रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात 816 कोटी रुपये खर्चाच्या अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

Posted On: 11 JUN 2023 1:50PM by PIB Mumbai

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात 816 कोटी रुपये खर्चाच्या अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 च्या शेलाड ते नांदुरा या टप्प्याचे उद्घाटन केले.

राष्ट्रीय महामार्ग 53 हा गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओडिशा तसेच देशातील इतर राज्यांमधील महत्त्वाचा व्यापारी दुवा म्हणून महत्त्वपूर्ण आहे. तसेच, हा महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, (खामगाव) बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग आहे. हा महामार्ग रायपूर-नागपूर-सुरत किंवा पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी चांगली संपर्क सुविधा असल्यानेही महत्त्वाचा ठरतो.

या शेलाड - नांदुरा विभागाच्या चतुर्भूज प्रकल्पाची एकूण लांबी 45 किमी असून यामध्ये 14 किमी ग्रीनफिल्ड बायपास, 4 मोठे पूल, 16 छोटे पूल, 63 कल्व्हर्ट, 1 रोड ओव्हर ब्रीज, 8 वाहन भुयारी मार्ग, 2 पादचारी भुयारी मार्ग, 12 बस थांबे  यांचा समावेश आहे. बुलढाणा जिल्ह्यातील उपविभाग असलेल्या आणि सिल्व्हर सिटी अशी ओळख असलेल्या खामगावच्या प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेसाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

या प्रकल्पामुळे खामगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असून अपघातांचे प्रमाणही कमी होण्यासही याची मदत होणार आहे. वाहन अंडरपास आणि रोड ओव्हर ब्रीज प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करतील. या प्रकल्पामुळे शेगाव, लोणार किंवा इतर धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होणार आहे. या प्रकल्पामुळे पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मितीचा विकास होईल.

केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेत, महामार्ग प्रकल्पांतर्गत तलाव खुले करून "जलकुंभ बांधण्यात आल्याने खामगावसारख्या उष्ण आणि कोरड्या भागातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे.

मलकापूर - बुलढाणा - चिखली या 1,200 कोटी रुपये खर्चाच्या तर बाळापूर - शेगाव या 22 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 350 कोटी रुपये खर्चाची योजना जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय चिखली ते ठाकरखेड यासह इतर रस्त्यांच्या 25 कोटी रुपयांच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे.

***

R.Aghor/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1931460) Visitor Counter : 233


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu