रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

G20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर, लस संशोधन आणि विकासावरील जागतिक लस संशोधन सहयोग चर्चेला केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केले संबोधित


नव्याने उद्भवणाऱ्या विषाणूंविरोधात लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य महत्वाचे असून, G20 हे, सरकारे, संशोधन संस्था, औषध उत्पादक कंपन्या आणि इतर भागाधारकांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरेल: डॉ. मनसुख मांडवीय

प्रभावी लसींचा विकास आणि अंमलबजावणीमुळे साथीच्या रोगांचा प्रभाव कमी व्हायला मदत होईल आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संशोधनाच्या प्रयत्नांना प्राधान्य द्यायला हवे असे केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन

Posted On: 03 JUN 2023 2:15PM by PIB Mumbai

 

कोविड-19 महामारीने लस संशोधन आणि विकासामध्ये जागतिक सहकार्याचे महत्त्व दाखवून दिले आहे. शतकांमधून एकदाच येणाऱ्या या आरोग्य संकटामधून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करत असतानाच, आपल्याला विशेषतः नव्याने उद्भवणाऱ्या विषाणूंविरोधातल्या (रोग-जनक) लस विकासाला गती देण्यासाठी संशोधनाचे महत्त्व समजले आहे. असे केंद्रीय केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी म्हटले आहे. आज हैदराबाद येथे, "लस संशोधन आणि विकास: भविष्यातील आरोग्य विषयक आणीबाणी प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसादासाठी एकमत तयार करणे" या विषयावरच्या  जागतिक लस संशोधन सहयोगी चर्चासत्राला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते संबोधित करत होते.जी-20 आरोग्य कृती गटाची तिसरी बैठक उद्या हैदराबाद इथे होत आहे त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर हे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते.   

यावेळी बोलताना डॉ. मांडवीय म्हणाले की ग्लोबल व्हॅक्सिन रिसर्च कोलॅबोरेटिव्ह, अर्थात जागतिक लस संशोधन सहयोग, हे नव्याने उद्भवणाऱ्या विषाणूंचा सामना करण्यासाठी, लस संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी अत्यंत आवश्यक यंत्रणा ठरू शकेल. या अत्यंत महत्वाच्या  अभियानाची सुरुवात करताना, आपल्याला जागतिक आरोग्य सेवा समुदायाच्या एकत्रित कौशल्याचा लाभ घ्यायला हवा, आणि महामारी विरोधातल्या सज्जतेच्या प्रयत्नांना बळ द्यायला हवे, ते म्हणाले. नव्याने उद्भवणाऱ्या विषाणूं विरोधात लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे आणि G20 हे, सरकारे, संशोधन संस्था, औषध उत्पादक कंपन्या आणि इतर भागाधारकांमध्ये सहकार्य निर्माण करण्यासाठी एक महत्वाचे व्यासपीठ ठरेल, असे ते पुढे म्हणाले.

पोलिओ, कांजिण्या आणि गोवर यांसारख्या आजारांसाठी लसींचा विकास, निर्मिती आणि वितरण यामधील अनुभवासह, लस संशोधन आणि विकासामधील भारताचे अनेक दशकांपासूनचे नेतृत्व अधोरेखित करत, केंद्रीय मंत्री म्हणाले की, लस उत्पादन आणि वितरणामधील एक प्रमुख देश म्हणून, हे उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिकाधिक जागतिक सहकार्य निर्माण करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकेल. प्रभावी लसींचा विकास आणि अंमलबजावणी  यामुळे साथीच्या रोगांचा प्रभाव कमी व्हायला मदत होऊ शकते आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण संशोधनाच्या प्रयत्नांना प्राधान्य द्यायला हवे, केंद्रीय मंत्री म्हणाले.

लस उत्पादन आणि वितरणाला चालना देण्यामध्ये भारताने घेतलेल्या पुढाकाराबद्दल माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, लस उत्पादकांना त्यांची उत्पादन क्षमता वाढवायला प्रोत्साहन देण्यासाठी, सरकारने आर्थिक प्रोत्साहन दिले आहे आणि नियामक प्रक्रिया सुव्यवस्थित केली आहे.

महामारी विरोधातली सज्जता, औषधे आणि लसींची सहज उपलब्धता आणि सार्वत्रिक आरोग्य सुरक्षा यासह आरोग्य विषयक प्राधान्यक्रमांना पुढे नेण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत, डॉ. मांडवीय म्हणाले की, या क्षेत्रातील भारताच्या अनुभवाचा आपण उपयोग करून घ्यायला हवा, आणि विशेषत: नव्याने उद्भवणाऱ्या आणि संभाव्य साथ-रोगजनक विषाणूंविरोधात लस विकासाला गती द्यायला हवी. ते पुढे म्हणाले की, कोविड-19 लसींचे उत्पादन आणि वितरणामधील भारताचे नेतृत्व हे जागतिक आरोग्य सुरक्षेप्रति आमच्या वचनबद्धतेचे निदर्शक आहे.

पार्श्वभूमी:

प्रस्तावित जागतिक लस संशोधन सहयोगासाठी G20 सदस्य राष्ट्रे तसेच विशेष आमंत्रित देशांच्या विविध भागधारकांना एकत्र आणून, त्यांच्यात एकमत तयार करण्याच्या उद्देशाने, औषध निर्मिती विभाग, प्रोग्राम फॉर अप्रोप्रीएट टेक्नोलॉजी इन हेल्थ (PATH), अर्थात, आरोग्यासाठी योग्य तंत्रज्ञान कार्यक्रम आणि कोएलिशन फॉर एपिडेमिक प्रीपेर्डनेस इनोव्हेशन्स (CEPI), अर्थात साथरोग सज्जता नवोन्मेष सहयोग, या अंतर्गत काम करत आहे. या उपक्रमात, पुढील महामारी येण्यापुर्वीच लस विकासाच्या संशोधनामधील मोठी तफावत दूर करणे, लसीच्या अधिक चांगल्या संशोधन आणि विकासाच्या सज्जतेसाठी संरचना आणि तत्त्वे विकसित करणे, समन्वय सुधारण्यासाठी आणि लस संशोधन आणि विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी एक यंत्रणा तयार करणे, यावर भर दिला जाईल.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1929641) Visitor Counter : 166