संरक्षण मंत्रालय
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी दक्षिण नौदल कमांड येथे प्रत्यक्ष जहाजावर प्रशिक्षण घेत असलेल्या रॉयल सौदी नेव्हल फोर्सेस कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीची भेट घेतली
Posted On:
02 JUN 2023 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2023
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी दक्षिणी नौदल कमांड, कोची येथे सागरी प्रशिक्षण घेत असलेल्या सौदी अरेबियाच्या किंग फहद नेव्हल अकादमीच्या कॅडेट्सशी संवाद साधला. पाच प्रशिक्षण कर्मचाऱ्यांसह (डायरेक्टिंग स्टाफ) रॉयल सौदी नेव्हल फोर्सचे 55 कॅडेट्स भारतीय नौदलासोबत प्रत्यक्ष जहाजावरील प्रशिक्षणाचा भाग म्हणून आयएनएस तिर आणि आयएनएस सुजाता या प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन जहाजांवर आहेत. यावेळी नौदल प्रमुखांना सध्या सुरू असलेल्या बंदर आणि युद्धनौकांवरील सरावांसह समुद्रातील प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींनी केलेल्या प्रगतीबाबतही नौदल प्रमुख यांना अवगत करण्यात आले.
यावेळी कॅडेट्सनी प्रशिक्षणादरम्यान त्यांना आलेले अनुभव -युद्धनौकेवरील त्यांचा पहिला प्रवास नौदल प्रमुखांबरोबर सामायिक केला. चर्चेदरम्यान, प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचार्यांनी भारतीय नौदलाच्या जहाजांवर त्यांना मिळालेल्या उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि संधीबद्दल त्यांचे कौतुक केले. आपल्या भाषणात,नौदल प्रमुखांनी रॉयल सौदी नेव्हल फोर्सेसच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात स्वागत केले आणि भारतीय नौदलाद्वारे सौदी कॅडेट्सना प्रथमच दिले जात असलेले प्रशिक्षण हे सौदी अरेबिया आणि भारत तसेच दोन्ही नौदलांमधील वाढत्या मैत्रीचे द्योतक असल्याचे नमूद केले.
अलिकडेच सुदानमधून भारतीय नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात सौदी अरेबिया सरकारकडून मिळालेल्या मदतीचा त्यांनी उल्लेख केला. दोन्ही नौदलांमधील दृढ संबंध आणि सहकार्यावर भर देत, नौदल प्रमुख म्हणाले की रॉयल सौदी नेव्हल फोर्सेससोबत संयुक्त सराव, कर्मचाऱ्यांशी चर्चा आणि प्रशिक्षणाचे आदानप्रदान यात गेल्या काही वर्षांत चांगली प्रगती झाली आहे आणि ते दोन्ही नौदलांमधील मजबूत बंध सूचित करतात.
ADMRHARIKUMAR,CNSMEETSTHEFIRSTBATCHOFROYALSAUDINAVALFORCES(RSNF)CADETSLOFW.JPG)
ADMRHARIKUMAR,CNSMEETSTHEFIRSTBATCHOFROYALSAUDINAVALFORCES(RSNF)CADETSJ3F0.JPG)
Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1929337)