आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
आरोग्य मंत्रालयाच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्रे (पीएचसी), सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सक्षम करण्यासाठी ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (एनएएफएलडी) विषयावर वेबिनारचे आयोजन
Posted On:
08 JUN 2023 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2023
“मौल्यवान ज्ञान आणि आपल्या क्षेत्रामध्ये पारंगत होण्याची मिळणारी संधी लक्षात घेवून, वैद्यकीय अधिकार्यांनी अशा वेबिनारव्दारे क्षमता वाढविण्याची आवश्यकता आहे. यामुळे व्यावसायिक विकास करणे शक्य होते. तसेच ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर’ या आजारामुळे उद्भवलेल्या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्याची डॉक्टरांची क्षमता वाढण्यास मदत मिळते. यामुळे ‘ एनएएफएलडी’ आजाराचे जोखीम घटक, योग्य निदान, तसेच देशातील ‘एनएएफएलडी’ च्या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी मानक उपचार समजून घेवून हा आजार बरा करण्याचे कौशल्य विकसित होणार आहे.” अशी माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव, राजेश भूषण, यांनी आज येथे दिली. राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी ‘एनएएफएलडी’ या आजारावर वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. या राष्ट्रीय वेबिनारमध्ये देशभरातील 7,000 वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.
देशाच्या आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय रचनेमध्ये बदल झाला आहे, असे अधोरेखित करून आरोग्य सचिव म्हणाले, त्याचबरोबर येणा-या साथीच्या आजारांचे स्वरूप देखील बदलले आहे. हे परिवर्तन गैर-संसर्गजन्य रोगांमध्ये वाढ घडवून आणण्यास कारणीभूत ठरत आहे. अशावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांना व्यापक भूमिका पार पाडावी लागते, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “ वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी थेट समुदायाबरोबर काम करत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे समाजात प्रसारित करण्यासाठी योग्य माहिती असणे महत्त्वाचे आहे, तसेच वाढत असलेल्या आजारांवर लक्ष केंद्रित करणे देखील महत्त्वाचे आहे. जीवनशैली आधारित बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देण्याची आवश्यकता आहे. ही सर्व कामे करण्यासाठी आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य ज्ञान आणि साधने प्रदान करण्यासाठी या वेबिनारसारखे क्षमता निर्मिती कार्यक्रम अधिक महत्त्वाचे ठरतात, जेणेकरून वैद्यकीय अधिकारी त्यांचे कार्य प्रभावीपणे करू शकतील.”
वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी अशा प्रकारचा क्षमता निर्मिती कार्यक्रम दोन टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नियमित वेबिनारचा समावेश असेल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. ‘एनएएफएलडी’ विषयी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेणारे, मध्य प्रदेश हे पहिले राज्य असणार आहे.
S.Kane/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930744)
Visitor Counter : 160