मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
2021-22 मध्ये भारताचे 162.48 लाख टन इतके विक्रमी वार्षिक मत्स्य उत्पादन : परशोत्तम रुपाला
जागतिक मत्स्योत्पादनात सुमारे 8% वाटा असलेला भारत तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश : परशोत्तम रुपाला
भारत जगातील सर्वोच्च संवर्धित कोळंबी उत्पादक राष्ट्रांपैकी एक, तर मत्स्य उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर : परशोत्तम रुपाला
तीन दिवसीय सागर परिक्रमा यात्रेच्या पाचव्या टप्प्याची गोव्यात सांगता
Posted On:
19 MAY 2023 4:36PM by PIB Mumbai
भारताला समृद्ध आणि वैविध्यपूर्ण मत्स्यसंपत्तीचे वरदान लाभलेले असून देशात विविध प्रकारच्या माशांचे उत्पादन केले जाते, असे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले. मासे हा भारतातील अन्न, पोषण, रोजगार आणि उत्पन्नाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे, असे त्यांनी सांगितले. मासे हे आरोग्यदायी प्राणीजन्य प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा एक परवडणारा आणि समृद्ध स्रोत असल्याने भूक भागवण्याची आणि कुपोषण कमी करण्याची त्यात अफाट क्षमता आहे, असेही ते म्हणाले. हे आश्वासक क्षेत्र प्राथमिक स्तरावर 2.8 कोटींहून अधिक मच्छीमार आणि मत्स्यपालकांना तसेच मूल्य शृंखलेत लाखो लोकांना उपजीविका, रोजगार आणि उद्योजकता पुरवते अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी सांगितले की, भारतातील मत्स्यव्यवसाय क्षेत्र हळूहळू विकसित होत असून हे क्षेत्र देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनले आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या काळात पूर्णपणे पारंपारिक उद्योग म्हणून सुरू झालेल्या या क्षेत्राचे गेल्या 75 वर्षांत व्यावसायिक उपक्रमात रूपांतर झाले असून मत्स्य उत्पादनात 22 पटीने वाढ झाली आहे. 1950-51 मध्ये केवळ 7.5 लाख टनांवरून 2021-22 मध्ये मत्स्य उत्पादनात 10.34% वाढीसह भारताचे एकूण मत्स्य उत्पादन विक्रमी वार्षिक 162.48 लाख टन इतके झाले आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, जगातील सर्वाधिक मासळी उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये आज भारत तिसऱ्या क्रमांकावर असून जागतिक पातळीवरील एकूण मासळी उत्पादनामध्ये भारताचा वाटा सुमारे 8% आहे. आपला देश मत्स्यशेती उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर असून कल्चर्ड कोलंबीचे उत्पादन करणाऱ्या जगातील प्रमुख देशांपैकी एक देश आहे अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी नुकताच सागर परिक्रमा यात्रेच्या पाचव्या टप्प्याचा प्रारंभ केला. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथून 17 मे 2023 रोजी सुरु झालेली ही परिक्रमा रायगड जिल्ह्यातील करंजा या किनारपट्टी प्रदेशातून मार्गक्रमण करत 18 मे 2023 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेल्दूर येथे पोहोचली आणि त्यानंतर गोव्यातील वास्को, बायना, मडगाव, काणकोण असे टप्पे पार करत आज 19 मे 2023 रोजी तिची सांगता झाली.
सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्यात आज तिसऱ्या दिवशी वास्को मासेमारी बंदराला भेट देण्यात आली. केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री पुरषोत्तम रुपाला, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, गोवा राज्य सरकारमधील मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हलर्णकर यांच्यासह इतर मान्यवरांनी, वास्को बंदरावर उपस्थित असलेले मत्स्य शेतकरी, मच्छीमार यांसारख्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी, मच्छिमारांनी त्यांच्या समस्या मांडण्यात मोठी उत्सुकता दाखवली तसेच त्यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय) आणि किसान क्रेडीट कार्ड (केसीसी) यांसारख्या योजना आणि कार्यक्रम सरकारी यांच्या बाबतीत जागरूकता निर्माण केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. केंद्रीय मस्त्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्र्यांनी स्वयंसेवकांना सरकारच्या कल्याणकारी योजनांबद्दल मच्छिमार समुदायात जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले जेणेकरून आपले मच्छिमार, मत्स्य शेतकरी किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेऊ शकतील आणि आपले जीवनमान सुधारण्यासाठी स्वतःची मदत करू शकतील.
सागर परिक्रमेच्या पाचव्या टप्प्याला भरघोस यश मिळाले.
धन्यवाद.
***
S.Kane/S.Mukhedkar/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925577)
Visitor Counter : 365