राष्ट्रपती कार्यालय

विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या सदस्यांशी राष्ट्रपतींनी साधला संवाद


राष्ट्रपती मुर्मू यांनी विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या सदस्यांना शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देण्याचे केले आवाहन

Posted On: 12 JUN 2023 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (12 जून 2023) राष्ट्रपती भवनात विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या (पीव्हीटीजी ) सदस्यांशी संवाद साधला. यावेळी झालेल्या  सांस्कृतिक कार्यक्रमाला  राष्ट्रपती उपस्थित होत्या. यात  बिहारचा मल पहाडिया, गुजरातचा सिद्दी, केरळचा इरुला, राजस्थानचा सहारिया, मध्य प्रदेशचा बैगा परधौनी आणि ओडिशाचा बुडिगाली यांचा समावेश होता.

उपस्थितांना राष्ट्रपतींनी संबोधित केले. सर्व 75 विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या  सदस्यांना एकत्रितपणे  भेटून आपल्याला  आनंद झाला, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले. राष्ट्रपती भवनात आलेल्या सर्वांचे त्यांनी स्वागत केले.   आलेल्या सदस्यांपैकी  बरेच जण प्रथमच त्यांच्या गावातून बाहेर पडले आहेत, असे त्या म्हणाल्या.  त्यांच्यापैकी  प्रत्येकजण आपापल्या समाजाचा प्रतिनिधी असून  त्यांनी त्यांचे अनुभव त्यांच्या समुदायातील सदस्यांना सांगावेत आणि त्यांना सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन राष्ट्रपतींनी  केले.

राष्ट्रपतींनी विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या  सदस्यांना शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व देण्याचे आवाहन केले. विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या समुदायातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य आदर्श  निवासी शाळांमध्ये जागांची विशेष तरतूद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.  यासोबत राष्ट्रीय छात्रवृत्ती  (नॅशनल फेलोशिप) आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी  शिष्यवृत्ती  (ओव्हरसीज स्कॉलरशिप) योजनेतही त्यांच्यासाठी जागा राखीव आहेत. विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या  महिलांना आदिवासी महिला सक्षमीकरण योजनेसह विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही राष्ट्रपतींनी  केले.

विशेष दुर्बल आदिवासी गटांसह  आदिवासी समुदायांच्या कल्याणासाठी आदिवासी उप-योजनेअंतर्गत, भारत सरकारची 41 मंत्रालये आणि विभागांना  त्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा हिस्सा दिला जातो. विशेष दुर्बल आदिवासी गटांच्या  विकासासाठी सरकारने 'पंतप्रधान विशेष दुर्बल आदिवासी गट विकास अभियान ' सुरू केले असल्याचे सांगत राष्ट्रपतींनी याबाबत आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या कीसिकलसेल अॅनिमिया म्हणजेच रक्‍तपेशीतील दोषांमुळे निर्माण होणा-या या आजाराचे 2047 पर्यंत निमूर्लन करण्‍यासाठी, यंदाच्या   अर्थसंकल्पात जाहीर केलेली मोहीम हे  सरकारने उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल  आहे.

राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आदिवासी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जात आहे. ‘पीव्हीटीजी’ समाजातील सुमारे 28 लाख लोकांसह आदिवासी समाजातील 10 कोटींहून अधिक लोकांनी आपल्यामधील कलागुणांचा विकास करावा आणि समाज तसेच  देशासाठी त्यांनी  सर्वोत्तम योगदान द्यावे अशी आपली इच्छा आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आदिवासी समाजातील लोकांनी मातृभूमी आणि नैसर्गिक तसेच  सांस्कृतिक संपत्तीच्या रक्षणासाठी मोठे  बलिदान दिले आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आदिवासी समाजाकडून आपण सर्वजण शिकू शकतो. सर्व नागरिकांचे, विशेषत: ‘पीव्हीटीजी’ सह आदिवासी लोकांचे कर्तव्य तसेच  आकांक्षाही  आहेत की त्यांनी विकास सुनिश्चित करताना त्यांची ओळख कायम राखत   त्यांचे अस्तित्व सुरक्षित ठेवावे . ‘पीव्हीटीजी’ चे सदस्य आपल्या देशाच्या सर्वसमावेशक विकासाच्या प्रवासात पुढे जात राहतील, असा विश्वासही राष्‍ट्रपतींनी  व्यक्त केला.

तत्पूर्वी  ‘पीव्हीटीजी’ च्या सदस्यांना राष्ट्रपती भवन आणि अमृत उद्यानाची सैर घडवून आणण्यात  आली.  यानंतर राष्ट्रपतींनी अमृत उद्यानात त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करावे.

S.Kane/Sonali/Suvarna/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1932006) Visitor Counter : 96