खाण मंत्रालय
खाण मंत्रालयाच्या वतीने मुंबई आयआयटीच्या सहकार्याने 29 मे रोजी मुंबईत खनिकर्म क्षेत्रातील पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेचे आयोजन
परिषदेत 120 हून अधिक स्टार्ट-अप आणि 20 प्रमुख उद्योग होणार सहभागी
Posted On:
26 MAY 2023 11:51AM by PIB Mumbai
खाण मंत्रालयाच्यावतीने मुंबई आयआयटीच्या सहकार्याने 29 मे रोजी मुंबईत खनिकर्म क्षेत्रातील पहिल्या स्टार्ट-अप शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले असून केंद्रीय संसदीय कार्य, कोळसा आणि खाणकाम मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे शिखर परिषदेच्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. अशा प्रकारची शिखर परिषद पहिल्यांदाच भरविण्यात येत आहे. खनिकर्म तसेच धातूशास्त्राच्या क्षेत्रात स्वायत्तता निर्माण करण्यासाठी खाण क्षेत्राला पाठबळ पुरवून या क्षेत्राची कामगिरी तसेच सुरक्षितता सुधारण्यात मदत करणाऱ्या अभिनव तंत्रज्ञानावर तसेच तंत्रांवर या परिषदेत अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था असलेल्या आपल्या देशात खाण क्षेत्रातील आव्हानांवर तोडगे शोधण्यासाठी, खाणकामात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खाणकामाचा विस्तार करणे तसेच आणि देशाचे खनिज उत्पादन वाढविण्यासाठी खाणकामाची सर्व प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्टार्ट-अप्स उद्योगांना सहभागी करून घेण्यासाठी मोठा वाव आहे.
या कार्यक्रमामध्ये, खाण मंत्रालयाच्यावतीने खनिज आणि धातूशास्त्र क्षेत्रातील स्टार्ट-अप्सशी संवाद साधण्यात येणार आहे. विविध तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे स्टार्ट-अप खाण क्षेत्रातील क्रियाकलापांमध्ये कसे योगदान देऊ शकतात, तसेच शोध आणि खाणकामाच्या कार्यक्षमतांना कशाप्रकारे चालना देऊ शकतात आणि त्यांचा विस्तार करू शकतात आणि नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने देशाच्या खनिज क्षेत्राचे उत्पादन वाढविण्यासाठी कसे योगदान देऊ शकतात यावर विचार मंथन करण्यात येणार आहे.
या शिखर परिषदेत खनिज उत्खनन क्षेत्रातील आघाडीचे उद्योग, वित्तीय संस्था आणि बँकांशी संवाद साधण्यावरही भर दिला जाणार आहे. खाण उत्खनन,, व्हर्च्युअल रिअॅलिटी, ऑटोमेशन, ड्रोन तंत्रज्ञान, सल्ला सेवा इत्यादी क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिक यांनाही या कार्यक्रमाचा फायदा होणार आहे. या परिषदेमध्ये 120 हून अधिक स्टार्ट-अप आणि 20 मोठे उद्योग सहभागी होणार आहेत.
खनिज क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक गोष्टींचे प्रदर्शन, खाण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे प्रदर्शन, तांत्रिक सत्र आणि उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांबरोबर समूह चर्चा, स्टार्ट-अप्सचे सादरीकरण, विचारमंथन अशा विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाची आर्थिक, व्यावसायिक राजधानी मुंबईमध्ये होत असलेल्या पहिल्या खनिकर्म स्टार्ट-अप शिखर परिषदेची ही काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
***
N.Chitale/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1927466)
Visitor Counter : 192