पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
पर्यावरण आणि हवामानविषयक शाश्वततेविषयीच्या कृतिगटाच्या (ईसीएसडब्ल्यूजी) तिसऱ्या बैठकीची सुरुवात मुंबईत 21 मे रोजी आयोजित जी-20 च्या महा समुद्रकिनारा स्वच्छता अभियानाने होणार
Posted On:
19 MAY 2023 12:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 19 मे 2023
“दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि हवामानबदलांना प्रतिसाद देणाऱ्या नील (सागरी) अर्थव्यवस्थेला चालना देणे” हा भारताच्या जी-20 समूहाच्या अध्यक्षतेखालील पर्यावरण आणि हवामानविषयक शाश्वततेविषयीच्या कृतिगटाने (ईसीएसडब्ल्यूजी) निश्चित केलेल्या विविध प्राधान्याक्रमांपैकी एक प्राधान्यक्रम आहे.
मुंबई येथे आयोजित जी-20 च्या महा किनारपट्टी स्वच्छता अभियानाने ईसीएसडब्ल्यूजीच्या 21 ते 23 मे या कालावधीत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीची सुरुवात होणार आहे. ईसीएसडब्ल्यूजीच्या तिसऱ्या बैठकीमध्ये भाग घेणारे जी-20 प्रतिनिधी मुंबईतील जुहू च्या सागरकिनारी होणाऱ्या या स्वच्छताविषयक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहतील. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यातील समाजाच्या सहभागाच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवून त्यांना याविषयी संवेदनशील करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ईसीएसडब्ल्यूजीतर्फे ही मोहीम सुरु करण्यात येणार आहे. केंद्रीय भूविज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने आणि भारतीय तटवर्ती राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश सरकारे आणि इतर जी-20 सदस्य देशांची सरकारे यांच्या सक्रीय सहभागासह केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान मंत्रालयाने या स्वच्छता अभियानाचे आयोजन केले आहे.
या मोहिमेअंतर्गत देशातील 9 तटवर्ती राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांतील 30 हून अधिक किनाऱ्यांवर ही स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली जी-20 समूहातील सदस्य राष्ट्रे तसेच निमंत्रित देश यांच्यासह एकूण 20 हून अधिक देशांमध्ये भारतीय दूतावास तसेच वाणिज्य दूतावासांच्या पाठींब्याने हे किनारपट्टी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना या प्रश्नाबाबत संवेदनशील करण्यासाठी स्थानिक प्रशासनांनी विविध उपक्रमांचे देखील आयोजन केले आहे. यामध्ये आंतर-विद्यालयीन चित्रकला स्पर्धा, सागरी परिसंस्थेच्या संवर्धनासाठी शपथ ग्रहण, कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्याला प्रोत्साहन, इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. या जागरूकतेची व्याप्ती अधिकाधिक वाढवण्यासाठी, मुंबईत जुहू येथील किनाऱ्यावर पद्मश्री सन्मानप्राप्त सुदर्शन पटनाईक यांच्या हस्ते वालुका-शिल्प साकारण्याचे देखील नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरणावर होत असलेल्या सागरी कचऱ्याच्या दुष्परिणामांबद्दल जाणीव निर्माण करणे तसेच हे दुष्परिणाम टाळण्यासाठी लोकांना कृती करण्यास प्रोत्साहित करणे या उद्देशाने अखिल भारतीय आंतर-विद्यालयीन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यात देशभरातील 5900 हून अधिक विद्यार्थी सहभागी होत आहेत.
पर्यावरणाशी सुसंगत असलेली शाश्वत जीवनशैली विकसित करणाऱ्या LiFE मिशन अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेद्वारे पंतप्रधानांच्या दूरदर्शी आवाहनाला प्रोत्साहन दिले जात आहे. भारत यशस्वीरीत्या राबवत असलेली 'LiFE' (पर्यावरण पूरक जीवनशैली) ही संकल्पना या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावेल. हा उपक्रम पर्यावरणीय समस्या हाताळण्यासाठी वैयक्तिक जबाबदारी आणि वर्तन बदल यावर लक्ष केंद्रित करतो. लाइफ - पर्यावरण पूरक जीवनशैलीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर जनभागीदारी (सामुदायिक सहभाग) रुजवणे हा या मोहिमेचा एकंदर उद्देश आहे.
जनसमुदायाच्या सहभागाचे महत्त्व ओळखून, 10,000 हून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होणार आहेत. यामध्ये स्थानिक समुदाय, सरकार, स्थानिक प्रशासन, खाजगी संस्था/कॉर्पोरेट्स आणि किनारी परिसंस्थेच्या संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांसह अनेक भागधारकांचा समावेश असेल. भारताच्या जी-20 अध्यक्षते अंतर्गत ही सर्वात मोठी 'जन भागीदारी' मोहीम आहे. महासागरांचे शाश्वत व्यवस्थापन आणि सागरी जैवविविधता संवर्धनाला चालना देण्यासाठी जी-20 राष्ट्रांमधील सहकार्य वाढवण्यासाठी भारत प्रयत्नरत आहे. समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम ही भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील कार्यकाळात पर्यावरणीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी, शाश्वत भविष्याला चालना देण्यासाठी किनारपट्टी तसेच सागरी जीवनाचे रक्षण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.
मुंबईतील भव्य समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेनंतर ओशन 20 चर्चासत्र या व्यासपीठावर विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना; धोरण, शासन आणि सहभाग तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि हवामानबदलांना प्रतिसाद देणाऱ्या नील (सागरी) अर्थव्यवस्थेला चालना देणे याची खात्री करण्यासाठी निल वित्त यंत्रणेतील सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यासाठी चर्चा केली जाईल.
***
S.Tupe/S.Chitnis/S. Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1925473)
Visitor Counter : 329