गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मणिपूर दौऱ्याच्या तिसर्‍या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी मोरेह आणि कांगपोकपीला भेट देऊन नागरी समाज संघटनांशी केली व्यापक चर्चा


राज्यात पूर्ववत स्थिती बहाल करण्यासाठी सरकारच्या पुढाकारांना प्रतिनिधींचे जोरदार समर्थन

डोंगराळ भागात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि चुराचांदपूर, मोरेह आणि कांगपोकपी येथे आपत्कालीन गरजांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुनिश्चित केली जाईल- गृहमंत्र्यांनी दिले आश्वासन

गृहमंत्र्यांनी कांगपोकपी येथील एका मदत शिबिरालाही भेट देऊन तेथील कुकी समुदायाच्या सदस्यांची घेतली भेट, मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि शिबिरामधल्या लोकांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी सरकार वचनबद्ध - अमित शहा

अमित शहा यांनी इम्फाळमधील मैतेई समुदायाचे सदस्य राहत असलेल्या मदत शिबिराला भेट दिली, गृहमंत्री म्हणाले की, मणिपूरला पुन्हा एकदा शांतता आणि सौहार्दाच्या मार्गावर नेण्यावर आणि शिबिरातल्या लोकांना लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवण्याचा आमचा संकल्प आहे

Posted On: 31 MAY 2023 8:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023

 

मणिपूर दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मोरेह  आणि कांगपोकपी भागाला भेट दिली आणि नागरी समाज संघटनांशी विस्तृत चर्चा केली. त्यांनी मोरेह येथील पहाडी  आदिवासी परिषद, कुकी विद्यार्थी संघटना, कुकी चीफ असोसिएशन, तमिळ संगम, गोरखा समाज आणि मणिपुरी मुस्लिम परिषद यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. राज्यातील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी सरकारच्या पुढाकारांना या प्रतिनिधींनी जोरदार समर्थन दिले. केंद्रीय गृहमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सुरक्षेच्या स्थितीबाबत माहिती देखील घेतली.

कांगपोकपी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी एकता समिती, कुकी इंपी मणिपूर, कुकी विद्यार्थी संघटना, थाडौइंपी यासारख्या नागरी समाज संघटनांच्या शिष्टमंडळांची आणि इतर प्रमुख व्यक्ती तसेच विचारवंतांची भेट घेतली. डोंगराळ भागात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच चुराचांदपूर, मोरेह आणि कांगपोकपी येथे आपत्कालीन गरजांसाठी हेलिकॉप्टर सेवा सुनिश्चित केली जाईल, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

  

गृहमंत्र्यांनी कांगपोकपी येथील मदत शिबिरालाही भेट दिली आणि कुकी समुदायाच्या सदस्यांची भेट घेतली. मणिपूरमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि शिबिरातल्या  लोकांना त्यांच्या घरी परत पाठवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

नंतर अमित शहा यांनी इम्फाळ येथील मैतेई समुदायाचे सदस्य राहत असलेल्या एका मदत  शिबिरालाही भेट दिली. मणिपूरला पुन्हा एकदा शांतता आणि सौहार्दाच्या मार्गावर प्रस्थापित करणे आणि शिबिरातल्या लोकांना लवकरात लवकर त्यांच्या घरी परत पाठवणे या संकल्पावर सरकारचे लक्ष केंद्रित आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. 

केंद्रीय गृहमंत्र्यांनी इंफाळमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षा आढावा बैठकही घेतली. हिंसाचार रोखण्यासाठी, लवकरात लवकर सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी सशस्त्र असामाजिक तत्वाविरोधात  कठोर आणि त्वरित कारवाई करण्याचे तसेच लुटलेली शस्त्रे परत मिळवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1928823) Visitor Counter : 144