रसायन आणि खते मंत्रालय
औषधनिर्माण उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी प्रमुखांसोबत झालेल्या गोलमेज बैठकीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांचे संबोधन
“जगाचे औषधालय” हा भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नवोन्मेषावर भर देत उत्तम दर्जाच्या आणि परवडणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करायचे आहे: डॉ. मनसुख मांडवीय
Posted On:
27 MAY 2023 1:20PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायने आणि खते तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली आज देशातील आघाडीच्या औषधनिर्माण कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी प्रमुखांची गोलमेज बैठक झाली. आठव्या आंतरराष्ट्रीय औषधनिर्माण आणि वैद्यकीय उपकरणे क्षेत्र परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीत ही बैठक झाली.
या उद्योगाच्या वाढीचा वेग उत्तम असल्याची प्रशंसा करत, डॉ. मांडवीय म्हणाले, “ हे उद्योग क्षेत्र आता झपाट्याने वाढत आहे, आणि आपल्याला “जगाचे औषधालय” हा भारताचा दर्जा कायम राखायचा असेल, तर संशोधन आणि नवोन्मेषावर भर देत उत्तम दर्जाच्या आणि परवडणाऱ्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करायला हवं.” त्यामुळे सर्व भागधारकांनी सध्या असलेल्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. “उत्पादन-संलग्न-प्रोत्साहन योजनेद्वारे या क्षेत्रात होत असलेली मोठी गुंतवणूक, तसेच आगामी ड्रग पार्क्स अशा निर्णयांचे फायदे आज दिसत आहेत. विकासाला चालना देण्यासाठी आणि जगात आपला भक्कम ठसा उमटवण्यासाठी आपण स्पर्धात्मकता ठेवली पाहिजे” असा सल्लाही त्यांनी दिला.
केंद्र सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करतांना, मांडवीय यांनी सांगितले, “ सरकार उद्योग स्नेही असून समन्वयाच्या सर्व संधींचे आम्ही स्वागत करतो. केंद्र सरकार आणि उद्योग क्षेत्र, दोन्हीही देशाच्या प्रगतीतील अविभाज्य घटक आहेत, त्यामुळे सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी आपण एकत्रित काम करायला हवे.”
कोणत्याही कामात सरकारचे पाठबळ नक्की मिळेल, असा विश्वास उद्योजकांना देतांनाच डॉ. मांडवीय यांनी सर्व भागधारकांना त्यांच्या सूचना देण्याचे आवाहन केले. उत्पादनांच्या किमती, नियामकता, धोरण अशा सर्व बाबतीत, आपल्या सूचना मांडतांना, संबंधित क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी काय कृती करता येईल, याचे सविस्तर सादरीकरण करावे असे ते म्हणाले. या सर्व सूचना विचारात घेऊन, पुढच्या धोरणनिर्मिती आणि विकासप्रक्रियेसाठी, त्याचा वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
या गोलमेज बैठकीत, देशातल्या 60 कंपन्यांचे कार्यकारी प्रमुख आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्वाची भूमिका बजावणारे प्रतिनिधी उपस्थित होते.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927697)
Visitor Counter : 158