वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारत-संयुक्त अरब अमिरात यांच्यातील व्यापक आर्थिक भागीदारी करारासंबंधीच्या संयुक्त समितीची पहिली यशस्वी बैठक


वर्ष 2030 पर्यंत बिगर-पेट्रोलियम उत्पादनांच्या व्यापारात दुपटीहून अधिक वाढ करून ही उलाढाल 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याबाबत उभय देशांची सहमती

भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यातील द्विपक्षीय व्यापारातून होणारा प्राथमिक लाभ 16.5% पर्यंत वाढला आहे यावर केंद्रीय मंत्री गोयल यांनी दिला भर

Posted On: 12 JUN 2023 9:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 जून 2023

भारत आणि  संयुक्त अरब अमिरात (यूएई) यांच्यातील व्यापक आर्थिक भागीदारी करारासंबंधीच्या (सीईपीए) संयुक्त समितीची पहिली बैठक यशस्वीरित्या पार पडली. दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी या कराराच्या अंमलबजावणीविषयीच्या विविध मुद्द्यांवर चर्चा  केली. तसेच दोन्ही देशांतील व्यापारी संस्थांकडून या कराराची अंमलबजावणी किंवा त्याचा वापर यात अडथळा निर्माण करू शकेल अशा कोणत्याही बाबीवर तोडगा शोधण्याबाबत दोन्ही देशांचे एकमत झाले. सेवा क्षेत्रातील व्यापारासंबंधी कार्य करणारी  एक नवी उपसमिती स्थापन करण्याबाबत तसेच अधिक उत्तम आर्थिक नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी तसेच अधिकाधिक प्रमाणात सीईपीएचे लाभ मिळवण्यासाठी एमएसएमई आणि  स्टार्ट अप उद्योग या क्षेत्रांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याबाबत देखील दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

संयुक्त अरब अमिरात सरकारच्या परदेश व्यापार विभागातील राज्यमंत्री डॉ.थानी बिन अहमद अल झेयुदी यांच्या अध्यक्षतेखाली युएई सरकारमधील वरिष्ठ अधिकारी तसेच यूएईमधील व्यापारी समुदायातील प्रतिनिधी यांचा  समावेश असलेले उच्च स्तरिय शिष्टमंडळ 11 आणि 12 जून 2023 या काळात भारत दौऱ्यावर आले होते. भारत आणि  यूएई यांच्यातील व्यापक आर्थिक भागीदारी करारासंबंधीच्या  संयुक्त समितीच्या पहिल्या बैठकीत सहमती झालेल्या मुद्द्यांच्या मसुद्यावर आज केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी स्वाक्षरी  केल्या.

यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बैठकीतील सफल वाटाघाटी आणि संयुक्त समितीच्या यशस्वी समारोपाविषयी माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेमध्‍ये माहिती देतानाकेंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, भारत आणि यूएई या दोन्ही देशांनी सध्या 48 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या बिगर-पेट्रोलियम उत्पादनांच्या व्यापारात दुपटीहून अधिक वाढ करून वर्ष 2030 पर्यंत ही उलाढाल 100 अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्याला मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले की भारतातून यूएईला होणाऱ्या निर्यातीने देखील  वर्ष 2022-23 मध्ये 12% ची उल्लेखनीय वाढ नोंदवली असून ही निर्यात 31.6 अब्ज डॉलर्स वर पोहोचली आहे. निर्यातीमधील वाढीचा हा कल कायम राखत दोन्ही देशांनी नवनव्या क्षेत्रात द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करावेत अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

दोन्ही देशांतील जनतेचा विकास, समृद्धी आणि कल्याणासाठी आपले सरकार आणि आपले मंत्रालय परस्पर विश्वास, सहकार्य आणि सहयोगी संबंध यांच्या  याच प्रेरणेसह भारतीय बाजूकडून सखोलपणे प्रयत्न करण्यासाठी वचनबद्ध आहे याची केंद्रीय मंत्री गोयल यांनी पुन्हा एकदा ग्वाही दिली. 

स्वागतपर भाषणात केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल म्हणाले की, युएईच्या शिष्टमंडळाच्या या भारत भेटीमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

भारत तसेच यूएईमधील व्यापारी समुदायांचे प्रतिनिधी आणि दोन्ही सरकारांमधील वरिष्ठ अधिकारीदोन्ही देशांच्या व्यापारी संस्थांच्या दरम्यान झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.

S.Bedekar/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931843) Visitor Counter : 141