कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

उत्तराखंडमधील ऋषिकेश (टेहरी) येथे जी 20 भ्रष्टाचारविरोधी कार्य गटाच्या (एसीडब्ल्यूजी) दुसऱ्या बैठकीचा समारोप

Posted On: 27 MAY 2023 2:25PM by PIB Mumbai

 

उत्तराखंडमधील ऋषिकेश (टेहरी) येथे आज जी 20 भ्रष्टाचारविरोधी कार्यकारी गटाच्या (एसीडब्ल्यूजी) दुसऱ्या बैठकीचा समारोप झाला. संरक्षण आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट यांनी 25 मे रोजी या बैठकीचे उद्घाटन केले होते.

संयुक्त राष्ट्रांचे अमली पदार्थ आणि गुन्हेगारीविरोधी कार्यालय (युएनओडीसी), आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओईसीडी), इगमॉन्ट ग्रुप (आर्थिक गुप्तचर विभाग), द इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) प्रतिनिधी यांच्यासह 20 सदस्य राष्ट्रांचे  90 प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.   बैठकीच्या अध्यक्षस्थानी कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव आणि जी 20 भ्रष्टाचारविरोधी कार्यकारी गटाचे अध्यक्ष राहुल सिंग होते तर कार्यकारी गटाच्या कृती दलाचे प्रमुख इटलीचे जिओवन्नी तारताग्लिआ पॉलसेल्ली  आणि इटलीचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री फॅब्रिझिओ मार्सेली उपाध्यक्ष होते.  

मालमत्ता पुनर्प्राप्ती, फरार आर्थिक गुन्हेगार, माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सहकार्याचे औपचारिक आणि अनौपचारिक मार्ग, भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी संस्थात्मक रचनात्मक चौकट आणि परस्पर कायदेशीर साहाय्य यासारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर गेल्या तीन दिवसांमध्ये सखोल आणि फलदायी चर्चा झाली आहे. 'भ्रष्टाचार रोखण्यासाठी आणि त्यांच्याशी लढा देण्यासाठी जबाबदार सार्वजनिक संस्था आणि प्राधिकरणांची सचोटी आणि परिणामकारकता वाढवणे', 'भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीशी संबंधित आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण तसेच 'भ्रष्टाचाराशी संबंधित मालमत्ता पुनर्प्राप्ती यंत्रणा मजबूत करणे', या तीन उच्च स्तरीय तत्त्वांवर प्रतिनिधींनी सहमती दाखवली.

एसीडब्ल्यूजीच्या पहिल्या दिवशी, 'लिंग आणि भ्रष्टाचार' या विषयावर एक आगळावेगळा कार्यक्रम राबवण्यात आला. परराष्ट्र व्यवहार आणि सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांचे यावेळी प्रमुख भाषण झाले.

ऋषिकेश येथे मुक्कामादरम्यान प्रतिनिधींनी भारताची समृद्ध संस्कृती, वारसा आणि पाककृतींचा आस्वाद घेतला.

तिसरी बैठक 9-11 ऑगस्ट दरम्यान कोलकाता येथे होणार आहे.

***

N.Chitale/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1927790) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu