ऊर्जा मंत्रालय
फ्रान्सच्या प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय विद्युत तसेच उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्र्यांची भेट घेतली, जागतिक उर्जा स्थित्यंतराला गती देण्यासाठी सहयोगी संबंध स्थापन करण्यासंदर्भात केली चर्चा
Posted On:
14 JUN 2023 2:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2023
केंद्रीय विद्युत तसेच उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्री आर.के.सिंग यांनी काल, 13 जून 2023 रोजी नवी दिल्ली येथील श्रम शक्ती भवनात फ्रान्सच्या विकास, फ्रांकोफोनी तसेच आंतरराष्ट्रीय भागीदारी विभागाच्या राज्यमंत्री ख्रिसोला झाकारोपोलो यांच्यासमवेत बैठक घेतली. फ्रान्सच्या राज्यमंत्र्यांसोबत भारतातील फ्रान्सचे राजदूत एमन्युएल लेनेन, राज्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार गिलॉम पॉटीएर आणि भारतातील फ्रेंच दूतावासातील राजकीय सल्लागार पाब्लो अहुमदा हे देखील केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीमध्ये उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित मान्यवरांमध्ये झालेल्या चर्चेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या संस्थात्मक चौकटीच्या अधीन राहून सौर उर्जेच्या वापरासह जागतिक उर्जा स्थित्यंतराला गती देण्यासाठी सहयोगी संबंध स्थापन करण्याच्या मुद्द्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले.
केंद्रीय विद्युत तसेच उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्र्यांनी या बैठकीत बोलताना, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतर्फे अधिकाधिक सौर उर्जा प्रकल्प हाती घेण्याची, विशेषतः आफ्रिका भागात हे कार्य करण्याची गरज ठळकपणे मांडली.
आफ्रिका खंडाच्या निम्म्या भागात वीजपुरवठा उपलब्ध नाही असे निरीक्षण दोन्ही देशांनी नोंदवले. उर्जा स्थित्यंतराबरोबरच, वीज उपलब्ध करून देण्याची सुनिश्चिती करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले पाहिजे असा आग्रह व्यक्त करत केंद्रीय विद्युत तसेच उर्जा आणि नवीकरणीय उर्जा मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला या दिशेने कार्य करण्यास मदत करण्याची गरज बोलून दाखवली. सौरउर्जेच्या माध्यमातून त्या प्रदेशाला वीज पुरवठा करणे हा किफायतशीर आणि सोपा पर्याय आहे असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी, नवीकरणीय उर्जा प्रकल्पांसाठी विमा संरक्षण, वीज शुल्काच्या भरणा रकमेच्या सुरक्षेविषयीची यंत्रणा आणि कर्ज पुरवठा करण्यासाठीची व्यवस्था अशा तीन प्रकारच्या निधींची गरज व्यक्त केली.
S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932268)
Visitor Counter : 133