स ऑफ आर्ट फ्रॉम फेमड् एअर इंडिया कलेक्शन' या प्रदर्शनाच्‍या  माहितीपत्रकाचे प्रकाशन केले. जगभरातील कलाकार आणि कला जाणकारांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अधिकच रंग आला. डॉ. सरयू दोशी, फेरोजा गोदरेज,बृंदा मिलर, नयना कनोडिया, विप्ता कपाडिया, नंदिता देसाई, परमेश पॉल, विश्व साहनी, सोनू गुप्ता, रंगभूमी कलाकार   राएल पद्मसी यावेळी उपस्थित होते. संध्याकाळी प्रदर्शनसाठी खास बसवलेल्या  कथ्थक आणि लावणी कार्यक्रमाचे  आकर्षक सादरीकरण केले.

कला-प्रदर्शनाची  संकल्पना :

एअर इंडियाने अगदी स्थापनेपासूनच भारतातील विविध कलात्मक परंपरेतील कला, कलावस्तू  संग्रहित  करण्‍याच्या कामाला प्रोत्साहन दिले. स्वातंत्र्यानंतर, पारंपरिक कलांना  आश्रय  देणे कमी होत चालले होते.  अशा परिस्थितीत, एअर इंडियाने कला प्रकारांचे संवर्धन करणे आणि कलात्मक वस्तू संग्रहित करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली. भारतातील कला आणि हस्तकलांचे नमूने, इतर माहिती, वस्तू  जतन करणारी  विमान कंपनी, अशी प्रतिमा एअर इंडियाची  निर्माण झाली. या कंपनीने  भूतपूर्व महाराजांच्‍या   काळातील ऐश्वर्य आणि भव्यता टिपण्याचा, जतन करण्‍याचा  प्रयत्न केला. देशाच्या समृद्ध कलात्मक वारशाची झलक दाखवणाऱ्या आणि दुर्मिळ, सुंदर कलावस्तूंनी  सजवलेल्या या  ‘बुकिंग हाऊस’ , पॅव्हेलियन आणि लाउंज यांनी जगभरातील प्रवाशांना नेहमीच मोहून टाकले.

 

N.Chitale/Shailesh/Suvarna/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1932306) Visitor Counter : 162