विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भदेरवाह देशाचा प्रमुख लॅव्हेंडर उत्पादक भाग म्हणून उदयाला आला आहे- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

Posted On: 04 JUN 2023 5:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जून 2023

 

भदेरवाह देशाचा प्रमुख लॅव्हेंडर उत्पादक भाग आणि कृषी स्टार्ट अप डेस्टीनेशन म्हणून उदयाला आला आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. ते आज जम्मूमध्ये भादेरवाह येथे दोन दिवसीय लॅव्हेंडर उत्सवाचे उद्घाटन करताना बोलत होते.

‘वन वीक वन लॅब’ मोहिमेचा एक भाग म्हणून सीएसआयआर- इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटेग्रेटिव्ह मेडिसिन, जम्मू या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

भदेरवाह हे भारताच्या ‘पर्पल रिव्हॉल्युशन’ चे जन्मस्थान आणि कृषी स्टार्ट अप डेस्टिनेशन असल्याचे जितेंद्र सिंह यांनी सांगितले. केंद्रामध्ये असलेल्या विद्यमान प्रगतीशील सरकारच्या विकासाचे भदेरवाह हे सर्वोत्तम उदाहरण आहे आणि जमीन आणि हवामान यांचा विचार करता भदेरवाह हे लॅव्हेंडर शेतीसाठी सर्वोत्तम ठिकाण असल्याने हा गौरव खरे तर यापूर्वी खूपच आधी व्हायला हवा होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.  लॅव्हेंडर हा रोजगार निर्मितीचा आणि संशोधनाचा एक मार्ग आहे आणि विकासाची अनेक दालने खुली करणारा आहे, असे ते म्हणाले.

सीएसआयआर-अरोमा मिशन हा सीएसआयआरचा एक अग्रणी प्रकल्प असून या अंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या समशीतोष्ण प्रदेशात लॅव्हेंडर शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. अल्प  आणि भूमीहीन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे आणि कृषी आधारित स्टार्ट अप्सचा विकास करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.   

जम्मू विभागातील समशीतोष्ण प्रदेशातील अनेक लहान आणि भूमीहीन मका उत्पादक शेतकऱ्यांनी लॅव्हेंडरच्या शेतीचा यशस्वी पद्धतीने अंगिकार केला आहे. लॅव्हेंडरच्या शेतीमुळे जम्मू आणि काश्मीरमधील भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात अनेक शेतकऱ्यांना आणि तरुण उद्योजकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. सीएसआयआर-आयआयआयएम च्या पुढाकारामुळे या भागात लॅव्हेंडर शेतीशी संबंधित एक नवा उद्योग विकसित झाला आहे. 2500 पेक्षा जास्त शेतकरी जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात लॅव्हेंडरची शेती करत आहेत. लॅव्हेंडरच्या शेतीमध्ये प्राथमिक स्वरुपात फुलांची कापणी आणि प्रक्रिया ही कामे महिलांना दिली जातात , ज्यामुळे या भागातील महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. अनेक तरुण उद्योजकांनी लॅव्हेंडरचे तेल, हायड्रोसोल आणि फुले यांच्या मूल्यवर्धनाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरू केले आहेत. सीएसआयआर-आयआयआयएम ने अनेक कौशल्य विकास कार्यक्रम राबवले आहेत आणि लॅव्हेंडरची शेती, प्रक्रिया, मूल्य वर्धन आणि विपणन या संदर्भात जम्मू आणि काश्मीरमधील 2500 पेक्षा जास्त शेतकरी आणि तरुण उद्योजकांना प्रशिक्षित केले आहे. 

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1929740) Visitor Counter : 191